सप्रेम द्या निरोप…

0
14
  • मीना समुद्र

निरोपाची घडी मोठी अवघड असते. मनाला हुरहूर लावणारी, निराश करणारी, भविष्यातल्या वाटचालीची स्वप्ने दाखवणारी. 2024 साल संपताना त्या क्षणांनाही ‘सप्रेम द्या निरोप’ असे सांगावेसे वाटते, आणि नववर्षाचे स्वागत उत्फुल्ल मनाने करावेसे वाटते.

बोले अखेरचे तो, आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे…
एका माळ्याचे मनोगत सांगणारी कविवर्य चि. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभूंची ही कविता. बागेचा निरोप घेतानाची ही कविता. एक माळीकाम करणारा सर्वसामान्य माणूस… त्याची शेवटचा श्वास घेण्याची वेळ अगदी समीप येऊन ठेपली आहे. बागेत- आपल्या हाताने लावलेल्या, जिवापाड काळजी घेऊन वाढवलेल्या झाडापेडांचा तो निरोप घेत आहे. 2024 साल आता संपत आल्याने, निरोपाचे क्षण आल्याने या कवितेची आठवण झाली असावी.

सर्वसाधारणपणे माणूस आपल्या आप्तेष्टांचा, कुटुंबीय-नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचा निरोप घेतो. पण इथे एका सामान्य माणसाचे गणगोत झाडांच्या, पानाफुलांच्या वेगळ्याच रूपात कवितेत सामोरे येते. मातीची मशागत, बी पेरणे- ते रुजवणे- अंकुरणे, जलसिंचन करून ती प्रेमाने वाढवणे, त्यांची काटछाट करणे, त्यांना योग्य वाढीसाठी आकार देणे, ऊन- पाऊस- वादळवाऱ्यात त्यांना योग्य तो आधार देणे, सर्वतोपरी त्यांची देखभाल करणे हे सारे पोटच्या मुलाबाळांसारखे माळी करतो. त्यांच्याशी बोलतो. हितगूज करतो. हवे-नाही पाहतो. फुलांशी हसतो. फळांनी आनंदतो. पानांबरोबर हालतो-डोलतो. माणसावर जडावा असा त्याचा जीव या बागेवरच जडलेला आहे. त्याचं जगणं, त्याचं सुख-दुःख, त्याचं मैत्र या बागेशीच आहे. साहजिकच आयुष्याच्या अखेरच्या क्षणी बागेचीच आठवण झाली तर नवल नव्हे. तो अतिशय वृद्ध झाला आहे आणि त्याची जीर्णशीर्ण काया आता निद्राधीन… शांत शांत होत आहे. मोगऱ्यालाही त्याची अखेर कळली आहे, त्यामुळे-
गुंफून शेज त्याची, हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगऱ्याचा, पाती मिटून आहे…
पाकळ्यांच्या रूपाने मोगराही विकल मनाने अश्रू ढाळतो आहे. पाकळ्यांची शेज त्याने आपल्या पित्यासमान प्रिय वृद्ध माळ्यासाठी गुंफली आहे. त्याने आपली टवटवीत हिरवीगार पाने दुःखाने मिटून घेतली आहेत.
अंगावरी कळ्यांची, पसरून शाल गेला
सारा गुलाब आता, रोखून श्वास आहे…
गुलाबाचीही तीच कथा. मोगऱ्याने पाने मिटली आहेत, तर आपल्या या प्रिय व्यक्तीसाठी कळ्यांची शाल त्याच्या अंगावर पसरली आहे आणि आपला श्वास म्हणजे सुगंध जणू रोखून धरला आहे.

अतिशय नाजुक सुगंधी जाईजुई आपले सुवासिक गीत गात आहेत; पण आता या प्रेमळ हातांचे गोंजारणे मिळणार नाही म्हणून त्यांच्याही मनात हुरहूर दाटली आहे. दूर कुठेतरी कोपऱ्यात बसून त्या मंद सुरात अस्फुट गीत गात आहेत. आपल्याला घडवणाऱ्या, वाढवणाऱ्या या प्रेमळ व्यक्तीचा विरह त्यांनाही जाणवत आहे. त्यांचे हळुवार हृदय कातर बनले आहे.
वनवेळू वाजताहे, एकांत कीर्र ऐसा
माळीच की अखेरी, निःश्वास टाकताहे
किर्रर्र अशा एकांतात वनातला वेळू वाजतो. वाऱ्याच्या हलक्याशा झोताने वेळूवनात निर्माण होणारे स्वर म्हणजे जणू वृद्ध माळ्याचे निःश्वास आहेत. ही बाग त्याच्याशी इतकी एकरूप झाली आहे, तन्मय झाली आहे की त्याचे निःश्वास वेळूच्या स्पंदनातून वाजणारे एकांत संगीत आहे.
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे…
हा माळी बागेसाठी घननीळच होऊन आला. काळानिळा ढग आवाज करत, गर्जना करत येतो आणि आपल्या जवळचे सारे जल वर्षून निघून, विरून जातो. पण त्याच्या अस्तित्वाचे भान, त्याचा गंभीर नाद साऱ्या चराचराला व्यापून उरतो आणि तो जीवनगाणे घुमवीत राहतो.
माळ्याचे सर्जक हात जीवनभर ही बाग फुलविण्यात गुंतले. त्याचे प्रेम, त्याचे सर्वस्व ही बागच झाली. रिकाम्या हातांनी तो इथे आला. पण त्याने ही बाग वसवली, निर्माण केली, तिचे संगोपन- संवर्धन केले. जिवापाड तिची जपणूक केली. तिला आधार-आकार दिला. आणि हीच त्याची जन्मभराची आनंदाची ठेव झाली. कुटुंबीय, स्वकीय, आप्तेष्टांत रमावे तसा तो या बागेत रमला. आणि वयोमानानुसार वरचे बोलावणे आल्यावर त्यांच्या साथी-संगतीतच तो विश्रामधामाला चालला. पण आता त्याची ओंजळ फुलांनी भरली आहे, पानांनी देह सजला आहे. त्याचे जीवन सुफलसंपूर्ण झाले आहे. येताना रिकामा आला असला तरी जाताना ही हिरवाई, ही रंगीबेरंगी फुलांची माया, ईश्वरी सौंदर्य, त्यांचा सुगंध, त्यांची आत्मीयता त्याच्याबरोबर आहे. त्यामुळे तो बहरून चालला आहे. अतीव शांतीने, समाधानाने भरून चालला आहे.

माणसाची अखेरची इच्छा तरी काय असते? शांत-समाधानी अखेर लाभावी. जीवनभर केलेल्या बहुता सुकृताच्या जोडीने विठ्ठलाची आवडी निर्माण व्हावी आणि त्या रूपातच विलीन व्हावे.
तशी निरोपाची घडी मोठी अवघड असते. मनाला हुरहूर लावणारी, निराश करणारी, भविष्यातल्या वाटचालीची स्वप्ने दाखवणारी. 2024 साल संपताना त्या क्षणांनाही ‘सप्रेम द्या निरोप’ असे सांगावेसे वाटते, आणि नववर्षाचे स्वागत उत्फुल्ल मनाने करावेसे वाटते.