राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्याच्या सुकन्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाने कला आणि संस्कृती खात्यातर्फे पुरस्कार सुरू करण्याबरोबरच गोवा विद्यापीठात एक विशेष अध्यासन सुरू करण्यात येईल. तसेच अन्य जे-जे काही करणे शक्य आहे ते केले जाईल, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल कॉंग्रेस हाऊसमध्ये पक्षातर्फे लतादीदींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर बोलताना दिली.
याप्रसंगी बोलताना चोडणकर यांनी, लतादीदींमुळे गोव्याचा गौरव झाला. त्यांच्या जाण्याने समस्त गोमंतकीयांना दु:ख झाले असून कॉंग्रेस पक्ष व समस्त गोमंतकीयांच्यावतीने आपण लतादीदींना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी, लतादीदींपूर्वी चित्रपटसृष्टीत नूरजहॉ, शमशाद बेगम, जोहराबाई आदी ज्या गायिका होत्या त्यापेकी बहुतेक जणांचा आवाज हा अनुनासिक होता. मात्र, ती परंपरा खंडित करीत लतादीदींनी जे गायन केले ते स्वर्गीय असल्याचे सांगितले.