राजभवनवर काल झालेल्या एका सोहळ्यात सत्यपाल मलीक (७३) यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांनी इंग्रजीतून शपथ घेतली.
शपथग्रहण सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावस्कर, सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, आमदार एलिना साल्ढाणा, निळकंठ हळर्णकर, सुदीन ढवळीकर तसेच विविध खात्यांचे सचिव संचालक व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. राजभवनच्या बाहेर उभारण्यात आलेल्या शामियान्यात शपथग्रहण सोहळा संपन्न झाला.
शांततापूर्व जीवन व्यतित
करता येणार : मलीक
गोवा ह्या शांततापूर्व अशा राज्याचा राज्यपाल बनल्याने येथे शांततापूर्णरित्या आपणाला जीवन व्यतीत करता येणार असल्याचे नवनियुक्त राज्यपाल सत्यपाल मलीक यानी काल शपथग्रहण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोव्यात येण्यापूर्वी आपण काश्मीरात होतो. समस्याग्रस्त अशा त्या प्रदेशात आपण यशस्वीरित्या काम केल्याचे ते म्हणाले.
गोव्यात कामही चांगल्या प्रकारे चालू असून आपण येथे शांततापूर्णरित्या काम करू शकणार असल्याचे ते म्हणाले. येथील लोक चांगले आहेत. मुख्यमंत्रीही शांत स्वभावाचे असल्याचे सांगून गोव्याचे जगभरात नाव आहे, असे ते म्हणाले.