‘सनबर्न’ला रात्री 10 वाजेपर्यंतच मुदत

0
20

मुख्यमंत्र्यांची माहिती, ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत कृती आराखडा सादर

वागातोर येथे येत्या 28 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सव संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारने काल सनबर्नमधील ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबतचा कृती आराखडा सादर केला. राज्यात वर्षअखेर संगीत वाजविण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत सवलत दिली जाते. तथापि, सनबर्न संगीत महोत्सवाचा कार्यक्रम रात्री 10 वाजता बंद केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
येथील उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सनबर्न संगीत महोत्सवातील ध्वनी प्रदूषण रोखण्याचा कृती आराखडा उच्च न्यायालयात काल सादर करण्यात आला आहे.

सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यात 31 डिसेंबरला, तसेच, कुठल्याही दिवशी रात्री 10 वाजल्यानंतर संगीत महोत्सव घेण्यास मान्यता दिली जाणार नाही. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात येणार असून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कार्यक्रमातील आवाज वाढल्याचे लक्षात येताच आयोजकांना आवाज कमी करण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्या वेळेत आवाज कमी न केल्यास आवश्यक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष विभागाच्या अध्यक्ष, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा कृती आराखडा सादर केला आहे. या संगीत महोत्सवाच्या ठिकाणी तीन उपसमित्या आणि मध्यवर्ती प्रदूषण देखरेख नियंत्रण उपसमित्या तैनात करण्यात येणार आहेत. या समित्यांमध्ये पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती कृती आराखड्यात दिली आहे.

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन
सनबर्न संगीत महोत्सव आयोजनासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पूर्ण पालन केले जाणार आहे. या संगीत महोत्सवाला प्रोव्हीजनला मान्यता देण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.