– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा
एक विनोद आठवतो. भारताने अवकाशात सोडलेला एक उपग्रह उड्डाणानंतर लगेच समुद्रात कोसळतो. यावरून त्याला नक्की काय कारण असावे यावर विविध देशांच्या शास्त्रज्ञांत खल होतो. अमेरिकी वैज्ञानिक विचारतात, ‘इंजिनाला इंधनाचा ठीक पुरवठा होतो की नाही हे तपासले होते का?’ रशियाचे वैज्ञानिक खोलवर विचार करून म्हणतात, ‘यानाची अवकाशात झेप घेण्याची कक्षा ठीक तपासली होती का? अन्य प्रमुख देशांचे या अपयशाला कुठलाही ठोस शास्त्रीय गुंता आहे का यावर विचार करतात. पण तिथे उपस्थित असलेले बहुतेक भारतीय वैज्ञानिक, ‘उड्डाणापूर्वी ज्योतिषाकडून चांगला मुहूर्त बघून, देवाला व्यवस्थित नवस बोलून यान सोडले होते का?’ असा प्रश्न उपस्थित करतात. यातील विनोदाचा भाग सोडला, तरी त्यात भारतीय मानसिकतेचे पूरेपूर दर्शन समोर येते.हल्लीच गोव्यात सुरू असलेल्या इफ्फीच्या बाबतीतील एक बातमी वाचनात आली, ती म्हणजे मनोरंजन सोसायटीच्या पदाधिकार्यांनी इफ्फी निर्विघ्न पार पडावा यासाठी पणजीचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मीला साकडे घातले. तसे पाहिले तर लोक आपल्या खासगी आयुष्यात काय करतात यावर कोणालाच आक्षेप असण्याचे कारण नाही, पण जेव्हा असे सार्वजनिक उपक्रम राबवण्यापूर्वी हे धार्मिक विधी केले जातात, त्याला माझा आक्षेप आहे. मी स्वतः काहीही उपक्रम हाती घेण्याअगोदर माझ्या कुलदैवताचा व ग्रामदैवताचा आशीर्वाद जरूर घेतो, पण त्याची झळ अन्य कोणाला बसत नाही.
हल्ली आपण विविध सरकारी कार्यालयांत सत्यनारायण महापूजा किंवा अन्य धर्मियांचे काही धर्मिक कार्यक्रम सादर होताना बघतो. एरवी आपल्या कामात हलगर्जीपणा करणारे हेच कर्मचारी या धार्मिक कार्यांत स्वतःला अगदी झोकून देतानाचे चित्र समोर येते आणि कार्यालयात हे धार्मिक कार्य होत असल्याने त्याचा कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होतो तो वेगळाच. हल्ली पुष्कळ सरकारी खात्यांत दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची टूम निघाली आहे. तेव्हा हे असे कार्यक्रम एखाद्या सरकारी कार्यालयात केले जावेत की नाही, यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
दि. २२ नोव्हेंबरच्या एका वृत्तपत्रात कळंगुट येथे कचरा प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे श्रीफळ वाढवून शुभारंभ करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. स्वतः संरक्षणमंत्री हे शुभकार्य करतात म्हणजे तेथे गोव्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ हजर असणे हे ओघानेच आले. त्याचप्रमाणे दि. २५ नोव्हेंबरच्या काही वृत्तपत्रांत संजीवनी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. यात मुख्यमंत्री पार्सेकर व अन्य मान्यवरांसोबत एक पुरोहित उभा असलेला दिसतो आणि बहुतेक मान्यवरांच्या हातात श्रीफळ (नारळ नव्हे) दिसते. त्यामुळे हे शुभकार्य धार्मिक विधीने श्रीफळ वाढवून झाले असणार हे निश्चित. हल्ली आपण पाहिल्यास गावोगावी किंवा विविध शहरांत जे जे सरकारी प्रकल्प उभारले जातात, तिथे कोनशीला, भूमीपूजन किंवा उद्घाटन करताना हे धार्मिक सोपस्कार हमखास आयोजित केले जातात. गंमत म्हणजे जे सोपस्कार होतात, ते मुख्यतः हिंदू धर्मानुसारच होतात, व यात इतरधर्मिय आमदार व मंत्री बिनबोभाट भाग घेताना दिसतात. हे सर्व घडवून आपण नक्की कसल्या धर्मनिरपेक्षतेचा संदेश जगाला देतो, याचा कोणीही विचार केला आहे काय?
