>> तालिबानी नेत्यांची माहिती, नागरिकांच्या संरक्षणाची हमी
अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी तालिबानी नेत्यांनी अफगाणिस्तानातील नागरिकांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर तालिबान सरकारमध्ये महिलांचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. महिलांनी तालिबान सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करावा असे आवाहन या तालिबानी नेत्याने केले आहे. इस्लामिक एमिराटचे सांस्कृतिक आयोगाचे एनामुल्लाह यांनी हे वक्तव्य केले आहे.
महिलांना शरिया कायद्याप्रमाणे सूट आणि अधिकार देण्यात येईल. त्या आरोग्य विभागांत आणि शाळांमध्ये काम करू शकतील.
खासगी माध्यमांना स्वतंत्ररित्या काम करण्याची परवानगी असेल. परंतु पत्रकारांना अफगाणिस्तानच्या मूल्यांचे पालन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
कामगारांना कामावर येण्याचे आवाहन
अफगाणिस्तानमधील सर्व कर्मचार्यांना कामावर परतण्याचे आवाहनही तालिबानतर्फे करण्यात आले आहे. लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार करावे, त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे.
१५० नागरिकांना घेऊन
भारतीय विमान परतले
सध्या अफगाणिस्तान, काबूलमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. याच दरम्यान सेनेचे सी-१७ हे विमान १५० भारतीय नागरिकांना घेऊन काबूलहून जामनगर येथे पोहोचले आहे. या विमानात दुतावासचे कर्मचारी तसेच काही पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकही आहेत. काबूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय नागरिक अडकले आहेत.
सत्तासंघर्ष तीव्र होणार
अफगाणिस्तानचे फर्स्ट वाइस प्रेसिडेंट अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. याचवेळी तालिबानने मुल्ला बरादरचे नाव राष्ट्राध्यक्ष म्हणून पुढे केले आहे.
भारतीयांना सुरक्षित आणणार ः मोदी
अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित होते. मोदींनी बैठकीत भारतीयांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे आणण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
काश्मीरप्रश्न हा भारत
पाकचा अंतर्गत मुद्दा
तालिबानने काश्मीर प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार त्यांनी काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात आम्ही लक्ष घालणार नाही. तो द्विपक्षीय प्रश्न असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान, भारताकडून काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.