>> आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
राज्यातील सरकारी इस्पितळांत उपचार घेणाऱ्या ज्या ज्या रुग्णांना ‘केअरटेकर’ हवे असतील अशा रुग्णांना यापुढे सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून दिले जातील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल स्पष्ट केले. यावेळी पुढे बोलताना आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी, गोव्याने आरोग्य क्षेत्रात दैदिप्यपान अशी कामगिरी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोग्यसेवेत क्रांतिकारी अशी सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याला सर्वतोपरी मदत करीत असल्याचे सांगितले.
मये येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री. राणे बोलत होते.
यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, गोवा दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयडा नोरोन्हा आदी मंडळी यावेळी व्यासपीठावर हजर होती. या आरोग्य शिबिराचा शेकडो जणांनी लाभ घेतला.
यावेळी पुढे बोलताना राणे म्हणाले की मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आपण साखळी व पर्ये येथे आरोग्य क्षेत्रासाठीचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महाविद्यालय उभारणार आहोत. त्यामुळे शेकडो जणांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. कर्करोग रुग्णांवर अल्प दरात आधुनिक उपचार करण्याची सोय कर्करोग इस्पितळात करण्यात येणार असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. कर्करोग तपासणीसाठी यापुढे गावागावात मोठ्या शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आज गोवा वैद्यकीय इस्पितळामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात यश आलेले असून आगामी काळात आरोग्य सेवेत मोठ्या सुधारणा करण्याचा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक सामान्य माणसाने आरोग्याची नियमित तपासणी केल्यास रोगाचे निदान वेळेवर होऊन उपचार करणे शक्य होणार आहे त्या दृष्टीनेच गावातील लोकांना जागृत करणे व तपासणी करणे सोपे व्हावे हा या आरोग्य शिबिरांचा मूळ हेतू असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.