– प्रा. रमेश सप्रे
एक उद्बोधक प्रसंग. मूर्तींचं प्रदर्शन. मूर्तिकार स्वतः उपस्थित. प्रवेशद्वाराजवळ एक अप्रतिम मूर्ती. एका सुंदर स्त्रीची तिच्याहून सुंदर मूर्ती. तिचा देह, वस्त्रं, अलंकार सर्वांतून सौंदर्य व्यक्त करणारी.. सर्वांना मूर्तिमंत सौंदर्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी. या मूर्तीपासून काही अंतरावर मूर्तिकार उभा. त्याला कोणीच ओळखत नव्हतं. त्याचा उद्देश एकच होता- आपल्या या मूर्तीचं खरं रसग्रहण (ऍप्रिशिएशन) करणार्या रसिकाला नमस्कार करायचा.
येणारा प्रत्येक जण ही मूर्ती पहायचाच. ‘अप्रतिम! लाजवाब! हाऊ ब्युटिफुल!’ असे उद्गार सर्वजण काढत होते. पण ती प्रतिक्रिया होती, मूर्तीच्या सौंदर्याचं, कलेचं रसग्रहण नव्हतं. काही तरूण मुलं आली. सर्वांनी मूर्ती पाहताच ‘व्वा! किती सुंदर!’ हे उद्गार काढले. पुढे त्यातले काहीजण म्हणाले, ‘इथं मूर्तिकार असेल, तर या मॉडेलचा (मूर्तीतील स्त्रीचा) पत्ता विचारला पाहिजे. मूर्तीच इतकी सुंदर तर जिला समोर ठेवून ही मूर्ती तयार केली ती स्त्री किती सुंदर असेल?’- मूर्तिकाराला वाईट वाटलं कारण त्यांना कलेपेक्षा स्त्रीच्या जिवंत देहाचं आकर्षण होतं.
दुसरा एक जण आला व जोरात म्हणाला, ‘अप्रतिम!’ नंतर बरोबर असलेल्या आपल्या सचीवाला (सेक्रेटरीला) म्हणाला, ‘इथं मूर्तिकार असेल तर त्याला विचारलं पाहिजे- एकही काळा ठिपका नसलेला इतका शुभ्र स्वच्छ संगमरवरी दगड त्याला कुठं मिळाला?’ मूर्तिकाराच्या लक्षात आलं की तो एक दगडाचा व्यापारी आहे.
काही वेळानं एक पागोटं घातलेला, अशिक्षित दिसणारा गावाकडचा माणूस आला. प्रथम मूर्तिकारानं त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. पण तो माणूस एकटक त्या मूर्तीकडे पाहातच राहिला. मूर्तिभोवती प्रदक्षिणा घालून तिचं संपूर्ण सौंदर्य पाहिलं. नंतर गुडघे टेकून, हात वर आकाशाच्या दिशेनं करून पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, ‘देवा, तू महान आहेस!’ मूर्तिकाराला राग आला. मूर्तिकार आपण असताना हा वेडा देवाला महान का म्हणतोय? तसं त्याला विचारल्यावर तो मूर्तिकाराला म्हणाला, ‘ज्या दगडात मूर्ती बनवलीय तो दगड काय तू घडवलायस? अन् ती हातोडी व छिन्नी तीही तू बनवलीस.. तो धातू तू तयार केलास? अन् तुझी कला? .. आकाशातून खाली येऊन तुझ्यात शिरली की तुला कुणीतरी गुरुंनी शिकवली? जगातल्या अगदी पहिल्या मूर्तिकाराला ही कला कुणी व कशी शिकवली?’
… एकामागून एक विचारलेल्या प्रश्नांनी तो मूर्तिकार गोंधळून गेला. यावर तो गावाकडचा माणूस म्हणाला, ‘हे सारं देवानंच तर घडवलं. म्हणून मी त्याला धन्यवाद दिले नि ‘महान’ म्हणालो.. यात काही चुकलं का? मी अडाणी माणूस आहे.’
