>> आर्थिक स्थितीसह राज्यावरील कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढा : कॉंग्रेस
राज्यात भाजप सरकार २०१२मध्ये सत्तेवर आल्यापासून सरकारने काढलेले कर्ज तीन पटींनी वाढून ते आता २०४८५ कोटी रु. एवढे झाले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात जीएसटी लागू करण्यात आल्यापासूनची राज्याची आर्थिक स्थिती तसेच सरकारने या काळात किती कर्ज घेतले व राज्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे व सरकार त्यासंबंधी काय तोडगा काढू पाहत आहे त्यासंबंधीची एक श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणीही चोडणकर यांनी यावेळी केली. २०१२ पूर्वी जेव्हा राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर होते तेव्हा सरकारी कर्जाचे प्रमाण ७ हजार कोटी रु. एवढे होते असे चोडणकर यांनी नमूद केले.
२०१२ पासून आतापर्यंत सत्तेत असलेल्या भाजप सरकारने गोव्याला आर्थिक संकटात टाकल्याचा आरोपही चोडणकर यांनी यावेळी केला. २०२२ सालापर्यंत सरकारी कर्ज २२ हजार कोटींवर पोचेल, अशी भीतीही चोडणकर यानी यावेळी व्यक्त केली.
पर्यटन मेळाव्याच्या
कंत्राटात घोटाळ्याचा आरोप
पर्यटन खात्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून राज्यस्तरीय मार्केटींग व प्रोमोशन समितीला अंधारात ठेवून तसेच निविदेतील अटी व नियम बाजूला सारून गोवा आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट- २०१९ (जीआयटीएम) चे रु. ४.९७ कोटींचे कंत्राट मुंबईच्या मेसर्स अलिका पर्पल ऍडव्हर्टायझिंग या कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केला.
गोव्यातील पर्यटन क्षेत्रात वावरणार्या ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेने सदर पर्यटन मेळावा पुढील वर्षी आयोजित करण्याची केलेली मागणी धुडकावून केवळ आपल्या स्वार्थापोटी सदर जीआयटीएम २०१९ चे आयोजन पुढील काही दिवसात आयोजित करण्याचा बेत पर्यटन मंत्र्यांनी आखला असावा, असे चोडणकर म्हणाले. मात्र, पर्यटन खात्याच्या संकेत स्थळावर सदर मेळाव्यासंबंधी कसलीही माहिती उपलब्ध नसल्याने सदर मेळावा आयोजित न करताच केवळ कागदोपत्री दाखवून पैसे उकळण्याचा बेत तर नसावा ना, असा संशयही चोडणकर यानी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मेळावा रद्द करावा व गौडबंगल केलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी चोडणकर यांनी केली.