देशातील सुप्रसिद्ध अशा साहित्यिकांच्या कादंबर्यांवर चित्रपट तयार करण्याचे दिवस आता मागे पडले असून त्याऐवजी सनसनाटी निर्माण करणार्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे कथा तयार करून चित्रपट निर्माण करण्याचा एक वेगळा ‘ट्रेंड’ देशात मूळ धरू लागला असल्याचा सूर काल ‘भारतीय सिनेमा आणि साहित्य’ या विषयावरील चर्चेतून व्यक्त करण्यात आला.यावेळी बोलताना केरळस्थित सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक मधू इरावनकरा म्हणाले की, एक काळ होता तेव्हा साहित्य हाच प्रादेशिक चित्रपटांचा कणा होता. ६०, ७० व ८० च्या दशकात केरळमधील मल्याळम्, कर्नाटकमधील कन्नड व प. बंगालमधील बंगाली प्रादेशिक चित्रपट हे त्या त्या प्रदेशातील गाजलेल्या कादंबर्यांवर आधारित असायचे. त्या काळात केरळ, कर्नाटक, प. बंगाल आदी राज्यात अभिजात अशा कादंबर्यांवर आधारित अप्रतिम असा सिनेमा तयार करण्यात आला. मराठीतही ती परंपरा होती. वर्तमानपत्रात आलेल्या एखाद्या बातमीच्या आधारे कथा तयार करून केलेला चित्रपट हा संवेदनशील बनू शकेल. पण तो चांगला गंभीर असा चित्रपट बनेलच असे नाही, असे ते म्हणाले.
बंगाली चित्रपट समीक्षक सुदेशना रॉय यांचे मात्र याबाबतीत वेगळे मत होते. एखाद्या वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारेही कादंबरी लिहिली गेलेली असून त्या कादंबरीवर आधारित नंतर चित्रपट बनवण्यात आल्याची उदाहरणे आहेत. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणार्या बातम्या या सामाजिक समस्यांवरही आधारित असतात हे विसरता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना उडिया चित्रपट दिग्दर्शक सव्यासाची महापात्रा म्हणाले की, अभिजात साहित्यावर आधारित चित्रपट तयार करायचे सोडून निर्माते-दिग्दर्शक झटपट पैसे कमावण्यासाठी रिमेकच्या नादी लागले असून त्यामुळे चित्रपटांचा दर्जा घसरू लागलेला आहे.
बंगाली चित्रपट समीक्षक शिलारित्या सेन यावेळी बोलताना म्हणाल्या की, गंभीर अशा साहित्यावर आधारित तयार केलेल्या चित्रपटांची एक मोठी परंपरा भारतात आहे. सशक्त अशा कादंबर्यांमुळे देशात सशक्त असे चित्रपट बनू शकल्याचे त्या म्हणाल्या.
कादंबर्यांवर आधारित चित्रपट तयार केले जाण्याचा काळ आता हळूहळू मागे पडू लागला असल्याचे मत यावेळी सर्वांनीच व्यक्त केले.