सभापतींविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार ः गिरीश

0
39

आमदार अपात्रता याचिका प्रकरणाचा निकाल हा तीन महिन्यांच्या आत द्यायला हवा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कैशम मेघचंद्रसिंह निवाड्यात दिलेला आहे. याची कित्येक वेळा माहिती दिली असतानाही गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांनी गोव्यातील आमदार अपात्रता याचिका प्रकरणी निवाडा देण्याकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे आता त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरूद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते व याचिकादार गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले.

गोव्यातील भाजप सरकार ‘येन केन प्रकारेण’ सत्ता टिकवून ठेवू पाहत असून त्यासाठी लोकशाही तत्त्वांचीही होळी करीत असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील भाजप सरकार पुन्हा पुन्हा अन्य पक्षांतील आमदारांना आमिषे दाखवून त्यांना त्यांच्या पक्षांतून फोडून आपल्या पक्षात नेत असल्याचा आरोप चोडणकर यांनी यावेळी केला.
आता सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना तसेच सभापती रमेश तवडकर यांना नोटिसा जारी केल्या आहेत. या नोटिसाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी भाजपला लोकशाहीशी पाहिजे तसा खेळ मांडता येत नसल्याचा इशारा दिला असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले
आहे.