मतदानोत्तर चाचण्यांतून अंदाज व्यक्त; 5 राज्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण; 3 डिसेंबरच्या निकालाची प्रतीक्षा
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) अंदाज समोर आले. या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे; पण त्याआधी मतदानोत्तर चाचण्यांतून समोर आलेल्या अंदाजानुसार पाचही राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस आहे, तर तेलंगणात काँग्रेसकडून भारत राष्ट्र समितीला जोरदार टक्कर मिळणार असल्याचा अंदाज आहे. मिझोरममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट (एमएनएफ) आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचा अंदाज चाचण्यांतून वर्तवण्यात आला आहे.
मध्यप्रदेशात कोणाची जादू चालणार?
मध्यप्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून बहुमताचा आकडा 116 आहे. एबीपी-सी व्होटर, टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्टार्ट, रिपब्लिक भारत, न्यूज 18-मॅट्रिझ आणि न्यूज 24-चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची झुंज पाहायला मिळणार आहे. यापैकी रिपब्लिक भारत, न्यूज 18 मॅट्रिजच्या न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर इतर तीन एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. कोणत्याही पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात अगदी थोड्या फरकाने पक्ष सत्तेवर येईल. कदाचित अपक्ष आणि इतर पक्षांच्या दोन-तीन जागादेखील निर्णायक ठरू शकतात. मध्य प्रदेश विधानसभेत सध्या तीन अपक्ष आमदार आहेत. तर एक आमदार बहुजन समाज पार्टीचा आहे. सध्या विधानसभेत भाजपाकडे 128, तर काँग्रेसकडे 98 आमदार आहेत.
राजस्थानात ‘ती’ परंपरा कायम राहणार?
राजस्थानमध्ये गेली तीन साडे तीन दशके दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत आली आहे. तीच परंपरा यावेळी कायम राहणार का, हे निकालांतून स्पष्ट होणार आहे. काँग्रेस पक्षाने आपले अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकत्र येत ही निवडणूक लढवली. सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. तोच प्रयत्न सफल होताना दिसून येत आहे. 200 जागा असणाऱ्या राजस्थानच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 101 असा आहे.
आजतक आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला शंभरीपार जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या तुलनेत मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपला 80 ते 100 जागा मिळू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. टाईम्स नाऊच्या अंदाजानुसार भाजपला 108 ते 128, तर काँग्रेसला 56 ते 72 जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज 24-चाणक्यच्या अंदाजानुसार काँग्रेसला 101, तर भाजपला 89 जागा मिळतील, असा अंदाज आहे. रिपब्लिक भारतच्या अंदाजानुसार भाजपला 100 ते 122 आणि काँग्रेसला 62 ते 85 जागांचा अंदाज आहे. न्यूज 18-मॅट्रिजच्या अंदाजानुसार भाजपला 111, तर काँग्रेसला 74 जागांचा अंदाज आहे.
छत्तीसगढ पुन्हा काँग्रेस
छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला आहे, त्याचबरोबर भाजपकडूनही छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. छत्तीसगढमध्ये 90 जागा असून, बहुमताचा आकडा 46 असा आहे. एबीपी-सीव्होटरच्या एकमेव अंदाजानुसार भाजपला 41 ते 53 आणि काँग्रेसला 26 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित इंडिया टीव्ही – सीएनएक्स, टीव्ही 9 – पोलस्टार्ट, इंडिया टुडे – ॲक्सिस, न्यूज 18 – मॅट्रिज आणि अन्य काही संस्थांच्या अंदाजानुसार काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेस-बीआरएसमध्ये काँटे की टक्कर
तेलंगणात कालच 119 जागांसाठी मतदान पार पडले आहे. 60 जागा मिळवणारा पक्ष या राज्यात सत्ता स्थापन करुर शकणार आहे. भाजप, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) अशी तिरंगी लढत या ठिकाणी आहे. इंडिया टीव्ही सीएनक्सच्या एक्टिट पोलच्या अंदाजानुसार बीआरएसला 31 ते 47 जागा मिळतील, तर काँग्रेसला 63 ते 79 जागा मिळतील. भाजपला 2 ते 4 जागा , तर एमआयएमला 5 ते 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
बीआरएसला 40 ते 45 जागा मिळतील असा अंदाज जन की बातने वर्तवला आहे, तर काँग्रेसला 48 ते 64 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला 7 ते 13 जागा मिळतील तर एआयएमआयमला 4 ते 7 जागा मिळतील असा अंदाज या पोलने वर्तवला आहे. काँग्रेसला 58 ते 68 जागा मिळतील असा अंदाज रिपब्लिक टीव्ही पोलने वर्तवला आहे, तर बीआरएसला 46 ते 56 जागा मिळतील. भाजपला 4 ते 9 जागा, तर एमआयएमला 5 ते 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
मिझोरमच्या जनतेचा कौल कुणाला?
ईशान्य भारतातील मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागा असून, बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट (एमएनएफ), काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेस यावेळीही सत्तेपासून दूर असल्याचे चित्र आहे. झोरम पिपल्स मुव्हमेंट पक्षाच्या जागांमध्ये मात्र वाढ होणार आहे.