- डॉ. सोमनाथ कोमरपंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महानिर्वाणदिन. ते जाऊन चौसष्ट वर्षे लोटली. पण भारतीय समाजपुरुषाला मूलगामी, बुद्धिनिष्ठ, समग्रतेने आणि वृत्तिगांभीर्याने वैचारिक बैठक देणारे, त्याचप्रमाणे सदैव कृतिशील राहिलेले संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हा भारतीयांना त्यांचा विसर पडलेला नाही. त्यांच्या समर्पणशील वृत्तीमुळे आणि वैचारिक वारशामुळे ते निरंतर आमच्यात आहेत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महानिर्वाणदिन. ते जाऊन चौसष्ट वर्षे लोटली. पण भारतीय समाजपुरुषाला मूलगामी, बुद्धिनिष्ठ, समग्रतेने आणि वृत्तिगांभीर्याने वैचारिक बैठक देणारे, त्याचप्रमाणे सदैव कृतिशील राहिलेले संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हा भारतीयांना त्यांचा विसर पडलेला नाही. त्यांच्या समर्पणशील वृत्तीमुळे आणि वैचारिक वारशामुळे ते निरंतर आमच्यात आहेत असे वाटायला लागते.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा ठसा विसाव्या शतकावर तर उमटलाच आणि आता एकविसाव्या शतकाची दोन दशके पूर्ण होत आली. आजचे युगमानस गतिमानतेचे आहे. काळ जटिलतेचा आहे. अनेक सामाजिक समस्यांचा आहे. अशाही काळात डॉ. आंबेडकरांचा सामाजिक विचार मानवतेला दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देणारा आहे.
प्रत्येक माणूस जन्माला येताना सामान्य माणूस म्हणूनच जन्माला येतो. पण समज आलेल्या वयापासून, त्याच्यावर झालेल्या संस्कारांनुसार आणि अवतीभोवतीच्या परिस्थितीनुसार माणसे घडत जातात. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव घडतो. त्यांच्यासारखे अन्य महामानवही कालप्रवाहात निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये हा श्रेष्ठ; तो कनिष्ठ अशी तुलना होऊ नये. कुणीही अट्टहासाने तुलना करू नये. कारण आजच्या लोकशाही युगातील विचारप्रणालीला- ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः|’ ही उक्ती तंतोतंत लागू पडणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, ‘‘प्रत्येक मनुष्याला विचार-स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला लाभलेल्या विचार-स्वातंत्र्याचा उपयोग सत्याचा शोध घेण्यासाठी केला पाहिजे. सत्याचा शोध घेण्याचा हा मार्ग अत्यंत बिकट आहे.’’
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले? त्यांनी खडतर जीवनसाधनेचा मार्ग पत्करला. गौतम बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि ज्योतीरावांची क्रांतिप्रवणता स्वीकारली. या तिघांच्या विचारसरणीतील अंतःसूत्र कोणते होते? ती होती सामाजिक करुणा. तिच्या बळावर डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासाचा विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला. उपेक्षित समाजाला सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामागे विवेकशक्तीची बैठक आहे.
हे विवेचन करताना हेही सांगणे आवश्यक वाटते की, जॉन स्टुअर्ट मिल म्हणत असे की, ‘‘एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका, अगर त्यावर इतका विश्वास टाकू नका की त्यामुळे तो लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलून टाकील.’’ रवींद्रनाथांचेदेखील हेच म्हणणे होते की, ‘‘व्यक्तीचे स्तोम माजविताना परम सत्याची अवहेलना होऊ देऊ नका.’’ डॉ. आंबेडकरांच्या कृतिशील व्यक्तिमत्त्वात या विवेकाचे भान होते. माणूस हे या विश्वरचनेचे केंद्र आहे. माणूस स्वतःला बदलू शकतो तसेच तो आपल्याभोवतीचे वास्तव विचाराने आणि कृतीने बदलू शकतो हे त्यांच्या तत्त्वचिंतनाचे सूत्र होते. ‘शिका, लढा आणि संघटित व्हा’ हा क्रांतीचा मंत्र त्यांनी समाजाला दिला. परिवर्तनवादी विचार समाजात रुजविण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्याला दडपून टाकणार्या धर्मसत्ता, राजकीय सत्ता, अर्थसत्ता आपली शस्त्रे परजून उभ्या असतात या कठोर वास्तवाची त्यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रस्थापित करावयाचा आणि शतकानुशतके दास्यात खितपत पडलेल्या दलित-शोषित जाती-जमातींचा आत्मसन्मान जागवायचा हे ब्रीद स्वीकारले. अत्यंत आत्मनिर्भर वृत्तीने. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी आपली अपेक्षा असते. ही अपेक्षा जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपण म्हणतो की या समाजात माणसाला मूल्य आहे, माणुसकीला मूल्य आहे. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीची संज्ञा स्पष्ट करताना ‘एक माणूस, एक मूल्य’ हा सिद्धांत मांडला. त्यामागे त्यांच्या जीवनचिंतनाची निश्चित धारणा होती.
