समुपदेशन गीतेतून – प्रयाणकाले मनसाऽचलेन…

0
401

– प्रा. रमेश सप्रे

आपण सारे प्रवासी… हा अनुभव आज सर्वांचाच झालाय. काही म्हणतात ‘आम्ही सारे प्रवासी घडीचे’ म्हणजे घटका(घडी)भरचे. अनंत काळाच्या दृष्टीनं अल्प आयुष्य असलेले. ज्ञानोबा माऊली म्हणते .. माणसाचं जीवन म्हणजे ‘अग्नीत टाकलेली लोण्याची उंडी’ – आगीत टाकलेला – सतत वितळत, जळत, संपत असलेला लोण्याचा गोळा. किती काळ हे जीवन असतं? तर ‘माशी पांख पाखडी तव हे सरे॥ म्हणजे माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच काळ आपलं आयुष्य. हे तर निमिषार्धापेक्षाही कमी आयुष्य झालं. निमिष म्हणजे माणसाच्या पापणीला एकदा उघडझाप करायला लागणारा वेळ. आयुष्य इतकं क्षणिक – क्षणभंगूर!

यावर काही जण म्हणतील, ‘शंभर – शंभर वर्षंही माणूस जगू शकतो तर क्षणिक काय? नि क्षणभंगूर कसं?’… हा झाला वरवरचा विचार. जरा खोलवर विचार केला तर साधुसंत आयुष्याबद्दल जे म्हणतात त्याची सत्यता लक्षात येईल. आद्य शंकराचार्य त्यांच्या काव्यमय शैलीत आपल्या आयुष्याबद्दल म्हणतात- ‘नलिनीदलगत जलमतितरलम्’ म्हणजे कमळाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखं अतितरल – अत्यंत अस्थिर व अल्पकाळ टिकणारं. कमळाच्या पानाला पाणी बिलकुल चिकटत नाही. त्याच्यावर पडलेला जलबिंदू टिचकी मारली तरी किंवा वार्‍याच्या झुळकेबरोबर सहज गळून पडतो.
याबरोबर जीवनात जर काही मुक्त करणारं साधन केलं नाही तर .. जन्ममृत्यूच्या येरझारा अखंड चालूच राहतात – ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं|
पुनरपि जननी जठरे शयनम्‌॥
या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी मृत्यू कसा यायला हवा! खरं म्हणजे असा मुक्तिदायक मृत्यू येण्यासाठी त्यापूर्वीचं जीवन कसं असायला हवं? कसं जगायला हवं?
या दृष्टीनं भगवंत प्रभावी समुपदेशन करताहेत. अर्जुनाचा या संदर्भातला प्रश्‍न अगदी सरळ व स्पष्ट आहे. अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. त्यानं आपल्या वतीनं हा प्रश्‍न विचारलाय.
‘प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥
म्हणजे परमात्म्याशी ज्याचं चित्त अखंड जोडलेलं आहे (नियतात्मभिः) अशा व्यक्तीकडून मृत्यूसमयी (प्रयाणकाले) तू कशाप्रकारे जाणला जातोस? (कथं ज्ञेयः असि) याचा अर्थ तुझ्या परमात्मरूपात कोण मिसळून जातो? मुक्त कोण होतो? पुन्हा जन्म न येण्यासाठी अंतकाळी तन-प्राण-मन-बुद्धी यांची अवस्था कशी असली पाहिजे?
याला भगवंतांनी दोन प्रकारांनी उत्तर दिलंय. एक म्हणजे तन (इंद्रियं) व प्राण यांची स्थिती व दुसर्‍या पद्धतीनं मन – बुद्धी – चित्ताची अवस्था मृत्युसमयी मुक्ती मिळवण्यासाठी कशी असावी हेही विस्तारानं सांगितलंय. इथं हेही लक्षात घ्यायला हवं की विचार वरवर जरी जन्म-मृत्यू-पुनर्जन्म-मुक्ती असा अनेकांना न पटणारा असला तरी भगवंताच्या समुपदेशनातील संदेश व संस्कार संपूर्णतः जीवनाविषयीच आहे. ‘मजेत जगावे कसे…’ ‘आनंदी जीवनाचं रहस्य’ ‘ताणमुक्त मन, चिंतामुक्त जीवन’ अशा आशयाच्या ग्रंथातील मार्गदर्शन (टिप्स) जरी आजच्या जीवनशैलीशी सुसंगत असलं तरी मूळ विचार गीतेतील व श्रीकृष्णाच्या जीवनाशी समांतर असाच असतो. भगवंताच्या मार्गदर्शनातील मुख्य मुद्दे कोणते आहेत?
