>> आमदार विजय सरदेसाई यांचे गंभीर आरोप
>> दोन्ही घोटाळ्यांचा योग्य दिशेने तपास नाही
गेल्या जवळपास दीड वर्षापूर्वी उघडकीस आलेला जमीन घोटाळा आणि त्यानंतर गत नोव्हेंबर महिन्यात गाजलेल्या सरकारी नोकरी घोटाळ्यावरून आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारी नोकरी घोटाळ्याचे गूढ कायम आहे, तरीही राज्य सरकारकडून सरकारी नोकरी घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे काम केले जात आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी जुने गोवे येथे पत्रकारांशी बोलताना काल केली. याशिवाय राज्यातील जमीन घोटाळा प्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही. सरकारच जमीन घोटाळ्यात गुंतलेले आहे, असा गंभीर आरोप सरदेसाई
यांनी केला.
राज्यात सध्या सुरू असलेल्या उत्सव आणि मोठ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे नोकरी घोटाळ्यावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोव्यात शिक्षणाचे महत्त्व नोकरी घोटाळ्यामुळे कमी झाले आहे. शिक्षणात हुशार असलेली मुले सरकारी नोकरीच्या परीक्षेवेळ दलालांना निर्धारित रक्कम देऊ शकत नसल्याने त्यांना नापास केले जात आहे. आणि इतरांकडून पैशांच्या जोरावर सरकारी नोकऱ्या मिळविल्या जात आहेत, अशी टीका आमदार विजय सरदेसाई
यांनी केली.
पोलिसांनी नोकरी घोटाळ्याबाबत योग्य पद्धतीने तपास करून या घोटाळ्याच्या सूत्रधारांना ताब्यात घ्यायला हवे होते. या प्रकरणातील ‘गॉडफादर’ आणि ‘गॉडमदर’ला लोकांच्या समोर आणायला हवे, अशी खोचक टीका सरदेसाई यांनी केली.
नोकरी घोटाळ्यातील एका संशयित आरोपीने नोकरीसाठी पैसे दिलेल्या 46 जणांची नावे दिली होती. पोलिसांनी त्यातील किती जणांची चौकशी केली, असा सवाल करत, नोकरीसाठी पैसे दिलेल्या व्यक्तींना त्यांचे पैसे परत देऊन प्रकरण मिटविली जात आहे, असा आरोप आमदार सरदेसाई यांनी केला.
राज्यातील जमीन घोटाळा प्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही. सरकारच जमीन घोटाळ्यात गुंतलेले आहे, असा गंभीर आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
जमीन घोटाळा प्रश्नी 48 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील केवळ 4 गुन्ह्यांबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख संशयित आरोपी पोलीस कोठडीतून पळून जातो ही गंभीर बाब आहे. भाजपने जमीन घोटाळा प्रश्नी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असेही सरदेसाई म्हणाले.