ही मूल्यसरणी स्वीकारून डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनाची वाटचाल कशी केली आणि आपल्याबरोबर समाजमानसाला ते कसे घेऊन गेले याची मांडणी करायची आहे. त्यांचे जीवनचरित्र तर सर्वज्ञात आहे. तीन गुरूंबरोबरच विद्या, विनय आणि शील ही त्यांनी उपास्य दैवते मानली.
ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा पाया होय. म्हणून प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी वाटेल त्या प्रकारचे कष्ट सोसून शिक्षण मिळवले पाहिजे आणि ज्ञानाच्या बळावर स्वतंत्रपणे विचार करायला शिकले पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. बुद्धीचा विकास करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणामुळे तो विकास साधता येतो. म्हणून त्यांनी दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. शिक्षणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल. त्यांच्या मानसिक, बौद्धिक क्षमतांची वाढ होईल. प्रस्थापित विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करण्यास ते समर्थ होतील. प्रथम सूत्राचा शोध घेऊन ते आश्वासक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या मनात कोणत्याही विषयाची जिज्ञासा निर्माण होईल असे डॉ. आंबेडकर म्हणत असत.
डॉ. आंबेडकर १९१३ मध्ये कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. भारतातील सामाजिक परिस्थिती आणि अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती यांमधील फरक त्यांना जाणवला. भारतातील वंचित आणि पीडित जनतेच्या आयुष्यात शिक्षणाची आवश्यकता किती आहे हे त्यांना कळले. म्हणून आपल्या वडिलांच्या मित्राला त्यांनी पत्र लिहिले- ‘पालक मुलांच्या जन्माचे साथी आहेत, कर्माचे नव्हेत या संकल्पनेचा आता त्याग केला पाहिजे.’ पुढे ते म्हणतात, ‘पालक मनात आणतील तर ते आपल्या मुलांचे भवितव्य साकार करू शकतात. मुलांच्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींच्या शिक्षणाचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार करावा आणि त्यानुसार कृती करावी.’ पुढे याच पत्रात शेक्सपियरच्या एका नाटकातील वाक्य उद्धृत करतात की ‘प्रत्येक माणसाच्या जीवनात जेव्हा संधीची लाट येते, तेव्हा तो माणूस त्यावर आरूढ झाला तर तो समृद्धीच्या मार्गावर जातो. परंतु त्याने जीवनाचा मार्ग त्यागला तर माणसाच्या वाट्याला दुःखच येणार.’ वंचितांच्या आणि पीडितांच्या जीवनात आलेली शिक्षणाची संधी न गमावता शिक्षण घेऊन ज्ञानी झाले पाहिजे. त्यासाठी येईल ते दुःख सहन करायला पाहिजे, असाही सल्ला डॉ. आंबेडकर देतात.
डॉ. आंबेडकरांची शिक्षणाविषयीची ही आस्था आणि प्रेम ‘आधी केले; मग सांगितले’ या वृत्तीतून आलेले आहे. डॉ. आंबेडकरांनी परदेशाच्या वास्तव्यात कष्टपूर्वक शिक्षण घेतले. सहा वर्षांत परदेशातल्या सर्वश्रेष्ठ नामवंत विद्यापीठात एम.ए., एम. एस्सी., डी. एस्सी. आणि बार-ऍट-लॉ या पदव्या उच्च श्रेणीने प्राप्त करण्याचा अपूर्व विक्रम केला. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास व कायदा या विषयांत प्रावीण्य मिळवून त्यांनी प्रकांड पंडित म्हणून नावलौकिक प्राप्त केला. हॅरॉल्ड लास्की, किंगस्ले मार्टिन, मॉरिस डॉब, एडविन कॅनन, सिडने वेव, गोल्डन वॉजर व जॉन ड्युई इत्यादी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांनी मुक्त कंठाने त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा केली. राजकीय क्षेत्रात दलित वर्गाला माणुसकीचे हक्क मिळवून देण्यात आणि सामाजिक समतेचा लढा गतिमान करण्यात यशस्वी झालेल्या डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘दी प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते.