‘हे खरं रसग्रहण’ असं मनात म्हणत त्या मूर्तिकारानं त्या साध्या गावकर्याला नमस्कार केला.
या कथेतला विरोधाभास महत्त्वाचा आहे. मूर्तीच्या कलेपेक्षा जिवंत स्त्रीला किंवा दगडाला महत्त्व देणारे एका बाजूला तर दुसर्या बाजूला तो गावकरी ज्याच्या दृष्टीनं सार्याच्या मुळात देवच आहे. मूर्तीत तर तो परमेश्वर आहेच.. पण त्या दगडातही आहे .. हातोडीच्या प्रहारात नि छिन्नीच्या धारेतही तोच आहे. मूर्तिकारात तर परमेश्वर आहेच. याची जाणीव होणं हे खरं विभूतिदर्शन!
सगळीकडे भरून राहिलेला परमेश्वर पाहणं ही जीवनाकडे पाहण्याची एक चांगली दृष्टी आहे. ‘वासुदेवः सर्वम् इति|’ पण कितीही झालं तरी हा सिद्धांत आहे. त्याचा व्यवहार होणं महत्त्वाचं आहे. यासाठी भगवंतानं स्वतःला कुठं कुठं ठळकपणे किंवा प्रामुख्यानं पाहायचं हे सांगण्यासाठी स्वतःच्या विभूती सांगितल्यायत. अर्जुनाचा प्रश्नच तसा आहे.
कथं विद्याम् अहम् योगिन् त्वाम् सदा परिचिंतयन|
केषु केषु च भावेषु चिन्त्यः असि भगवन् मया ॥
म्हणजे हे योगेश्वरा (योगिन्), मी कशा रीतीने सदा चिंतन करत (परिचिंतयन्) आपणाला जाणावे आणि कोणत्या कोणत्या भावांनी (केषु केषु भावेषु) माझ्याकडून आपलं चिंतन केलं जावं? पुढे अर्जुन स्वतःच म्हणतो-
विस्तरेण आत्मनो योगं विभूतिं च जनार्दन |
हे जनार्दना, आपल्या योग शक्तीला (आत्मनः योगम्) आणि विभूतींना विस्तारानं सांगा. गीतेतल्या दहाव्या अध्यायाला ‘विभूति योग’ म्हटलं जातं. म्हणजे भगवंताशी जोडलं जायचंच आहे (योग) पण कसं? तर त्याच्या विविध रुपातून (विभूती)!
विशेष रीतीनं (वि) जे निर्माण झालंय (भूत) त्यात परमेश्वराच्या तेजाचं, शक्तीचं, प्रभावाचं मुख्य म्हणजे अस्तित्वाचं प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे. हे म्हणजे परमेश्वराच्या लिपीत (स्क्रिप्ट) सारं विश्व वाचणं आहे. तसंच सारं जीवन पाहणं नि त्याचा अर्थ लावणं आहे. या लिपीला देवनागरी, रोमन असं न म्हणता ‘ब्राह्मी लिपी’ म्हटलं जातं. ही लिपी चित्रांची, प्रसंगांची, घटनांची अशी असते. ब्रह्मदेव या सार्याची निर्मिती करतो. अन् ही लिपी वाचून त्यात परमेश्वराचं अखंड दर्शन व चिंतन करून ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो म्हणून हिला ‘ब्राह्मी लिपी’ म्हटलं जात असावं.
