समुपदेशन गीतेतून : क्षिप्रं भवति धर्मात्मा…

0
244

– प्रा. रमेश सप्रे

भगवंतांनी गीतेत अनेक ठिकाणी अर्जुनाला (म्हणजेच आपल्याला) काही आश्‍वासनं, काही आज्ञा दिल्या आहेत. पण क्वचित् भगवंत आपली प्रतिज्ञाही व्यक्त करतो व नीट विचार करून त्या प्रतिज्ञेवर विश्‍वास ठेवून त्यासंबंधी सांगितलेली गोष्ट करायला सांगतात.

नववा अध्याय हा गीतेचा मध्यवर्ती अध्याय आहे. त्यातली भगवंताची भाषाशैली व समुपदेशन पद्धती पाहून ज्ञानोबा ‘श्रीकृष्णाचे नवमीचे बोलणे..’ असे उद्गार काढतात. भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेली सगळीच अमृतासम आहेत. भगवंताचे सर्व शब्द गोड आहेत कारण त्यांची वाणीच मधुर आहे. तरीही नवव्या अध्यायातलं त्यांचं बोलणं, सांगणं अतिमधुर आहे.
समुपदेशनाच्या ओघात भगवंत बोलून जातात-
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्‍वत् शांतिं निगच्छति|
कौंतेय प्रति जानीही न मे भक्तः प्रणश्यति॥
सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला मुक्तीचा म्हणजे सर्वोच्च विकासाचा अधिकारच नव्हे तर संधीही आहे आणि त्यानं योग्य पद्धतीनं व वैरागी वृत्तीनं अभ्यास केला तर त्याचा उद्धार होऊ शकतो. भगवंत म्हणतात हे माझं नुसतं अभिवचन नाही तर माझं ब्रीद आहे म्हणजेच माझी प्रतिज्ञा आहे. यासाठी भगवंतानं जे शब्द वापरले आहेत ते खरंच प्रत्ययकारी आहेत.
अपि चेत् सुदुराचारो भजते माम् अनन्यभाक्‌|
साधुः एव स मन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः॥
भगवंतानं काही अपेक्षा व्यक्त केल्यायत. त्या पुर्‍या करणार्‍या भक्ताचा कधीही नाश होत नाही. कारण त्याचा रक्षणकर्ता मी असतो. साक्षात् भगवंत! या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवंत ज्या ज्या वेळी ‘भक्त’ शब्द वापरतात त्यावेळी त्यांच्या मनात ‘भक्त म्हणजे विभक्त नव्हे| विभक्त म्हणजे भक्त नव्हे॥ हा समर्थांचा विचार असतो. सोप्या भाषेत ‘जोडलेला तो भक्त व तुटलेला तो विभक्त किंवा अभक्त॥ – याचा अर्थ ज्ञानी सुद्धा ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताशी जोडलेला असतो त्यावेळी तोही ‘भक्त’च असतो. कर्मयोगी ज्यावेळी कर्माच्या अर्पण भावनेतून (कृष्णार्पणमस्तु) भगवंताशी जोडलेला असतो त्यावेळी तोही भक्तच असतो. तीच गोष्ट ध्यानयोगाची. ध्यानाचा कळस जी समाधी त्या अवस्थेत तो पूर्णपणे भगवंताशी एकरूप, एकजीव झालेला असतो. म्हणजेच भगवंताचा भक्तच असतो. भगवंताचं समुपदेशन या संदर्भात काय आहे ते पाहू या-
* अपि चेत् सुदुराचारो ः म्हणजे जरी एखादा मनुष्य ‘सुदुराचारी’ असला तरी … इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. साध्या दुराचारी व्यक्तीपेक्षा ‘सुदुराचारी’ ही भयंकर व्यक्ती असते. सर्वत्र आतंक पसरवणारे राक्षस असे सुदुराचारी होते. दुर्योधन-दुःशासन-शकुनी-कर्ण ही चांडाळ चौकडी दुराचारी लोकात अग्रक्रम पटकवणारी होती. एकाला झाकावं अन् दुसर्‍याला काढावं अशी स्थिती या चौघांची होती. पण कर्णाच्या बाबतीत एक गोष्ट भिन्न होती. तो कृष्णाला जोडलेला होता. त्याची कवचकुंडलं जशी त्याच्या अंगाला घट्ट चिकटलेली होती तसंच त्याचं मन भगवान् कृष्णाला जोडलेलं होतं. त्यामुळे मित्राला दिलेलं मैत्रीचं वचन कितीही प्रलोभनं वा संकटं आली तरी त्यानं पाळलं. फार मोठी गोष्ट आहे ही! त्याची उदार वृत्ती व त्यानुसार कृतीही त्याला एक महामानव बनवण्यासाठी पुरेशी होती. भगवंताशी जोडलेला राहिल्यानंच त्याला समाजात व इतिहासात प्रतिष्ठा प्राप्त झाली.
