सनबर्न : ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच

0
3

>> शवचिकित्सेनंतरही मृत्यूचे कारण अस्पष्ट; आता व्हिसेरा चाचणी

धारगळ-पेडणे येथे सनबर्न संगीत महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर मृत्यू पावलेल्या नवी दिल्लीतील करण कश्यप (26) या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात काल करण्यात आले; मात्र त्याच्या मृत्यूचे कारण शवचित्कित्सेमध्ये स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा चाचणीनंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

28 डिसेंबरला करण कश्यप हा तरुण धारगळमध्ये आयोजित सनबर्न संगीत महोत्सवात सहभागी झाला होता. सनबर्नमध्ये सहभागानंतर अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने त्याला म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी करण कश्यप याचे निधन झाले होते. त्याच्या मूत्रपिंडाला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, व्हिसेरा चाचणीनंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकते, असे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

सनबर्नमध्ये सहभागी झालेल्या करण कश्यप याने संगीताच्या तालावर बेभान होत नृत्य केले होते, त्यानंतर तो बेशुद्ध होत जमिनीवर कोसळला होता. त्याचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवननाने झाल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता; मात्र शवविच्छेदन अहवालातून विशेष काही हाती लागलेले नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा चाचणीची वाट पाहावी लागणार आहे.

राज्यात गेली कित्येक वर्षे सनबर्न संगीत महोत्सव होत असून, या महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर मागील काही वर्षांत पाच जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. सनबर्नमधील सहभागानंतर तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी केली
जात आहे.

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी झालेल्या सनबर्नमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते. घटनेच्या आठ-दहा दिवसानंतर व्हिसेरा चाचणीनंतर त्या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर आले होते. एरव्ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण सहज स्पष्ट होताना सनबर्नमध्ये मृत्यू पावणाऱ्या तरुणांच्या मृत्यूचे कारण का समोर येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.