>> विरोधी पक्षांतर्फे आलेक्स सिल्वेरा रिंगणात
गोवा विधानसभा सभापतीपदासाठी काल भाजपतर्फे काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी अर्ज भरला. तवडकर यांनी काल गोवा विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
सभापतीपदासाठीची निवडणूक उद्या २९ मार्च रोजी होणार आहे. विरोधी पक्षांच्यावतीने सभापती पदासाठीचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे आमदार आलेक्स सिल्वेरा यांची निवड करण्यात आली आहे.
सत्ताधारी भाजपतर्फे सभापतीपदासाठीचे उमेदवार म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याबाबतची उत्सुकता राज्यातील जनतेला होती. काल भाजपने आपले उमेदवार म्हणून काणकोणचे आमदार व आपले एक ज्येष्ठ नेते रमेश तवडकर यांची निवड केली आणि काल तवडकर यांनी सभापतीपदासाठी अर्जही भरला.
कॉंग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांच्यावतीने आपले नुवे मतदारसंघातील आमदार व एक ज्येष्ठ नेते आलेक्स सिल्वेरा यांची सभापतीपदासाठीचे उमेदवार म्हणून शनिवारी निवड केली होती.
सत्ताधारी भाजपकडे स्वतःचे २० तसेच तीन अपक्ष आणि मगोचे दोन मिळून २५ आमदारांचे संख्याबळ आहे. तर कॉंग्रेसकडे स्वतःचे ११ गोवा फॉरवर्डचा एक आमदार, आम आदमी पक्षाचे दोन व रेव्होल्युशनरी गोवन्सचा एक असे १५ आमदारांचे संख्याबळ आहे.