जनतेला ऑनलाइन सेवा देण्यासाठी सरकारच्या विविध खात्यातील कर्मचार्यांना संगणक हाताळणीसाठी एप्रिलपासून खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.
राज्य सरकारच्या बहुतांश खात्यांकडून नागरी सेवेसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे. सरकारच्या विविध खात्यांतील अनेक कर्मचार्यांना ही सेवा हाताळता येत नाही. सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना ऑनलाइन सेवेबाबत योग्य प्रशिक्षण देण्यात न आल्याने कामकाज हाताळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारच्या अनेक खात्यांच्या वेबसाइट सुध्दा वेळेवर अपलोड केल्या जात नाहीत.
या पार्श्वभूमीवर बोलताना माहिती तंत्रज्ञान मंत्री खंवटे म्हणाले की, जनतेला चांगली सेवा मिळावी याच उद्देशाने ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे. ही सेवा हाताळताना येणार्या अडचणींबाबत कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात सर्व सरकारी कर्मचार्यांना कामकाज हातळण्यासाठी खास प्रशिक्षण देण्याची योजना आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
सरकारने कॅशलेस पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या कॅशलेस पद्धतीच्या वापराबाबत मार्गदर्शन शिबिरे घेण्याचा विचार आहे. भीम ऍप व इतर ऍपचा वापराबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचा विचार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना स्मार्ट फोनच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्याची योजना आहे. प्रशिक्षण शिबिरे तालुका, मतदारसंघ, ग्राम पातळीवर घेण्याचा विचार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.