* भजते माम् अनन्यभाक् ः अशा अत्यंत दुष्ट, क्रूर व्यक्तीनं जर माझी अनन्यभावानं भक्ती केली तर त्याचाही मी स्विकार करतो. इथं महत्त्वाची गोष्ट आहे ‘अनन्यभाव’. आता माझा दुसरा कोणीाही त्राता, रक्षणकर्ता नाही. आहे तो फक्त एकच आणि तो म्हणजे भगवंत.
अंगुलिमाल नावाच्या दुष्ट, राक्षसी वृत्तीच्या लुटारूनं गौतम बुद्धाच्या उपदेशावरून जेव्हा बुद्धालाच गुरू मानून शरण भावानं भक्ती केली तेव्हा तो संत अंगुलिमाल बनला. आपल्यासारखीच योग्यता बुद्धानं त्याला दिली. हा प्रसंग फार मार्मिक आहे. ज्यावेळी बुद्ध त्याच्या मार्गाने जात होते त्यावेळी नेहमीप्रमाणे त्यांना लुटण्यासाठी अन् प्रतिकार केला तर ठार करण्यासाठी अंगुलिमाल त्यांच्या अंगावर धावून गेला. दुसर्‍यांना मारणं म्हणजे त्याच्या हातचा मळ होता. एखादा छोटा किटक मारावा तसा तो माणसं मारत होता नि मारलेल्या व्यक्तीचं एक बोट कापून स्वतःच्या गळ्यातील माळेत घालत होता. म्हणून सारे त्याला ‘अंगुलिमाल’ म्हणत.
ज्यावेळी तो बुद्धाच्या अंगावर धावून गेला त्यावेळी बुद्ध शांतपणे उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरील हास्य व डोळ्यातील शांत भाव तसाच होता. अंगुलिमाल त्या वृत्तीनं आश्चर्यचकित झाला. ‘तुम्हाला भिती नाही वाटत?’ असं त्यानं विचारल्यावर बुद्धानं शांतपणे त्याला समोरच्या झाडाची तीन पानं तोडून आणायला सांगितली. त्यानं तशी पानं आणल्यावर तितक्याच शांतपणे बुद्ध म्हणाला, ‘आता ही पानं त्या वृक्षाला पुन्हा जोडून ये.’ त्यावेळी अंगुलिमाल म्हणाला, ‘ते कसं शक्य आहे? तोडलेली पानं पुन्हा कशी जोडता येतील?’ त्यावर बुद्धाचे उद्गार अंगुलिमालाचं अवघं जीवन बदलवून गेले. बुद्ध म्हणाला, ‘हा विचार तू पानं तोडण्यापूर्वी का केला नाहीस? जे जोडता येत नाही ते तोडण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? इतक्या माणसांचा तू जीव घेतलास तो घेण्यापूर्वी एकदा तरी असा विचार केलास का?’
यानंतर सारा हिंसेचा मार्ग सोडून पूर्णवेळ भक्ती करणं हेच अंगुलिमालाचं जीवन बनलं. पुढे काळाच्या ओघात तो संत अंगुलिमाल बनला.
* साधुः एव स मंतव्यः – ज्याला आपल्या दुराचाराची आतून जाणीव होते, पश्‍चात्ताप होतो त्याला त्या क्षणापासूनच साधू समजलं पाहिजे. कारण त्याचा जीवनाचा मार्ग निश्चित झालेला असतो. असा एका क्षणात दुष्टाचा सज्जन बनत नाही. पण तसा तो बनण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून त्याला साधूच मानलं पाहिजे असं भगवंताचं सांगणं आहे. चुका, अपराध, पाप आपल्यापैकी अनेकांकडून घडत असतं. आपल्याला मार्गदर्शनही मिळत असतं. वाचन, सत्संग, साधुसंतांची भेट अशा अनेक माध्यमातून आपल्या चुकांची जाणीव आपल्याला करून दिली जात असते. पण आपल्यावर त्याचा फक्त तात्कालिक प्रभाव पडतो. पुन्हा आपलं जीवन पहिल्यासारखंच सुरू राहतं. अशा अनेक संधी आपण गमावत राहतो. सुधारण्याची प्रक्रिया आपल्या जीवनात सुरूच होत नाही. याचं खरं तर संत सद्गुरूंना खूप वाईट वाटतं. पण आपण जीवनापासून योग्य तो बोध घेतच नाही.