एम.ए.ची पदवी मिळाल्यानंतर १९१६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात भारताच्या राष्ट्रीय नफ्यातील वाट्याविषयी ऐतिहासिक दृष्टीने चिकित्सक अभ्यास केला. राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप, त्याची विषम वाटणी इत्यादींबाबत विवेचन करून भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे न्याय्य विभाजन कसे करता येईल हेही त्यांनी सुचविले आहे. या प्रबंधामुळे त्यांना पीएच.डी.ची पदवी मिळाली. हा प्रबंध ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्तव्यवहाराचा विकास’ (दी इव्हॉल्युशन ऑफ प्रॉव्हिन्सियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) या नावाने प्रसिद्ध झाला. प्रा. आर. ए. सेलिग्मन यांची त्याला प्रस्तावना आहे. या महान अर्थशास्त्रज्ञाने डॉ. आंबेडकरांच्या व्यासंगाची व विवेचनशक्तीची प्रशंसा केली आहे.
‘यः क्रियावानः स पण्डित’ या उक्तीनुसार डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे सूक्ष्म अध्ययन केले त्याचे उपयोजन समाजाभिमुख वृत्तीने दुबळ्या घटकांच्या कल्याणासाठी केले. दलितांच्या वाट्याला येथील समाजव्यवस्थेमुळे, धर्मव्यवस्थेमुळे दरिद्य्र, कर्जबाजारीपण आले. त्या विळख्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेळोवेळी पावले उचलली. सतत संघर्ष करीत, राजकीय दबाव टाकत त्यांनी घटनेत अनेक तरतुदी करून घेतल्या. ब्रिटिश सरकारने आणि स्वतंत्र भारतातील शासनाने दलितांसाठी ज्या कल्याणकारक योजना राबवल्या, नोकर्यांत राखीव जागा देऊ केल्या, शैक्षणिक सवलती देऊ केल्या आणि जमिनी कसण्यासाठी दिल्या, त्यांमागे शासनाची प्रामाणिक भूमिका नव्हती, हे डॉ. आंबेडकरांनी हेरले. म्हणून घटना समितीत केलेल्या भाषणातही त्यांनी सामाजिक समतेबरोबरच आर्थिक समतेचा आग्रह धरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले. हे त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रातील महत्त्वाचे पर्व होय. संविधान सभेत संविधानातील कलमांवर त्यांनी भाष्य केले. तेथील सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक आणि विचारप्रवृत्त करणारी उत्तरे त्यांनी दिली. डॉ. आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे संविधानतज्ज्ञ होते. परंतु ते एका दिवसात संविधानतज्ज्ञ बनले नाहीत. त्यामागे त्यांची दृढ साधना होती. भारतीय जनमानसाविषयीचे पूर्ण आकलन, सहानुभूती आणि प्रत्यक्ष जीवनसमरात उतरून कार्य करण्याची सिद्धता होती. जगातील विविध कायद्यांचा आणि संविधानांचा त्यांनी अतिशय चिकाटीने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. भारतीय संविधान जरी २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये अस्तित्वात आले तरी भारतीय संविधानिक आयोगाची स्थापना पारतंत्र्यकाळात २६ नोव्हेंबर १९२७ मध्ये झाली होती. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन हे होते. म्हणून या आयोगाला ‘सायमन आयोग’ असे संबोधले जाते. सायमन आयोगाशी विचारविमर्श करण्यासाठी राज्यस्तरावर विधिमंडळ सदस्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली. या सात सदस्यांच्या समितीवर डॉ. आंबेडकरांची सदस्य म्हणून ५ ऑगस्ट १९२८ ला मुंबई विधिमंडळातून निवड झाली. अर्थशास्त्र आणि कायदा यांच्या अभ्यासाच्या सहाय्याने या समितीत राहून दलितांच्या हितासाठी ते सदैव सक्रिय राहिले.