‘प्रयाणकाले मनसाऽचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव|
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परमं पुरुषं उपैति दिव्यम् ॥
१. प्रयाणकाले – प्रयाणकाल म्हणजे निघणाचा काळ. प्रयाणगीत म्हणजे ‘मार्चिंग सॉंग’. घेतलेला प्रत्येक श्‍वास, हृदयाचा प्रत्येक ठोका, नाडीचा प्रत्येक ठोका अन् गेलेला प्राण आपल्याला सांगत असतात…
‘‘कदम कदम बढाए जा… खुशीके गीत गाए जा… ’’
पण कोणत्या तरी देशाच्या(कौम) आजादीसाठी वा मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे तर स्वतःच्या मुक्तीसाठी .. मुक्तीच्या दिशेनं चाललेल्या प्रवासासाठी.. अंतिम मुक्कामासाठी!
तसं पाहिलं तर प्रत्येक क्षणी आपण मरत असतो नि पुन्हा जन्मत असतो. आपला प्रत्येक घेतला जाणारा श्‍वास नवीन असतो. अन् ही क्रिया – प्रक्रिया आयुष्यभर चालू असते. यालाही भगवंतानं ‘प्रयाण-काल’ म्हटलंय. प्रयाण यात्रा (मार्चिंग प्रोसेशन) अखंड चालू असते. कोणत्याही क्षणी तिच्यात कायमचा खंड पडू शकतो. ‘अकस्मात आकारले काळ मोडी’ ‘मरे येक त्याचा दुजा शोक वाहे| अकस्मात तो ही पुढे जात आहे॥ ही समर्थवाणी कायम ध्यानात ठेवली पाहिजे. कोणत्याही क्षणी ‘निर्याण’ करावं लागेल याची खूणगाठ मनात बांधून ठेवली पाहिजे. ‘मरणाचे स्मरण असावे’ हे संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे त्यांचं स्वतःचं जगणं असतं. यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते?
२. मनसाऽचलेन – ‘मनसा अचलेन’ म्हणजे अचल, स्थिर, शांत मनोवृत्तीनं जो अंतकाळाला सामोरं जातो तो मुक्त होतो. गीतेतील समुपदेशनाचा एक विशेष म्हणजे भगवंताचं ज्ञान – बुद्धी – अभ्यास – विवेक यावर दिलेला लक्षणीय भर. अन् अशा आत्मज्ञानप्राप्तीसाठी अत्यावश्यक असलेला इंद्रिय संयम, विषयभोग (शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध) नियंत्रण, चित्ताची स्थिरता, मन-बुद्धीची एकाग्रता व अनन्यता. गीतेसारख्या ग्रंथात भक्तीच्या विविध पैलूंबद्दल मार्गदर्शन असणं यात काही आश्‍चर्य वाटण्यासारखं नाही. पण ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते|’ असं ज्ञानाचं अंतिम महत्त्व अन् अशा भक्ती-ज्ञानातून जीवनात साकार झालेला निष्काम कर्मयोग याविषयी अत्यंत स्पष्ट व सविस्तर समुपदेशन असणं हा मात्र गीताग्रंथाचा म्हणजेच भगवंत-अर्जुन (गुरू-शिष्य) संवादाचा विशेष आहे. त्यातही विशेष म्हणजे अर्जुनाला युद्धप्रसंगी केलेलं हे सुमारे पाचहजार वर्षांपूर्वीचं समुपदेशन आजच्या आमूलाग्र बदललेल्या काळात व सर्व दृष्टींनी ‘स्फोटक’ अशा परिस्थितीतही सुसंगत व उपयुक्त आहे.
‘मनसा अचलेन’ ही केवळ मनाची अचल(स्थिर) स्थिती नाही. तर भावना, विचार, कल्पना, निर्णयक्षमता व प्रत्यक्ष कार्यवाही किंवा जीवनपद्धती या सार्‍यांची स्थिरता (स्टॅबिलिटी) व संतुलित अवस्था (स्टेट ऑफ इक्विलिब्रियम्) आहे अन् ही फारच महत्त्वाची व अत्यावश्यक गोष्ट आहे.
जीवनातील निराशेच्या प्रसंगी एखादी तरूण प्रेयसी जेव्हा आपल्या हताश प्रियकराला उद्देशून म्हणते – ‘पायतळाशी अचला धरणी, अचल शिरी आकाश|
होशी काय उदास असा तू होशी काय उदास?’
त्यावेळी तिला आशावादाला पूरक अशी मनाची अचलताच सुचवायची असते. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे अशी अचलता, स्थिरता नि एकाग्रता.