* सम्यक् व्यवसितो हि सः – या ठिकाणी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे दृढ निश्चय. ‘व्यवसाय’ म्हणजे बुद्धीचा निर्णय. ‘व्यवसायात्मिका निश्चयात्मिका’ असं बुद्धीचं वर्णन केलं आहे. कोणताही निर्णय घेणं अवघड बनलेल्या परिस्थितीत बुद्धीचा उपयोग करून म्हणजेच नीट विचार करून, विवेकाचा उपयोग करून आपल्याला निर्णय घेणं आवश्यक असतं. एवढं करून भागत नाही. आपणही अनेक निर्णय घेतो. पण त्यांचं पालन करण्यासाठी जी शिस्त, जे सातत्य अपेक्षित असतं ते आपल्याकडे नसतं. आपले नववर्षाचे संकल्प (न्यू इयर्स रिझोल्यूशन्स) हे याचं उत्तम उदाहरण आहे. कारण ‘सम्यक् व्यवसितो’ अशी आपली अवस्था होत नाही. यादृष्टीनं चार पायर्‍या महत्त्वाच्या आहेत. पहिली योग्य निर्णय त्यानंतर तो अंमलात आणण्यासाठी निश्चय. हा निश्चय डळमळीत न होण्यासाठी हवा निर्धार. याहिपुढे आवश्यक असतो निग्रह म्हणजे काहीही – अक्षरशः काहीही झालं तरी घेतलेल्या निर्णयानुसार जीवन घालवण्याची तयारी. एखादा तुकोबा यासाठी म्हणतो ‘फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक’ पण विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर माझ्या जिवाला शांती नाही. तळमळ दिवसरात्र सुरूच राहील. असा निग्रह असेल तरच अनुग्रह म्हणजे कृपा होते.
* क्षिप्रं भवति धर्मात्मा ः ‘क्षिप्रं’ याचा अर्थ आहे ‘थोड्याच काळात, लवकरच’! यालाच संत म्हणतात ‘तत्काळ, तत्‌क्षणी’. घडाळ्याच्या वेळेप्रमाणे याचा अर्थ लावायचा नाही तर अपेक्षित पूर्वतयारी झाल्यावर लगेच आवश्यक तो बदल घडतो. सुदुराचारी माणूस धर्मात्मा बनतो म्हणजे दुष्टदुर्जन साधूसज्जन बनतो. ही अर्थातच दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या संदर्भात काळाचं जे माप सांगितलं जातं त्याला ‘तप’ म्हटलं जातं. एक तप म्हणजे बारा वर्षांचा काळ. अशी अनेक तपं शिस्तीत घालवण्याला तपश्‍चर्या म्हणतात. दुष्टाचा सज्जन होण्यासाठी अशी तपश्‍चर्याच करावी लागते. त्यानंतर मात्र अंतिम ध्येयाची प्राप्ती होते. ‘शाश्‍वत शांती लाभते’. म्हणजेच मुक्तीचा लाभ होतो. ही मुक्ती आधीच्या दुराचरणापासून असतेच पण तिच्यामुळे अखंड आनंद प्राप्त होतो.
* न मे भक्तः प्रणश्यति – भगवंत आपली प्रज्ञा सांगताहेत – कौन्तेय प्रतिजानीहि’ नीट विचार कर – ‘माझा भक्त कधीही नाश पावत नाही.’ याचा अर्थ देहाच्या पातळीवर अर्थातच घ्यायचा नाही. तसा सर्वांच्याच शरीराचा नाश ठरलेलाच आहे. माझा भक्त नष्ट होत नाही म्हणजे त्याचा भक्तिभाव नाश पावत नाही. त्याची शांती भंग पावत नाही. त्याच्या आनंदाच्या अवस्थेत खंड पडत नाही. फार अर्थ आहे या प्रतिज्ञेत. माझ्याशी जो कोणत्याही रूपात, कोणत्याही प्रकारे वा माध्यमातून जोडलेला राहतो तो माझा भक्त ‘मीच’ बनून जातो. त्याचा नाश कसा शक्य आहे?
वरवर हा सारा आध्यात्मिक उपदेश वाटेल. पण नीट विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनासाठीही यात असलेलं समुपदेशन लक्षात येईल. यावर थोडं सहचिंतन करुया.
