सभापती पदाचा उमेदवार ठरवण्यास विराधकांची पुढील आठवड्यात बैठक

0
3

सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपने गणेश गावकर यांचे नाव जवळ जवळ निश्चित केलेले असतानाच विराधी पक्षांचा मात्र या पदासाठी उमेदवार ठरलेला नाही. असे काल काँग्रेस व गोवा फॉरवर्ड ह्या पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. आमच्या प्रतिनिधीने काल याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना विचारले असता त्यांनी गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी विरोधी पक्षांचा उमेदवार निश्चित असेल, असे स्पष्ट केले. त्याबाबत चर्चा करून उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी सर्व विराधी पक्षांची एक बैठक पुढील आठवड्यात होणार असल्याचे आलेमाव म्हणाले. सध्या विरोधी पक्षांचे काही आमदार राज्याबाहेर आहेत. त्यामुळे आम्ही विराधी आमदारांची बैठक पुढील आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे आलेमाव म्हणाले. सदर बैठकीत एकमताने सभापतीपदासाठीचा विराधी पक्षांचा उमेदवार ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की विरोधी पक्षांची सदर प्रश्नाबाबत अजून चर्चा झालेली नाही. सर्व विरोधी पक्षांना बैठक घेऊन त्याबाबत चर्चा करावी लागेल. सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा आमदार निश्चितच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सभापतीपदी असलेल्या रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे सदर पद रिक्त झालेले आहे. त्यासाठी 25 सप्टेंबर रोजी एका दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आलेले असून त्यावेळी नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. गोवा विधानसभेच्या सभापतिपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सभापती निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व आमदारांची बैठक घेऊन विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

24 रोजी अर्ज स्वीकारणार

गोवा विधानसभेच्या सभापतिपदासाठी 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज विधानसभा सचिवालयात स्वीकारले जाणार आहेत, यासंबंधीची एक सूचना विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मान यांनी जारी केली आहे.