गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने (एएनसी) धारगळ येथील सनबर्न संगीत महोत्सवामध्ये सहभागी काही जणांच्या केलेल्या चाचणीमध्ये पाच जणांनी अमलीपदार्थ (ड्रग्स) सेवन केल्याचे आढळून आले, त्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमलीपदार्थविरोधी पथकाने सोमवारी रात्री सनबर्न संगीत महोत्सवात काही जणांची रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासणी केली. त्यात पाच जणांनी अमलीपदार्थ सेवन केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने घेऊन तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविले आहेत. त्या पाच जणांमध्ये अमेरिका, हैदराबाद, चेन्नई, मध्यप्रदेश आणि गोव्यातील कुंकळ्ळी येथील एकाचा समावेश आहे. 4 जणांनी गांजा, तर एका व्यक्तीने कोकेन सेवन केल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक तिकम सिंग वर्मा यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
पोलीस अधीक्षकांचा अजब दावा
धारगळमधील सनबर्न संगीत महोत्सवावेळी ड्रग्सचे सेवन केल्याचे आढळून आल्या प्रकरणी ज्या 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यांनी महोत्सव स्थळी अमलीपदार्थाचे सेवन केले नाही. तसेच, त्यांच्याकडे अमलीपदार्थ आढळून आलेला नाही, असा अजब दावा पोलीस अधीक्षक तिकम सिंग वर्मा यांनी केला.
करण कश्यपच्या मृत्यूवर भाष्य टाळले
सनबर्न संगीत महोत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर मृत्यू पावलेल्या नवी दिल्ली येथील पर्यटक करण कश्यप याच्या मृत्यूवर भाष्य करण्याचे पोलीस अधीक्षक तिकम सिंग वर्मा यांनी टाळले. सनबर्न संगीत महोत्सवात अमलीपदार्थाचा वापर होऊ नये म्हणून अमलीपदार्थविरोधी पथकाकडून कडक नजर ठेवली जात होती. दिल्ली येथील पर्यटकाच्या मृत्यूचे प्रकरण पेडणे पोलीस हाताळत आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल, असे वर्मा यांनी सांगितले.
9.2 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त
राज्यातील सनबर्न संगीत महोत्सव व सरत्या वर्षाच्या संगीत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमलीपदार्थविरोधी विभागाने दोन कारवायांमध्ये सुमारे 9.2 लाख रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला. एएनसी पथकाने मंगळवारी धारगळजवळील तुये-पेडणे या ठिकाणी छापा घालून सचिन हळदणकर या स्थानिक युवकाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे 7.7 लाख रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला. तसेच, साळगाव-बार्देश येथे नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 1.5 लाख रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केले, अशी माहिती तिकम सिंग वर्मा यांनी दिली.
वर्षभरात जवळपास 10 कोटींचे ड्रग्स जप्त
गोवा पोलिसांनी 1 जानेवारी 2024 ते 29 डिसेंबर 2024 या काळात 9.81 कोटी रुपयांचे 274 किलो अमलीपदार्थ जप्त केले. अमलीपदार्थप्रकरणी 159 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 188 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये स्थानिक 54, गोव्याबाहेरील 111 आणि विदेशी 23 जणांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात 77, दक्षिण गोव्यात 50, अमलीपदार्थविरोधी विभाग 32, गुन्हा विभाग 26 आणि कोकण रेल्वेने 3 जणांना अटक केली आहे.