गोकुळात असताना ज्या असुरांचा वध बालकृष्णानं व गोपाळकृष्णानं केला त्यात त्या त्या असुराचं मर्मस्थान (कमकुवतपणा) पाहून त्याचा अंत करताना हीच एकाग्रता उपयोगी पडत होती. पूतनेचं दुधातलं विष तिच्याच रक्तात पसरून तिचा जीव जाण्यासाठी तान्ह्या कान्ह्यानं घेतलेला चावा; तृणावर्ताचा केंद्रबिंदू शोधून त्यावर केलेला मुष्टिप्रहार; शकटासुराच्या चक्राकार गतीत नसलेली दिशा बदलण्याची क्षमता पाहून त्याच्यावर केलेला लत्ताप्रहार (मारलेली लाथ); बकासुराची(महकाय बगळ्याच्या रुपातल्या असुराची) फोडलेली चोच तर अघासुराच्या (अजगर रूपातल्या) कंठात शिरून त्याचा श्‍वास बंद करून, त्याची तडफड करून केलेला वध अशा सर्व एरवी बालवयात (बारा वर्षांपूर्वी) केलेल्या महापराक्रमी कृत्यात कृष्णाच्या मनाची एकाग्रता, बुद्धीची स्थिरता (मनसाऽचलेन किंवा चेतसा न अन्यगामिना किंवा अनन्यात् चिंतयंतो) दिसून येते. आज एकविसाव्या शतकातील वाढत्या हिंसेच्या, गुन्हेगारीच्या, भ्रष्टाचाराच्या जमान्यात तर आपल्याला याची खूप आवश्यकता आहे.
३. भक्त्यायुक्तः – भक्त या व्यक्तीपेक्षा भक्तीची शक्ती महत्त्वाची, हाही गीतेचा महत्त्वपूर्ण संदेश आहे. भक्त हा केवळ भक्तीचं वहन करणारं वाहन वा वाहिनी (चॅनल) आहे. सामर्थ्य असतं ते भक्तीचं. हा विचार गीतेच्या समुपदेशनात वारंवार येतो. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं’ म्हणजे साधं पान-फूल-फळ किंवा पाणी जो भक्त मला अर्पण करतो असं न म्हणता भगवंत निश्चयपूर्वक सांगतात की जो ‘भक्तीनं (भक्त्या) मला अर्पण करतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो.
आज आपल्या आजुबाजूला उपचार-विधी-कर्मकांडं यांचं अवडंबर माजवलेले असंख्य भक्त दिसतात. सर्व देवदेवतांच्या मंदिरांसमोर त्यांच्या त्यांच्या विशिष्ट दिवशी ज्या रांगा दिसतात त्यात भक्तियुक्त अंतःकरणानं भारलेले व भारावलेले कितीजण असतात? तुळशीच्या माळा, फुलांचे हार, तेलाचे डबे किंवा नारळ यांच्या खपावरून भक्तीची मात्रा (प्रमाण) ठरवणं हे वेडेपणाचं नाही का?
भगवंताला हेच सुचवायचंय. ‘मूर्तिमंत भक्ती असलेल्या द्रौपदीचं भाजीचं पान खाऊन मी तृप्त होतो तर रुक्मिणीच्या तुळशीच्या पानानं एवढा गिरिधर मी तोलला जातो, एवढंच काय पण पानही न खाणार्‍या अपर्णा पार्वतीच्या भक्तीनं मी तिच्यावर प्रसन्न होऊन तिला आपली अर्धांगिनी (शक्ती) बनवतो… पण हा सारा चमत्कार अनन्यभक्तीच्या माध्यमातून घडलेला असतो.
शबरीची उष्टी बोरं, गजेंद्रानं अर्पण केलेलं कमलपुष्प किंवा राजा रतिदेवानं अनेक दिवसांच्या उपवासानं अगदी प्राणान्त (मृत्यू) जवळ आलेला असतानाही मला एका याचकाला अर्पण केलेलं आपल्या वाट्याचं पाणी (तोयम्) हे सारं स्वीकारताना ना मला शबरीत भिल्लीण नि तिच्या बोरात उष्टेपणा दिसला; न गजेंद्राची पशुयोनी ना रतिदेवाचं राजेपण दिसलं.. मी पाहिली फक्त भक्ती – अनन्य भक्ती! ‘भक्तियुक्त अंतःकरण!’
