‘सनबर्न’ला राज्य सरकारकडूनही तत्त्वत: मान्यता

0
3

धारगळ ग्रामपंचायतीनंतर आता राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने सनबर्न संगीत महोत्सवाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. येत्या 28 ते 30 डिसेंबरदरम्यान धारगळ येथे हा सनबर्न ईडीएम संगीत महोत्सव होणार आहे.

दरवर्षी सनबर्न संगीत महोत्सवाच्या आयोजनाचा विषय पेडणे तालुक्यात चांगलाच गाजत आहे. सनबर्न संगीत महोत्सवाच्या आयोजकांनी दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला होता. तथापि, दक्षिण गोव्यातून सनबर्न आयोजनाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने अखेर सनबर्न आयोजकांनी उत्तर गोव्यातील थिवी मतदारसंघात महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न केला. तेथेही विरोध झाल्याने धारगळ येथे आयोजित करण्यासाठी धारगळ ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. धारगळच्या ग्रामसभेत सनबर्न संगीत महोत्सवाला विरोध करणारा ठराव संमत केला होता. तथापि, धारगळ ग्रामपंचायतीच्या पंचायत मंडळाच्या सत्ताधारी गटाने सनबर्न संगीत महोत्सवाला तत्त्वतः मान्यता देणारा ठराव संमत केला.

धारगळ ग्रामपंचायतीच्या ठरावामुळे पर्यटन खात्याने सनबर्न संगीत महोत्सवासाठी तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन खात्याने यासंबंधीचे पत्र सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सनबर्न संगीत महोत्सव आयोजकांना 13 नोव्हेंबर रोजी पर्यटन खात्याकडे संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी अर्ज सादर केला होता. पर्यटन खात्याच्या उच्चाधिकार समितीच्या 26 नोव्हेंबरच्या बैठकीत सनबर्न संगीत महोत्सवाला तत्त्वतः मान्यता देण्याचा ठराव संमत झाला आहे. दरम्यान, धारगळ ग्रामपंचायतीने सनबर्नला तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करून पंचायतीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.

धारगळ ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो पणजी येथे त्यांच्या सरकारी निवासस्थानी काल भेट घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. सनबर्न संगीत महोत्सव आयोजनावरून पेडणे परिसरात दोन गट तयार झाले आहेत.

सनबर्न होऊ देणार नाही : आर्लेकर
पर्यटन खात्याने सनबर्नला तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर याविषयी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ते म्हणाले. पर्यटन खात्याने या महोत्सवाला परवानगी दिली असली तरी आतापर्यंत स्थानिक नागरिक किंवा स्थानिक आमदाराकडे याविषयी चर्चा केलेली नाही. धारगळ पंचायत क्षेत्रात आणि पर्यायाने पेडणे मतदारसंघात सनबर्न महोत्सव होऊ देणार नाही ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामसभेच्या ठरावाला स्थगिती
धारगळ ग्रामपंचायतीच्या 24 नोव्हेंबरच्या ग्रामसभेत सनबर्न संगीत महोत्सवाला विरोध करणाऱ्या ठरावाला सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या स्पेसबाऊंड वेव लॅब प्रा. लिमिटेड या कंपनीने अतिरिक्त पंचायत संचालकासमोर आव्हान दिले आहे. अतिरिक्त पंचायत संचालकांनी त्या ठरावाला एक्सपार्टी स्थगिती दिली असून, त्या ठरावाबाबत नागरिकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 18 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. याबाबतची एक सूचना धारगळ ग्रामपंचायतीला पाठविण्यात आली आहे.