>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हापशातील प्रचारसभेत आवाहन; प्रशासनात गोवा देशासाठी आदर्श
गोव्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. डबल इंजिन सरकारमुळेच हे शक्य झाले आहे. सरकारी योजनांचा १०० टक्के लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजप काम करीत आहे. त्यामुळे गोवा हे सामाजिक न्यायाचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. गोव्याला आणखीन समृद्ध करून सोनेरी गोवा बनविण्यासाठी भाजपला संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले.
म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानच्या पटांगणात भाजपतर्फे आयोजित जनसंकल्प प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, खासदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री जयकिशन रेड्डी आणि भाजपच्या उत्तर गोव्यातील उमेदवारांची उपस्थिती होती.
यावेळी गोवा या शब्दाची इंग्रजी फोड करून त्याचा अर्थ मोदींनी सांगितला. गोवा या शब्दाचा अर्थ सुशासन, संधी आणि आकांक्षा असा आहे. प्रशासनाच्या बाबतीत गोवा देशासाठी आदर्श आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
नेहरुंमुळे गोवा मुक्तीला उशीर
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोवा मुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवा १५ वर्षे गुलामगिरीत राहिला. यातून कॉंग्रेस पक्ष गोव्याबद्दल गंभीर नाही हे स्पष्ट होते. तथापि, आता मात्र कॉंग्रेस स्वार्थासाठी गोव्यातील लोकांचा वापर करीत आहे, अशी टीका मोदींनी केली.
पर्रीकर, डिसोझांची काढली आठवण
गोव्याचा उल्लेख केल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण होते, तसेच फ्रान्सिस डिसोझा यांची देखील आठवण येते. दोघांच्या अकाली निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे, असेही मोदी म्हणाले.
पर्यटन उद्योगाला नवी ताकद
केंद्रीय अर्थसंकल्पात लघुउद्योग, हॉस्पिटालिटी उद्योगांना आर्थिक साहाय्य देण्याच्या प्रस्तावामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला नवी ताकद मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योगाला झळ बसली आहे. लघू उद्योगांना ५ लाख कोटी, तर हॉस्पिटॅलिटी उद्योगांना ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोपा विमानतळामुळे पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यास मदत होणार आहे. तसेच गोव्यातील व्यापारी गुंतवणुकीत मोठी वाढ होणार आहे, असेही मोदी म्हणाले.
आता दरवर्षी ८० लाख पर्यटक गोव्यात
भाजपच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे. रस्ते सुधारणा, सागरमाला प्रकल्प, पर्यटन विकास प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गोव्यात पूर्वी केवळ ठराविक हंगामात पर्यटक येत होते. आता वर्षभर देशी आणि विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. २०१२ पर्यंत २५ लाख पर्यटक दरवर्षी भेट देत होते. आता भाजपच्या कार्यकाळात जवळपास ८० लाखांहून पर्यटक गोव्यात येतात, अशी आकडेवारी मोदींनी सादर केली.
… तर लसीकरण झालेच नसते
आज डबल इंजिनचे सरकार नसते, तर १०० टक्के लसीकरण झालेच नसते. लसीकरणाचे ध्येय पूर्ण झाले नसते, तर देशी-विदेशी पर्यटक गोव्यात आलेच नसते, असेही मोदी म्हणाले.
पुढील ५ वर्षे समृद्धीची : मुख्यमंत्री
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह अन्य नेते आणि उमेदवारांची भाषणे झाली. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत २२ जागा जिंकण्याचा संकल्प केला असून, मतदारांकडून मिळणार्या वाढत्या पाठिंब्यामुळे हा संकल्प पूर्ण होणार आहे. भाजपने गेल्या १० वर्षात स्थिर आणि विकासात्मक सरकार दिले असून, पुढील ५ वर्षे समृद्धीची आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दिगंबर कामत यांना आव्हान
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना गेल्या दहा वर्षांतील विकास आणि योजनांची सुरू असलेली कार्यवाही दिसत नाही. कामत यांनी त्यांच्या कार्यकाळातील लोकांसाठी सुरू केलेली एकतरी योजना सांगावी, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
गोव्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी : पंतप्रधान
गोव्याने आपले जीवन निर्णायक बनविले आहे. म्हापसा येथे २०१३ मध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीचा प्रमुख म्हणून आपली निवड करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून देखील गोव्यातच घोषणा करण्यात आली. तसेच कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना गोव्यातूनच समोर आली. त्यानंतर आता कॉंग्रेसमुक्त भारत हा कोट्यवधी भारतीयांचा संकल्प बनलेला आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘त्या’ पक्षांना जनता स्वीकारणार नाही : मोदी
गोव्यात काही राजकीय पक्ष स्वार्थासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे गोव्याच्या विकासाची योजना आणि दूरदृष्टी नाही. या राजकीय पक्षांकडून गुंडगिरीला पाठीशी घातले जात आहे. गोवा हे शांती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे राज्य आहे. त्यामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण करणार्या राजकीय पक्षांना गोमंतकीय जनता स्वीकारणार नाही, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.