४. योगबलेन भ्रुवोःमध्ये प्राणम् आवेश्य – भगवंत येथे मृत्युसमयी आवश्यक असलेल्या तीन गोष्टी सुचवताहेत. योगबलेन, भ्रुवोःमध्ये अन् प्राणम् आवेश्य म्हणजे योगबलानं दोन भुवयांच्या मध्ये (भ्रुवोःमध्ये) प्राण स्थापन (स्थिर) करून जो मृत्यूला सामोरं जातो तो परमात्म्यालाच प्राप्त होतो (तत् दिव्यं परमं पुरुषं एव उपैति|) म्हणजेच मुक्त होतो. हे वाचायला – बोलायला – ऐकायला – लिहायला किती सोप्पं वाटतं नाही? पण प्रत्यक्षात साधायला महाकर्मकठीण – अत्यंत अवघड पण अशक्य नाही! संत हे फार प्रत्ययकारी शब्दात सांगतात –
‘ऐकू जातां बरे वाटे | करू जाता हृदय फाटे ॥
भगवंत योगबलेन म्हणतात तेव्हा कोणता योग त्यांना सुचवायचा असतो? पातंजल योग-अष्टांग योग-हठयोग की राजयोग? तसं पाहिलं तर ज्ञान-कर्म-भक्ती या योगानंही असं मुक्तिदायी मरण येऊ शकतं. अशा मरणाला ‘प्राणोत्क्रमण’ असंही म्हणतात.
साध्या अखंड घेतलेल्या नामानंही असा मृत्यू घडू शकतो हे पू. गोंदवलेकर महाराजांनी दाखवून दिलं. एक वृद्ध गृहस्थ गोंदवल्यात येऊन राहिले होते. हेतू हा की श्रीरामासमोर व सद्गुरूंच्या (श्रीमहाराजांच्या) मांडीवर मरण यावं म्हणजेच मुक्ती मिळावी. अखंड चालू असलेलं रामनाम हेच त्यांचं साधन होतं. ज्यावेळी त्यांचा अंतिम क्षण जवळ आला त्यावेळी सर्वांना श्रीरामासमोर बोलावून त्या नामयोगी आजोबांचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन श्रीमहाराजांनी सर्वांना दाखवून दिलं की मृत्यूच्या क्षणी त्यांच्या मस्तकाच्या एका बिंदूच्या ठिकाणी (ब्रह्मरंध्र) अतिसूक्ष्म छिद्र पडून त्यातून त्यांचा प्राण गेला. या प्रसंगी श्रीमहाराज म्हणाले ते महत्त्वाचं आहे – ‘जे अत्यंत कठीण अशा योगातून साध्य होतं तेच (मुक्त करणारं मरण) साध्या नामातूनही (नामस्मरणातूनही) साध्य होतं’.
५. सम्यक् – या शब्दाचा साधासरळ अर्थ – योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे, कल्याणकारक पद्धतीनं, गीतेत युक्त (यत, नियत, संयत) असा शब्दप्रयोग वारंवार येतो. आजच्या उपभोगप्रधान, चंगळवादी जीवनशैलीत परिवर्तन (चेंज इन् लाइफस्टाइल) घडवण्यासाठी व निर्मळ आनंदात जगण्यासाठी हे ‘सम्यक्’ सूत्र आवश्यक आहे. गौतम बुद्धाच्या जीवनात व उपदेशात या ‘सम्यक्’चा प्रभावी प्रत्यय येतो.
सारांश भगवंत आपल्याला प्रयाणकाळी परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी म्हणजे मुक्त होण्यासाठी म्हणजेच शांतपणे, आनंदानं प्राणज्योत मालवण्यासाठी (मरण्यासाठी) आपली अवस्था कशी असली पाहिजे याविषयी सांगताना सुचवतात –
स्थिर मनोवृत्ती (बुद्धीची – विचारांची – स्थिरता), भक्तियुक्त (समर्पित भावनेनं भरलेलं) अंतःकरण, भुवयांच्या मध्ये योगसामर्थ्यानं योग्य प्रकारे स्थिर केलेला प्राण अशा शांत, प्रसन्न अवस्थेत झालेला देहांत हा मुक्तिदायक असतो.
भगवंताच्या समुपदेशनाचा मुख्य पैलू मृत्यूचा विचार नसून धन्य कृतार्थ जीवनाचा विचार हा आहे. मरणाचं तंत्र सांगण्यापेक्षा जगण्याचा मंत्र शिकवण्यावर भगवंताचा भर आहे. मृत्यूनंतरच्या मुक्तीपेक्षा जीवनमुक्तीवर भगवंताचा भर आहे. अंतिम प्रयाणापेक्षा नित्य कल्याणाकडे भगवंताला आपलं लक्ष वेधायचंय. कल म्हणजे पुढचा क्षण (दिवस) त्याच्याकडचा प्रवास (यात्रा) आनंदमय होण्यासाठी शुभकामना!
…………………………………………………..