सरकारच्या दुर्लक्षामुळेच कोरोना बळींत वाढ

0
15

>> कॉंग्रेसचा आरोप; १०० टक्के लसीकरणाचा दावा पूर्णपणे खोटा

भाजप सरकारने कोविडच्या तिसर्‍या लाटेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळेच दररोज १० ते २० कोविड रुग्ण मृत्यूमुखी पडत असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला.

काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक म्हणाल्या की, आरोग्य खात्यातील गैरकारभारामुळे राज्यात कोविडचे रुग्ण मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. आतापर्यंत राज्यात कोविडमुळे ३७०० हून अधिक रुग्ण दगावलेले असून, अजूनही दररोज १० ते २० रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. मात्र, असे असतानाही सरकार व आरोग्य खाते कोविडची तिसरी लाट धोकादायक नसल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. दररोज १० ते २० कोविड रुग्ण मृत्यूमुखी पडत असताना सगळे काही आलबेल असल्याची भाषा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कहरच केला आहे. भाजप सरकारला व आरोग्य खात्याला राज्यातील लोकांच्या आरोग्याची चिंता नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोपही नाईक यांनी यावेळी केला.

राज्यातील १०० टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आलेला सरकारचा दावा हा खोटा आहे, याचे पुरावे आता समोर येऊ लागले आहे. दररोजच्या मृतांपैकी किती जणांनी लस घेतली होती व किती जणांनी घेतली नव्हती, याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात येत आहे. त्यातील मृत्यूमुखी पडणार्‍यांपैकी बहुतेक जण हे लस न घेतलेले आहेत, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झालेले आहे, तर लस न घेतलेले बळी कुठून निपजू लागले आहेत, असा सवाल नाईक यांनी केला. तिसरी लाट येऊन एक महिना होऊन गेला; पण अजूनही गोमेकॉ इस्पितळ सोडल्यास कुठेही कोविड रुग्णांसाठी खाटा नाहीत. मडगाव, फोंडा, म्हापसा व अन्य ठिकाणी पहिल्या व दुसर्‍या लाटेच्या वेळी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता सदर शहरांतील इस्पितळात कोविड रुग्णांसाठी खाटा का उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

जिनोम सिक्वेन्सिंग मशीन आणलेच नाही
अजूनही सरकारने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठीचे मशीन आणले नाही, यावरुन सरकारने कोविडच्या दोन लाटांपासून कोणताही धडा घेतलेला नाही, हे स्पष्ट होत आहे. सदर मशीन नसल्याने सध्या राज्यात जो कोविड रुग्ण सापडत आहे, तो ‘डेल्टा’ की ‘ओमिक्रॉन’चा आहे, तेच कळेनासे झाले आहे. रुग्णांच्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी पुण्यात पाठवण्यात येणार्‍या नमुन्यांचे अहवाल हाती येण्यास महिनाभरापेक्षा जास्त वेळ लागतो, असे बीना नाईक म्हणाल्या.