कुठल्याही उपक्रमाचा अन्य एक सोहळा म्हणजे त्याचा उद्घाटन सोहळा. एखादे संगीत संमेलन, एखादे चर्चासत्र किंवा कार्यशाळा किंवा एखादी स्पर्धा म्हटली की, त्यांचे उद्घाटन हे आलेच. माझ्या अल्पबुद्धीनुसार हे उद्घाटन म्हणजे त्या उपक्रमाची केलेली सुरवात. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा अगदी सुरुवातीला होणे अपेक्षित असते. पण आपल्या देशाच्या मानसिकतेमुळे अगदी कसल्याही कार्याची सुरवात करताना ते कार्य एखाद्या मंत्र्याच्या किंवा आमदाराच्या ‘शुभहस्ते’ होणे आवश्यक असते. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा त्या मंत्र्याच्या किंवा आमदाराच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. एकदा एक माणूस निवडून आल्यानंतर एखादे शुभकार्य करायला त्या लोकप्रतिनिधीचा ‘शुभहस्त’ का लागतो हे एक अनाकलनीय असेच कोडे आहे. आपण जसे एखादे शुभकार्य करताना मुहूर्त बघतो, दसरा, पाडवा किंवा अक्षय तृतीया या दिवशीं वेगळे मुहूर्त बघण्याची गरज नसते. त्याप्रमाणे आता या लोकप्रतिनिधींचे वाढदिवससुद्धा हे कायम मुहुर्ताचे दिवस म्हणून गणले जातात इतपत शंका येते. कुठल्याही लोकप्रतिनीधींच्या ‘शुभहस्ते’ एखाद्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाते किंवा एखाद्या कित्येक कोटींच्या भव्य प्रकल्पांची घोषणा केली जाते. असो.
तर आता आपण या उद्घाटन समारंभाकडे वळू. मी अशी कैक संगीत संमेलने अनुभवली आहेत, ज्यांचा रीतसर उद्घाटन सोहळा हा सकाळच्या सत्रांत शेवटी किंवा संध्याकाळच्या सत्रात झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा ‘स्वरमंगेश’ या दीनानाथ मंगेशकरांना समर्पित असलेल्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर आल्या होत्या, तो उद्घाटन सोहळा सबंध सकाळ लोकांना ताटकळत ठेवून दुपारी १ वाजता साजरा झाला होता. जेव्हा याबद्दलचे कारण मी आयोजकांपैकी एकाला विचारले, ‘तेव्हा त्यांच्याकडून कळले की, पंडित हृदयनाथ मंगेशकर हे उशिरा उठत असल्याने त्यांच्या सोयीसाठी हा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता. हजारो लोक लतादीदींना याची डोळा पाहण्यासाठी अगदी सकाळपासून कला अकादमीच्या सोयीसाठी हा उद्घाटन सोहळा भर दुपारी ठेवण्यात आला होता. धन्य ते आयोजक व धन्य ते महनीय उद्घाटक. इथे एका गोष्टीचा उल्लेख करण्याचा मोह आवरत नाही. बाकी काही का असेना, या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी होणार्या दीप प्रज्वलनाचा हल्ली बहुतेक लोकप्रतिनिधींनी चांगलाच सराव केलेला दिसतो, कारण प्रसिद्ध होणार्या छायाचित्रात किंवा टीव्हीवर दाखवल्या जाणार्या बातम्यांमधून हा सोहळा बघताना उजव्या हातात पणती, डावा हात दुमडून हाताच्या कोपराला लावलेला व एकदम एकाग्रचित्ताने समईची ज्योत पेटवताना चेहर्यावरचे धन्यतेचे भाव बरेच काही सांगून जातात.
तेव्हा सर्वत्र धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणारे आपण त्या बाबतीत खरोखरच किती बांधिल आहोत, यावर विचारविनिमय होणे गरजेचे वाटते. आपल्या घरच्या एखाद्य शुभकार्यात कोण काय नवस बोलतो, कसली पूजा बांधतो किंवा किती श्रीफळे वाढवतो यावर कोणालाच आक्षेप असण्याचे कारण नाही. पण एखाद्या सरकारी प्रकल्पाचा शुभारंभ करताना एका विशिष्ट धर्माच्या रितीरिवाजानुसार त्याची सुरवात करणे, किंवा एखाद्या सरकारी कार्यालयांत पूजेसारखी धर्मकृत्ये करून तिथल्या दैनंदिन कामकाजांत व्यत्यय आणणे कितपत योग्य आहे, यावर जरूर विचार व्हावा.