योगसाधना- 680, अंतरंगयोग- 266
- डॉ. सीताकांत घाणेकर
सर्व गोष्टी स्वप्नांप्रमाणे घडतील याची खात्री नसते, कारण प्रारब्धदेखील मुख्य आहे. भगवंताला साक्षी मानून, त्याच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून, त्याला समर्पित होऊन सत्कर्मे करावीत. असे केले व जरी अपयश आले तरी झोपदेखील शांत लागेल.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर एक छान संदेश आला होता- ‘आजच्या जगातील मुख्य समस्या.’ माहिती बोधदायक वाटली. तो संदेश वाचूया व त्यावर थोडे चिंतनही करूया.
- ‘आज जगात पुष्कळकडे मोठी घरे आहेत, पण त्यांत राहायला माणसेच नाहीत.’
- अगदी बरोबर. अनेक व्यक्ती चांगले शिकलेल्या असतात, पण कामानिमित्त त्या बाहेरगावी अथवा परदेशात राहतात. त्यांतील बहुतेकजण श्रीमंत असतात. आपल्या गावी ते स्वतःचा बंगला बांधतात अथवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी महागडा फ्लॅट- सर्व सुखसोयींनी युक्त असलेला- खरेदी करतात. पण ते तिथे राहत नाहीत; बहुतकरून वृद्ध माता-पिताच तिथे राहतात. याचाच अर्थ घरे आहेत, पण त्या ठिकाणी राहण्यास माणसे नाहीत.
- ‘बहुत सारे शिक्षण, पण सामान्य ज्ञान नाही.’
- आज विविध विषयांचे शिक्षण प्रगतिपथावर आहे. चांगलेच आहे. आपल्या स्वतःच्या क्षेत्रात हे शिक्षण वापरले जात आहे, मग ते क्षेत्र कुठलेही असो. पण सामान्य ज्ञान नाही, सामाजिक जाणीव नाही, व्यवस्थित संस्कार नाहीत. त्यामुळे सामाजिक समस्या वाढतच आहेत.
- ‘वैद्यकीय उपचार व औषधे चांगली आहेत, पण स्वस्थता व आरोग्य नाही.’
- वैद्यकीय क्षेत्रात क्षणोक्षणी नेत्रदीपक प्रगती होत आहे. नवी-नवी अत्यंत उपयोगी व प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. आरोग्य केंद्रांवरील व हॉस्पिटलमधील गर्दी बघितली तर लक्षात येईल की लोकांना स्वस्थता व चांगले आरोग्य नाही.
शास्त्रशुद्ध योगसाधनेचा येथे छान उपयोग होऊ शकतो. त्यातील विविध पैलूंचा विचार हवा- आहार, विहार, आचार, विचार. प्रत्येक व्यक्तीसाठी यातील प्रत्येक पैलू अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहीत होत्या, ते त्याप्रमाणे आपले जीवन जगत. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होते. हल्ली तरुणांमध्येदेखील वृद्धत्वात होणारे रोग दिसून येतात.
- ‘मानवाने चंद्रावर पाय ठेवला, पण शेजाऱ्याशी ओळख नाही.’
- मानवाला सुरुवातीपासून इतर ग्रह व तारे यांच्याबद्दल अत्यंत आकर्षण. त्यामुळे खगोलशास्त्रावर संशोधन सुरू झाले. त्यातील मुख्य म्हणजे चंद्र, मंगळ… गेल्या काही दशकांत या क्षेत्रात अत्यंत प्रगती झाली आहे. सुरुवातीला पाश्चात्त्य देशांनी फार प्रगती केली, पण आता ‘चंद्रयान’सारखे उपक्रम बघितले तर भारतदेखील पुढे आहे, ही गोष्ट खरेच अभिमानास्पद आहे.
याउलट, बंद फ्लॅटच्या संस्कृतीमुळे आपल्या शेजारी राहत असलेल्याचीसुद्धा आपल्याला ओळख नसते. फक्त गरज लागली तर आपण चौकशी करतो व संबंध ठेवतो. पूर्वी चाळ-संस्कृती होती तेव्हा सर्वांची ओळख असे. अनेक कार्यक्रम एकत्र होत असत. सण, मुंजा, लग्न… आता ‘फ्लॅट’ व ‘ब्लॉक’ संस्कृती झाली आहे. त्यामुळे जमीन ‘फ्लॅट’ म्हणजे सपाट व प्रगती ‘ब्लॉक’ झाली आहे.
- ‘मानवाची स्वप्ने खूप आहेत, पण शांत झोप नाही.’
- जीवनात चांगली स्वप्ने अवश्य असावीत. त्यात काही वावगे नाही. मानवी जीवन क्षणभंगुर आहे. त्या मर्यादित वेळात चांगली, समाजोपयोगी सेवा करावी. स्वप्ने साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. सर्व गोष्टी स्वप्नांप्रमाणे घडतील याची खात्री नसते, कारण प्रारब्धदेखील मुख्य आहे. भगवंताला साक्षी मानून, त्याच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून, त्याला समर्पित होऊन सत्कर्मे करावीत. असे केले व जरी अपयश आले तरी झोपदेखील शांत लागेल. आज अमेरिकेसारख्या भौतिक समृद्धी असलेल्या देशात ताणतणावांमुळे अनेकांना शांत झोप लागत नाही. त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हल्लीच्या काळात भारतातदेखील तीच परिस्थिती आहे.
