राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे मुख्यमंत्री सहयोग निधी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली नोंदणीकृत स्वयंसेवा संस्थांना वार्षिक 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
समाजकल्याण खात्याने मुख्यमंत्री सहयोग निधी योजनेची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कमकुवत घटकांसाठी कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना कार्यशाळा, परिषद, चर्चासत्र, वैद्यकीय शिबिर, जागृती शिबिर आदींचे आयोजन करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. वार्षिक पाच लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दोन हप्त्यात वितरित केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नोंदणीकृत संस्थेला समाज कल्याण खात्याच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासोबत सविस्तर प्रकल्प अहवाल आणि मागील तीन वर्षांचा ऑडिट अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.