भारताच्या भावी संविधानाच्या संदर्भात भारतीय प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे ब्रिटिशांनी मान्य केले. त्याकरिता इंग्लंडमध्ये १२ नोव्हेंबर १९३० रोजी पहिली गोलमेज परिषद आयोजित केली गेली. पहिल्या गोलमेज परिषदेत प्रारंभिक सत्रानंतर एकूण नऊ उपसमित्या नेमण्यात आल्या. संयुक्त संविधान समितीचा अपवाद वगळता बाकी सर्व समित्यांचे डॉ. आंबेडकर हे सदस्य होते. दुसर्या आणि तिसर्या गोलमेज परिषदेतदेखील ते हजर होते. गोलमेज परिषदेत संघीय संरचना, प्रांतीय संविधान, अल्पसंख्याक, मताधिकार, संरक्षण, सेवा इत्यादी समित्यांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या सर्व संवैधानिक सुधारणांच्या संदर्भात विन्स्टन चर्चिलसारख्या मुत्सद्दी व्यक्तीला त्यांनी कोंडीत पकडले होते.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश झाला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल या तिघांनाही डॉ. आंबेडकर मंत्रिमंडळात असावेत असे वाटत होते. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यांनी २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली. एन. माधवराव, सय्यद सादुल्ला, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर आणि सर बेनेगल नरसिंगराव हे घटना समितीचे अन्य सदस्य होते. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी घटनासमितीसमोर जो मसुदा सादर केला त्यातून त्यांच्या व्यापक प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तो मुळापासून समजून घेतला पाहिजे. पण डॉ. आंबेडकरांच्या विचारांतील भारताच्या भविष्यकालीन स्वप्नांची झेप लक्षात घेण्यासाठी खालील सूत्रमय आशय ध्यानात घ्यावा लागेल, ‘‘आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट राहता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाहीवर भक्कमपणे आधारल्याशिवाय, राजकीय लोकशाही टिकत नाही. पण सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व विश्वबंधुत्व या तत्त्वांवर आधारलेला जीवनमार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही! ही तीन तत्त्वे वेगवेगळी मानता कामा नयेत. त्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यांपैकी एक तत्त्व दुसर्या तत्त्वापासून वगळणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ हेतूस सुरुंग लावण्यासारखे आहे. समतेपासून स्वातंत्र्याचा काडीमोड करता येणार नाही, की स्वातंत्र्यापासून समतेचा काडीमोड करता येणार नाही. किंवा स्वातंत्र्य व समता, ही दोन्ही विश्वबंधुत्वापासून अलग करता येणार नाहीत.’’
ज्या मानवतेच्या चिरस्थायी मूल्यांवर भारतीय लोकशाहीची कोनशिला जगातील आदर्शभूत ठरलेल्या संविधानाद्वारे बसविण्याचा डॉ. आंबेडकरांनी ध्यास घेतला, त्या द्रष्टेपणामुळे अनेक आव्हाने येऊनही गेली सत्तर वर्षे भारतीय लोकशाही टिकून आहे. राष्ट्रीय जीवनात चढउतार असतात, हर्षामर्श येतात. संकटमालिका येते. पण जनमानसातील परस्परांविषयीचा विश्वास कायम असेल तर लोकशाहीतील मूल्यविवेक ढासळून पडत नाही. भारतीय संघराज्याने आतापर्यंत हेच दाखवून दिले आहे. लोकशाही जीवनप्रणालीच्या या मूलारंभप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे अखंड ज्ञानोपासक, प्रज्ञावंत आपल्या राष्ट्राला लाभले याबद्दल आपण त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञताभाव बाळगायला हवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कित्येक समरप्रसंग असे आहेत की त्यांना तीव्रतेने लढा द्यावा लागला. सामाजिक जीवनात आणि व्यापकपणे राष्ट्रीय जीवनात अशा प्रकारचा असमतोल निर्माण होतो, तेव्हा कृतिशील प्रज्ञापुरुषाला धीराने तोंड द्यावे लागते. डॉ. आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी स्वीकारलेला बौद्ध धम्म आणि ५ लाख दलित बांधवांना दिलेली बौद्ध धम्माची दीक्षा, नाशिकच्या काळाराम मंदिरात केलेला सांघिक प्रवेश आणि महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह या घटनांमागची मीमांसा आपण वस्तुनिष्ठ पातळीवर आणि निःपक्षपातीपणे करायला हवी. आपणच निर्माण केलेल्या जीर्ण-शीर्ण शृंखलांचे आपण दास कसे होऊन बसलो होतो, त्यावेळी नव्या युगाची स्पंदने जाणून परिवर्तनशीलतेचे मानबिंदू होऊन निर्भरशील वृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे उभे राहिले आणि राष्ट्रधर्माचे ते उद्गाते कसे ठरले हे आपल्याला कळून चुकेल.