गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने गोवा समग्र शिक्षणाच्या सरकारी बँक खात्याशी संबंधित 5.36 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संशयित मुख्य सूत्रधार सुभाषिस सिकंदर आणि अन्य एकाला कोलकाता येथे अटक करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुभाषिस सिकंदर याला कोलकाता येथे अटक करण्यात आली आहे. त्याने अलामिन मोंडल नावाच्या एका सहकाऱ्यामार्फत पर्वरी शाखेतील गोवा समग्र शिक्षण अभियानाच्या बँक खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवला आणि बनावट चेक वापरून निधी काढला आणि म्युल खात्यांद्वारे ते हस्तांतरित केले, असा आरोप आहे. गुन्हा विभागाने अटक केलेला दुसरा आरोपी मृगांका जोआर्डर हा लाँडरिंग पैशांच्या हाताळणीत सहभागी आहे, असा पोलिसांचा दावा आहे. यापूर्वी, पश्चिम बंगालमधील पाचजणांना पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे.