सरकारी कर्मचार्‍यांच्या संपास पणजी वगळता प्रतिसाद

0
78

सरकारी कर्मचार्‍यांचा कालचा लेखणी बंद संप पणजी शहर सोडल्यास अन्य सर्व ठिकाणी यशस्वी झाला. बार्देश, पेडणे, काणकोण, मुरगाव, सासष्टीसह अन्य तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये काल बंद होती. पणजी शहरात मात्र सरकारी कार्यालये खुली होती.
सासष्टी मामलेदारांनी कर्मचार्‍यांना कामावर गैरहजर न राहण्याचा आदेश काढल्याने कर्मचारी कामावर हजर राहिले. पैकी बहुतेक कर्मचारी हे आपणावर कारवाई होण्याच्या भीतीने हजर राहिले. त्यामुळे कुणीही कर्मचार्‍यांमध्ये फूट पडल्याचा गैरसमज करून घेऊ नये असे सरकारी कर्मचारी संघटनेतील सूत्रांनी सांगितले.
मामलेदार कार्यालयातील कर्मचार्‍यांना जिल्हा पंचायत निवडणुका तोंडावर असल्याने संपात सहभागी न होण्याची सूचना मामलेदारांनी दिली होती. त्यामुळे तेथील बहुतेक कर्मचारी कामावर हजर राहिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
याशिवाय अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी म्हणजेच पाणी पुरवठा करणारे, वीज पुरवठा करणारे, कदंबचे कर्मचारी, फेरीबोटचे कर्मचारी हे संपात सहभागी होणार नाहीत हे आदीच ठरले होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.