‘सनसेट’ अवधी हा अर्जासाठी,  निकालासाठी नव्हे : मुख्यमंत्री

0
93

कूळ मुंडकार कायदा दुरुस्ती
कूळ मुंडकार कायदा दुरुस्तीमधील कालमर्यादा निश्‍चित करणारे ‘सनसेट’ कलम अर्ज करण्यासाठीच घातलेले आहे, दावा निकालात काढण्यासाठी नव्हे, असे सांगून या कायद्यात कुळांना मालकी हक्क मिळवून देण्याच्या बाबतीत अडचण येत असेल तर योग्यवेळी त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कूळ आणि मुंडकारांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून मामलेदारांना असलेले अधिकार न्यायालयाला दिले. परंतु काही नेते आपल्या सरकारची बदनामी करण्याच्या हेतूनेच हा विषय उकरून काढून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे, पार्सेकर म्हणाले.
चाळीसही आमदारांच्या पाठिंब्याने विधेयक संमत झाले होते, असे सांगताच भाजप आमदार विष्णू वाघ व मगो आमदारही या विषयावर आवाज का उठवित आहेत, असा प्रश्‍न केला असता, मगो आमदारांच्या बाबतीत भाष्य करणे त्यांनी टाळले. परंतु विष्णू वाघ यांनी कधी काय केले, काय केले नाही हे सर्वांनाच माहीत आहे. लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, असे सांगून अंतर्गत प्रश्‍न कोणीही चव्हाट्यावर न आणण्याची सूचना आपण सर्व आमदारांना दिल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. अशा आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करणार काय, असा प्रश्‍न केला असता मुख्यमंत्री हसले.