>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र
देशातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. आता देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घ्यावा आणि लागू केलेले निर्बंध ते शिथिल करण्यास सुरुवात करू शकतात, असे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सर्व राज्यांनीही करोना निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. आता याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
मंत्रालयाच्या या पत्रात कोरोनाची आकडेवारी देखील देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी देशभरात एकूण २७४०९ रुग्ण समोर आले आहेत, तर गेल्या आठवड्यात हा आकडा ५० हजारांच्या पुढे होता. त्याच वेळी पॉझिटिव्हिटी दर देखील १५ फेब्रुवारीला ३.६३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या सकारात्मक बाबी आरोग्य मंत्रालयाने पत्रात नमूद केल्या आहेत.
निर्बंध शिथिल करतानाच कोरोनाच्या सद्य:स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. दररोज आढळून येणारे नवीन रुग्ण आणि संसर्गाचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण आणि कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत, असेही आरोग्य मंत्रालयाने पत्रात स्पष्ट केले आहे.