भगवंतांनी आपल्या अनेक विभूती सांगितल्यायत. आपल्या अनेकानेक रूपातली विशेष रूपं सांगितलीयत. यात निसर्गातले नदी, पर्वत; प्राण्यातले हत्ती, घोडा; व्यक्तीतले राम, भृगु, कपिल; मानवाच्या संस्कृतीतले मंत्र, छंद, इ.इ. अनेक विविध उदाहरणं दिलेली आहेत. ती वाचून त्यावर सतत सर्व बाजूंनी चिंतन(सदा परिचिंतन) करत राहिलं पाहिजे. यासाठी त्या त्या विभूतींचा अर्थ, ऐतिहासिक पार्श्वभूमी, आपल्या जीवनातील महत्त्व अशा विविध अंगांनी विचार केला पाहिजे. या कृतीतून अतिशय आनंद व शांतीचा अनुभव मिळतो. जीवन समृद्ध होऊन जातं. उदा. सर्व घोड्यात मी आहेच. पण अर्जुना, उच्चैःश्रवा अश्वात मी विशेष रुपात असतो. ‘उच्चैःश्रवा’ याचा अर्थ दूरदूर आवाज ऐकू जाणारा, वरच्या स्वरात ध्वनी करणारा (ओरडणारा) हा घोडा म्हणजे अश्व आहे. अश्व शब्दाचा अर्थ याक्षणी आहे तसा पुढच्या क्षणी नाही. सतत बदलणारा, नष्ट होत जाणारा, संपणारा किंवा मरणारा. आपल्या इंद्रियांना (म्हणजेच देहाला) अश्व म्हटलं जातं. कारण तो मर्त्य आहे. विनाशी, अशाश्वत आहे. तरीही आपण आपलं नाव, प्रसिद्धी किती वरच्या स्वरात करत असतो. आपलं कार्य, कीर्ती दूरदूर जावी, सदैव टिकावी असे प्रयत्न करत असतो. – उच्चैःश्रवा हा श्रेष्ठ अश्व आहे. मानवही श्रेष्ठ प्राणी आहे. उच्चैःश्रवात भगवंताचं दर्शन घेतानाच चिंतनही करावं असं गीतेचं सांगणं (समुपदेशन) आहे. सर्व विभूतींचं असं चिंतन करता येतं. यामुळे सदा सर्वत्र भगवंताचा अनुभव येतो व जीवन आनंदानं भरून जातं. चैतन्यानं भारून जातं. अगदी धन्य धन्य वाटत राहतं. याचा अनुभव मात्र घेऊन बघायला पाहिजे- सर्वत्र देवत्वाचं दर्शन नि दिव्यत्वाची अनुभूती!
अशा अनेक विभूती उदाहरणादाखल सांगून भगवंत म्हणतात की माझ्या विभूती असंख्य आहेत. किती म्हणून सांगू? पण शेवटी अर्जुनाला या विभूतिदर्शनाचा सिद्धांत सांगायला भगवंत विसरत नाहीत. नेहमीप्रमाणे हा महत्त्वाचा सिद्धांत जसा अर्जुनासाठी आहे तसाच- आपल्यासाठीही आहे. भगवंताचे शब्द आहेत-
यत् यत् विभूतिमत् सत्त्वम् श्रीमत् ऊर्जितम् एव वा|
तत् तत् एव अवगच्छ त्वम् मम तेनोंऽशसंभवम्॥
म्हणजे जी जी ऐश्वर्ययुक्त (विभूतिमत्), श्रीमत् (सौंदर्य, वैभवयुक्त), शक्तिसंपन्न (ऊर्जितम्), सत्त्वम् (सात्त्विक) वस्तू (वा व्यक्ती) आहे ती ती माझ्याच तेजाच्या अंशापासून निर्माण झालीय हे जाण (विचार करून समजून घे). जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत हे शब्द!
विभूतीचा एक अर्थ भस्म, अंगारा असाही आहे. आपण श्रद्धापूर्वक कपाळाला अशी विभूती लावतो मग ती यज्ञातली पवित्र रक्षा (राख) असो किंवा चिताभस्म असो किंवा धरतीची माती असो (अनेक खेळाडू, शूरवीर अशा मातीचा तिलक लावूनच मैदानात उतरतात.)! त्याचप्रमाणे विभूती म्हणजे महान व्यक्ती…
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती |
देह कष्टवीती उपकारे ॥
विविध क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वं, महापुरुष, महामानव, महात्मे या सार्या भगवंताच्या विभूती आहेत त्यांना वंदन करून त्यांच्या कार्याचं चिंतन केलं पाहिजे नि त्यांच्या जीवनाला वंदन करून योग्य ती प्रेरणा घेतली पाहिजे.
