सत्य सांगणे हा वर्तमानपत्रांचा हक्क

0
92
माधव गडकरी यांच्या जयंती सोहळ्यातील व्याख्यानात बोलताना सुरेश द्वादशीवार.(छाया : किशोर नाईक)

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन
वर्तमानपत्रांचे काम टीका करणे आणि सत्य सांगणे हे आहे. हा वर्तमानपत्राचा हक्क आहे तो सरकारने मान्य करायलाच हवा. झुंडशाहीचे एक मोठे आव्हान पत्रकारितेसमोर आहे. सरकार, भांडवलदार, जाहीरातदार, मालक यांच्याशी संघर्ष करत इतकी सगळी आव्हाने पेलणे, या दृष्टीने वर्तमान पत्रांच्या बाबतीत या पुढचा काळ खूपच कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे काल इन्स्टिट्यूट ब्रागांझाच्या परिषदगृहात आयोजित केलेल्या पत्रकार माधवराव गडकरी यांच्या जयंती सोहळ्यात श्री. द्वादशीवार ‘उद्याची पत्रकारिता’ या विषयावरील आपल्या व्याख्यानात बोलत होते. टिळक, आगरकर यावेळची वर्तमानपत्रे संपादकांची होती. ती आता मालकांची झाली आहेत, असे स्पष्ट करून द्वादशीवार म्हणाले, आम्ही पेडन्युजच्या काळातले संपादक, हे आपणच सांगायला हवे. आज संपादकांना पाच प्रवृत्तींशी संघर्ष करावा लागतो. पहिला सरकार जो शक्तीशाली घटक आहे, जाहीरात बंदीचे अस्त्र ते उगारू शकतात. वर्तमानपत्रांची आजही गळपेची केली जात आहे. वर्तमानपत्रांच्या कार्यालयावर हल्ले करण्यार्‍या हल्लेखोरांना अटक होत नाही. दुसरा घटक भांडवलदारांचा आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे असते, की वर्तमानपत्र जाहीरातींसाठी असते, जाहीरातींना प्रतिष्ठा यावी म्हणून असते. जाहिरातदार हा तिसरा घटक नंतर येतो आणि चौथा घटक मालक हा पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या आड येणारा आहे हे सोदाहरण त्यांनी स्पष्ट केले.
माधवराव गडकरी लोकाभिमुख पत्रकार होते. परंतु संपादकांनी लोकाभिमुख असू नये असे म्हणणारा वर्गही होता असे सांगून द्वादशीवार यापुढे घरात बसून वार्ताहर, संपादक सगळे वर्तमानपत्र काढू शकतात एवढा तंत्रज्ञानाचा पगडा आहे. त्यामुळे वर्तमान पत्रासाठी कार्यालयाचीही गरज पडणार नाही. गडकरी हे बोलायचे तसे चालायचे. सहकार्‍यांना समजूतीच्या स्वरात गोष्टी सांगायचे.
प्रमुख पाहुणे सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी बनविलेल्या माधवराव गडकरी यांच्या पोटर्‌रेेटचे यावेळी त्यांनी अनावरणही केले. श्री. आर्लेकर, हरमलकर, संपादक मंडळाचे राजू नायक, ब्रागांझाचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. आर्लेकर यांनी सांगितले, की गडकरी यांनी पत्रकारितेत मानदंड निर्माण केले. वृत्तपत्र प्रबोधनाचे सक्षम माध्यम आहे. परंतु प्रबोधन करून ते थांबले नाहीत. आपल्या कृतीची जोड त्याला दिली. मोदींसारखे राजकारणी पत्रकारांना दूर का ठेवतात याचे आत्मपरीक्षण पत्रकारांनी करावे असे ते म्हणाले. राजू नायक यांनी त्यांच्या प्रास्तविकात ङ्गराजकारणी पत्रकारांना दूर ठेवण्याची भाषा करतातफ असे पंतप्रधान, मुख्यमंत्री पर्रीकर यांना उद्देशून बोलले होते. त्यावर उत्तर देताना आर्लेकर यानी वरील टिप्पणी केली.