वाल्या कोळ्याचं उदाहरण या दृष्टीनं आदर्श आहे. आपला वंशपरंपरागत व्यवसाय चालवण्याखेरीज तो दुसरं काही करू शकत नव्हता. हा व्यवसाय म्हणजे वाटेवरून जाणार्‍या प्रवाशांना लुटणे व आवश्यकता पाडली तर ठार करणे. अपराध, हिंसा, पाप यावर आधारलेलं हे काम तो वर्षानुवर्ष करून आपला प्रपंच चालवत होता. एकदा नारदांची भेट झाल्यावर त्याच्या जीवनात क्रांतीचा क्षण आला. ‘तू आपल्या बायकोमुलांचं पालनपोषण करतो आहेस ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी जे पाप तू करतोस त्यात ही घरची मंडळी सहभागी आहेत का?’ या नारदांच्या प्रश्‍नावर तो घरी जाऊन सगळ्यांना विचारून आला. ‘पती व पिता म्हणून तू आपलं कर्तव्य करत होतास. आम्ही तुला हिंसा किंवा पाप करायला कुठं सांगितलं होतं? आम्ही तुझ्या पापात सहभागी नाही.’ या उत्तरावर तो विचार करू लागला. अंतर्मुख झाला. नारदांनी सांगितलेलं राम नाम घेत तसाच बसून राहिला. त्याचा निश्चय अढळ होता. भोवती वारूळ तयार झालं तरी तो हलला नाही. विचलित झाला नाही. पुढे उठला ते वाल्मिकी बनूनच… सार्‍यांना वंदनीय वाल्मीकी ऋषी बनला. एवढंच नव्हे तर रामायणासारखं महाकाव्य रचून तो अमर झाला.
कोणकोणते पैलू आहेत या कथेला?…
* आपण अगदी रावण-कंसासारखे सुदुराचारी नसलो तरी दुराचारी, भ्रष्टाचारी असतोच. काही अपवाद सोडले तर बहुतेकांची वृत्ती पापाचरणाचीच असते.
* आपल्याही जीवनात अगदी बुद्ध-नारदांसारखी देवमाणसं आली नाहीत तरी आपले मातापिता, गुरूजन, समाजातील ज्येष्ठ नि श्रेष्ठ मंडळी येतच असतात. आपण त्यांना मनोभावे शरण जात नाही म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला होत नाही.
* सत्संगाचे प्रसंगही येतात जिथं प्रत्यक्ष संतसत्पुरुष उपस्थित नसले तरी त्यांचे ग्रंथ असतात. त्यांच्या विचारांचं मंथन होत असतं. योग्य मार्ग सगळ्यांना दाखवला जात असतो. पण आपल्या जुन्या सवयी, पूर्वसंंस्कार नि मुख्य म्हणजे अहंकार सुधारणेच्या आड येतो.
* जरी आपल्याला आपली चूक समजली आपण सुधारण्याचा निर्णय घेतला तरी तो जास्त काळ टिकत नाही. त्यानुसार व्रतस्थ जीवन आपण जगत नाही. दीर्घकाळ तपश्‍चर्या आपल्याकडून होत नाही.
* आपल्याला चांगला माणूस बनायचं असतं. काहींना तर ‘साधू-धर्मात्मा’ बनण्याची घाई झाली असते. पण त्यासाठी आवश्यक ती बंधनं, पथ्य पाळण्याची त्यांची तयारी नसते. म्हणून आहे तेच जीवन आहे तसंच सुरू राहतं. संधी येत राहतात पण त्यांचा लाभ घेतला जात नाही.
* कोणावर तरी श्रद्धा ठेवून जीवनाचं उच्च ध्येय – मुक्ती किंवा आनंद प्राप्ती – गाठण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. ‘शेंडी तुटो वा पारंबी तुटो’ अशा निग्रहानं आपण अभ्यास करत नाही. त्यामुळे आपण फार वरच्या अवस्थेपर्यंत पोचू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. असो.
आपण वाल्याइतके दुष्ट नसू. नारदांसारखे वरच्या अवस्थेतले मार्गदर्शक आपल्याला भेटणार नाहीत. त्यामुळे आपण वाल्मीकींसारखे महर्षी-महाकवी बनू शकणार नाही. रामायणासारखी महान कामगिरी आपल्याकडून होणार नाही. पण आपल्या हातात गीतेसारखा समुपदेशन करणारा ग्रंथ तरी आहे ना? अन् खरं तर आपला उद्धार आपणच करायचा असतो ना? उद्धरेत् आत्मनात्मानम्!.. प्रयत्न करत राहू या. भगवंताचं वचन कधीही खोटं ठरणार नाही. न मे भक्तः प्रणश्यति॥