भगवंतांनी विभूतिमत्वाचे चार प्रमुख पैलू सांगितलेयत. काही उदाहरणं पाहू या.
१) विभूतिमत् – म्हणजे ऐश्वर्ययुक्त, ईश्वराच्या विशेष रूपाचं, तेजाचं अस्तित्व असणारं – निसर्गातील भव्य प्रपात (धबधबे); उंच उंच हिमशिखरं; इंद्र धनुष्याची सप्तरंगी कमान; सागराची नि आकाशाची असीम निळाई, सृष्टीत आढळणारी चैतन्याची उदंड हिरवाई या सार्यात भगवंताचं विभूतिमत्त्व दिसून येतं. जगातील ताजमहाल, चीनची भिंत, इजिप्तमधले पिरॅमिड्स, आयफेल टॉवर अशा मानवनिर्मित आश्चर्यात हे विभूतिमत्त्व दिसतंच. पण सृष्टीतील कोळ्यांची एखाद्या कशिद्यासारखी दिसणारी जाळी तशीच पिंपळाची पानं दडपून ठेवल्यावर कालांतरानं त्याच्यावर दिसून येणारी जाळी; रेशीमकिड्याचा कोश नि मधमाशांचं पोळं; फुलपाखराच्या पंखांवरची नाजूक नक्षी.. कोकिळेचा पंचम सुरातला आवाज.. मोरांचा रंगीबेरंगी मनोहर पिसारा … अशा सर्व गोष्टीत अद्भुताचं दर्शन होतं. तिथं नतमस्तक होऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं असतं.
सहज म्हणायचं झालं तर मस्तानीची आरस्पानी कांती, मोनालिसाचं गूढ हास्य, क्लिओपात्राचं रेखीव प्रमाणबद्ध नाक अशा ऐतिहासिक गोष्टीही विभूतींचं स्मरणदर्शन घडवतात.
२) सत्त्वम् – म्हणजे सात्त्विकता, पावित्र्य, शुचिता. अनेक वस्तूंमध्ये तेजाचा अनुभव येतो मग ती हिरेमाणकं असोत की भक्त प्रल्हाद, बुद्धिमान नचिकेता, निग्रहवान ध्रुव किंवा नरवीर तानाजी, झाशीची राणी, भगतसिंग किंवा अशाच अनेक अलौकिक, असामान्य व्यक्ती असोत सात्त्विक भावाचं, ध्येयनिष्ठेचं दर्शन आपल्याला होतंच. चिंतन मात्र करायला हवं. राजा हरिश्चंद्राचं चारित्र्य, युधिष्ठिराची सत्यप्रियता, गांधीजींचा अहिंसामय सत्याग्रह, स्वामी विवेकानंदांचा दुर्दम्य आत्मविश्वास या सार्यात सात्त्विकतेच्या प्रभावाचा अनुभव घ्यायला हवा.
३) श्रीमत् – श्री म्हणजे वैभव, समृद्धी, सौंदर्य. ‘श्री’ शक्तीत केवळ ‘स्त्री’ शक्तीचंच नव्हे तर देवीशक्तीचं दर्शन व्हायला हवं. श्रीसूक्त हे केवळ मखरातल्या सरस्वतीचं किंवा देवघरातल्या लक्ष्मीचं स्तोत्र नाही तर निसर्गदेवतेच्या समृद्धीचं दर्शन घडवणारं व निसर्गमातेशी कृतज्ञ राहण्याची प्रेरणा देणारं सूक्त आहे. एका बीजातून अनेक फळं व वृक्ष, एका दाण्यातून अनेक दाण्यांची अनेक कणसं हे ते ‘श्रीमत्’ तत्त्व आहे. ‘श्रीकृष्ण’ या शब्दातच श्री म्हणजे राधा-रुक्मिणी सार्या शक्तींचं श्रीकृष्णाबरोबरचं एकरुपत्व व्यक्त होतं. तेच श्रीयुत-श्रीमती असतं. त्याचा विकास व्हायला हवा.
