सनबर्नला सशर्त परवानगी

0
5

>> धारगळमध्ये आयोजनविरोधातील याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली

>> अटींच्या काटेकोर पालनाची जबाबदारी आयोजक व राज्य सरकारवर

28 ते 30 डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल सशर्त परवानगी दिली. धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये ही याचिकाकर्त्याने केलेली मागणी गोवा खंडपीठाने फेटाळून लावली; मात्र खंडपीठाने सनबर्न आयोजकांना काही अटी घातल्या असून, या अटींचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याकडे लक्ष देण्याची सूचना आयोजकांबरोबरच राज्य सरकारला केली आहे.

सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी न देण्याचा ठराव धारगळ येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला पंचायत मंडळाने सनबर्नला तत्त्वत: मान्यता देणारा ठराव मंजूर केला होता. त्याविरोधात याचिकाकर्त्याने गोवा खंडपीठात धाव घेऊन सनबर्नला परवानगी देण्याची मागणी केली होती.
धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यास स्थानिकांचा विरोध असला, तरी या प्रश्नावरुन ग्रामस्थांमध्ये फूट पडलेली असून, काही ग्रामस्थांचा या महोत्सवाला विरोध आहे, तर काही ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे.

सनबर्न आयोजकांनी यंदा हा महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. हा महोत्सव वेर्णा येथे आयोजित करण्यासाठी आयोजकांनी प्रयत्न केल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाल्यामुळे व लोकांनी दक्षिण गोव्यात कुठेही हा संगीत महोत्सव आयोजित करू देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आयोजकांनी हा महोत्सव धारगळ येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.

नियम-अटींचे उल्लंघन टाळण्याची सूचना

तीन दिवसीय सनबर्न संगीत महोत्सवाच्या वेळी संबंधित नियम व अटींचे उल्लंघन केले जाणार नाही, याकडे आयोजकांबरोबरच राज्य सरकारनेही लक्ष द्यावे अशी अट मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घातली आहे, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यानी स्पष्ट केले.

ग्रामसभेचे अधिकार मर्यादित स्वरूपाचे : पांगम

सनबर्नला परवानगी न देण्याचा ठराव धारगळच्या ग्रामसभेत घेण्यात आला असल्याचे काल ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, ग्रामसभेला देण्यात आलेले हक्क हे मर्यादित स्वरुपाचे आहेत. यासंबंधीचा निर्णय हा सत्तेवर असलेल्या पंचायत मंडळाने घ्यायला हवा.