- ‘भरपूर सारी कमाई, पण मनाला शांती नाही.’
- चौफेर नजर फिरवली तर चांगले उत्पन्न असलेल्या अनेक व्यक्ती दृष्टिक्षेपात येतात. पण त्यांच्या जीवनात पुष्कळ ताणतणाव दिसतो. त्यामुळे मनाला शांती मिळत नाही. याची कारणेदेखील विविध असू शकतात. काहींनी धन वाममार्गाने जमवलेले असते, त्यामुळे ती लक्ष्मी शापीत असते. लक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे. ती चांगल्या मार्गाने प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. देणाऱ्याचे आशीर्वाद हवेत; श्राप नव्हे!
- ‘प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण भावना नाहीत.’
- आजच्या युगात प्रचंड बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. पण त्याबरोबरच चांगल्या भावना असतील याची खात्री नाही. आपल्या सामाजिक क्षेत्रात प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) मिळालेली व्यक्ती चांगला पती अथवा पिता अथवा मुलगा असेल याची खात्री नाही. पुरुषांना लागू असलेली ही गोष्ट स्त्रियांच्या संदर्भातदेखील असू शकेल- चांगली पत्नी, माता, मुलगी…
एकवेळ बुद्धिमत्ता कमी असली तरी चालेल, पण सुखी जीवनासाठी भावना मुख्य आहेत. विविध तऱ्हेच्या समस्या- भांडणे, तंटे, घटस्फोट विद्वानांच्याच घरी जास्त दिसून येतात.
- ‘प्रचंड ज्ञान आहे, पण शहाणपण नाही.’
- यासंदर्भात समाजाकडे नजर फिरवली तर ही गोष्ट सहज पटेल. त्या मानाने पूर्वीच्या पिढीत ज्ञान कमी होते. लोक एवढे सुशिक्षित नव्हते, पण त्यांना शहाणपण जास्त होते. ज्याप्रमाणे त्या व्यक्ती कुटुंबात वागत असत तेव्हा ही बाब लगेच लक्षात येत असे.
- ‘महागडी घड्याळे आहेत, पण व्यक्तीला वेळ नाही.’
- पूर्वीची घड्याळे स्वस्त होती, पण हल्ली कितीतरी महागडी घड्याळे उपलब्ध आहेत. शेवटी घड्याळ हे वेळ दाखवण्याचे साधन आहे. स्वस्त आणि महागडे घड्याळ शेवटी तेच काम करते. समृद्ध व्यक्ती महागडी घड्याळे खरेदी करतात, पण दुर्भाग्य म्हणजे अनेकांना चांगल्या कामासाठी वेळच नसतो. त्यांचे ठरावीक उत्तर असते- ‘मला वेळ नाही!’
खरे म्हणजे ते वेळेचे व्यवस्थित आयोजन करत नाहीत. एक म्हण आठवते- ‘व्यस्त व्यक्तीला विविध कामांसाठी वेळ असतो; आळशी व्यक्तीला मात्र वेळ मिळत नाही.’
- ‘बरेच सारे प्रेमसंबंध, पण खरे प्रेम नाही.’
- अनेक सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुषांचे प्रेमसंबंध वाढलेले दिसतात- शाळा, कॉलेज, ऑफिस… पण ते प्रेम खरे आहे का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अनेकवेळा त्या संबंधात स्वार्थ, शारीरिक आकर्षण असते. केव्हा केव्हा ते इतके प्रेमात पडतात की काहीवेळा कुटुंबाचा विरोध पत्करून पळून जाऊन विवाहदेखील करतात. थोड्यांच्या बाबतीत कुटुंबाची सहमती मिळते. सर्व लग्नसोहळा आनंदाने साजरा केला जातो. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे ते जोडपे घटस्फोट घेते. कारण त्यांचे एकमेकांकडे पटत नाही. मग हे प्रेम खरे प्रेम कसे म्हणायचे?
विवाह हा एक पवित्र सोहळा आहे. अनेक धर्मांत असे मानलेले आहे. भारतीय विवाहात तर ‘सप्तपदी’मध्ये सात पावले टाकताना वधुवर एकमेकांना छान आश्वासने देतात. पण मुख्य म्हणजे हे सर्व कर्मकांडच राहिले आहे. अग्नीदेवाच्या व इष्ट परिवाराच्या उपस्थितीत या शपथा घेतल्या जातात. प्रत्येकाने हे सप्तपदीचे श्लोक वाचून अभ्यासण्यासारखे आहेत. विवाहाचे पावित्र्य समजले तर मग प्रेमविवाह करायला काही हरकत नाही. फक्त बाह्य आकर्षणामुळे केलेले विचार टिकणे फार कठीण आहे.
आपण सर्व या ज्ञानपूर्ण संदेशांचा अभ्यास करूया. त्यावर चिंतन, चर्चा करूया तरच त्या संदेशांचा योग्य उपयोग केला असे म्हणू शकतो. आचरणात आलेले ज्ञान असले तर फायदाच होईल. जीवन सुखी होईल.