कर्णाचं औदार्य, कौपीन (लंगोटी) घातलेल्या संतांची श्रीमंती, विश्वजित् यज्ञानंतर सर्व दान करून वल्कलधारी बनलेल्या रघुराजानं आपल्या शौर्याच्या प्रभावानं कुबेराकडून कोट्यवधी सुवर्णमुद्रा ऋषिपुत्र कौत्सासाठी मिळवण्यातलं वीर्यशौर्याचं तेज या सार्या ‘श्रीमत्’च्या आविष्कारात भगवंताचं दर्शन घेणं म्हणजेच विभूतियोगाचं पालन!
४) ऊर्जितम् – ऊर्जा म्हणजे बळ, सामर्थ्य, शक्ती. अथक परिश्रम, प्रचंड सामर्थ्य, निरंतर उद्यमशीलता म्हणजे भगवंताचं ‘ऊर्जित’ रूप! क्रीडापटू, कलावंत, वैज्ञानिक, संशोधक, निसर्गातील रहस्यांचा वेध घेणारे साहसवीर या सर्वांत ऊर्जेचा अनुभव येतो. त्यांच्या पराक्रम-विक्रमाच्या एकेक कथा आपल्याला नम्र बनवतात. आपोआप आपले हात जोडले जातात. अनेकांना असा अनुभव येत नाही म्हणून ते भगवंताच्या विभूतिगंगेत सतत असूनही कोरडेच राहतात. त्यांच्या जीवनात खरा रसरंग भरतच नाही. ते नावापुरतेच रसिक रंगेल असतात.
अणुऊर्जा, पवनऊर्जा, सौरऊर्जा ही भौतिक ऊर्जेची (फिजिकल् एनर्जी) उदाहरणं आहेत पण त्याहूनही प्रचंड ऊर्जा असते मानवाच्या बुद्धीत-दृष्टीत-श्रुतीत-रुचीत एकूण सर्वच अनुभवात. मानवाची कल्पकता, नवनिर्माणक्षमता (क्रिएटिव्हिटी) संपूर्ण विश्वाला गवसणी घालायला समर्थ आहे. त्याचा अनुभवही अनेकवेळा येतच आहे.
विभूतींच्या दर्शनचिंतनानं आपलं जीवन शांतसमृद्ध बनवण्यासाठी-
* वस्तू-व्यक्तींना पाहण्याऐवजी त्या घडवणार्या शक्तीला नि त्यांच्यात दडलेल्या ईश्वरी चैतन्याला पाहू या.
* आपली सारी कलाकुसर, आपलं वक्तृत्व, कर्तुत्व, नेतृत्व सारी सुधारणा, संस्कृती यांच्या मुळाशी असलेल्या शक्तीची (विभूतीची) जाणीव व त्यासाठी त्या अलौकिक शक्तीचं कृतज्ञ स्मरण करण्याची वृत्ती जपू या.
* ‘सारे करणे जगदीशाचे’, सार्याचा कर्ता परमेश्वर (प्रेरक शक्ती) हा भाव मनात रुजवला तर सार्या रॉयल्टी-कॉपीराइट-पेटंटच्या कल्पना केवळ व्यवहारात राहतील पण डोक्यात चढणार नाहीत.
शेवटी सप्तर्षीतली अरुंधती दाखवून ध्रुवतार्याचं दर्शन घ्यायचं असतं. तसंच सर्वत्र विभूती पाहून विधात्या भगवंताचं दर्शन घ्यायचं असतं. म्हटलं तर हे खूप सोप्पं आहे ना?