सत्ता समतोल

0
8

(विशेष संपादकीय)

‘अबकी बार चारसौ पार’ची हवा काल भारतीय मतदाराने उतरवली. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, तरी तिच्याहून शेवटी देश मोठा असतो ह्याची जाणीव कालच्या लोकसभा निवडणूक निकालांनी करून दिली आहे. विरोधकांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा सर्रास चाललेला गैरवापर, विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी चाललेली घाऊक फोडाफोडी, नरेंद्र मोदी यांना जवळजवळ ईश्वरी अवतार भासवण्याचा काही माध्यमांद्वारे चाललेला प्रयत्न, प्रशासनात सतत दिसणारी आत्यंतिक एकाधिकारशाही ह्या सगळ्याप्रतीची भारतीय मतदाराची तीव्र नाराजी कालच्या निकालांतून अत्यंत कठोरपणे प्रकटली आहे. ‘इंडिया’ आघाडी ही त्यासाठी केवळ निमित्तमात्र ठरली आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशात केलेली क्रांती, जागतिक स्तरावर भारताची उंचावलेली मान, साधनसुविधांचा केलेला उदंड विकास, राबवलेल्या असंख्य जनकल्याणकारी योजना ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्यामुळे डोळ्यांआड झाल्या असे कालचा निकाल सांगतो आहे. परिणामी, भारतीय जनता पक्षाला स्वतःचे तीनशे सत्तरचे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी ‘चारशेपार’ चे उद्दिष्ट गाठणे तर दूरच राहो, स्वतः 272 चे स्पष्ट बहुमत प्राप्त करणेही दुरापास्त होऊन गेले.
बिहारमध्ये नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशात एन. चंद्रबाबू नायडू यांच्याशी अखेरच्या क्षणी केली गेलेली हातमिळवणीच काय ती भाजपला ह्यावेळी तारक ठरलेली दिसते. दक्षिणेत मुसंडी मारण्याचा प्रयत्न यावेळीही फसला, पश्चिम बंगालला भगवा करण्याचा मागील लोकसभा निवडणुकीने जागवलेला आत्मविश्वासही कुचकामी ठरला आणि ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ म्हणतात तसा उत्तर प्रदेशने यावेळी असा काही दगा दिला की 2004 च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’ची जी गत झाली होती, जवळजवळ तीच परिस्थिती ह्या निवडणुकीत ओढवली. पैकीच्या पैकी जागा मिळवून देणाऱ्या अनेक राज्यांनी ह्यावेळी पाठ फिरवली, तेथे विरोधकांनी डोके वर काढले. त्यामुळे जागा वाढणे तर दूरच, उलट ज्या होत्या, त्या जागा घटण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. नायडू आणि नितीश यावेळी सोबत नसते तर काय झाले असते हे खरोखर विचार करण्याजोगे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अश्वमेध रोखून धरला आणि कधी नव्हे ते काँग्रेसनेही देशाच्या सर्व भागांमध्ये चांगली कामगिरी दाखवत आपली घसरलेली पत पुन्हा मिळवली आहे.
खरे पाहता ‘इंडिया’ आघाडीद्वारे एकास एक लढत देण्याची मोठी गर्जना विरोधी पक्षांनी केली होती, परंतु ही आघाडी अस्तित्वात येण्याआधीच तिची लक्तरे निघाली होती. राज्याराज्यांत तिचे घटक पक्ष एकमेकांशीच लढले होते. असे असूनही जेथे जेथे एकास एक लढत झाली, तेथे तेथे भाजपला हे आव्हान जड गेले आहे असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत जरूर, परंतु त्यांची जी काही आभा मागील दोन लोकसभा निवडणूक निकालांत झगमगत होती, ती यावेळी दिसत नाही. देशात दिसू लागलेल्या एकाधिकारशाहीमुळे मतदारराजा अस्वस्थ होता आणि त्याने ह्या निवडणुकीतून लोकसभेमध्ये सक्षम विरोधक निर्माण केलेला आहे. लोकशाहीमध्ये सरकार जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच विरोधी पक्षही महत्त्वाचे असतात हा ह्या लोकसभा निवडणुकीतून मतदारराजाने दिलेला रोखठोक संदेश आहे. आता जे निवडून आले आहेत, त्यापैकी कितीजण विरोधात टिकतात आणि कितीजण स्वार्थासाठी सत्तेच्या पदराखाली जातात हे पुढे दिसेलच, परंतु निरंकुश सत्ता घातक ठरू शकते ह्या जाणिवेतून भारतीय मतदारांनी सजगपणे आपला हा कौल दिलेला आहे असे आम्हाला ठामपणे वाटते. मोदी पाशवी बहुमताने पुन्हा आले तर भारतीय संविधान धोक्यात येईल हा जो काही हल्लागुल्ला विरोधकांनी केला होता, त्याचाही परिणाम भारतासारख्या बहुविधता असलेल्या देशातील मतदारांवर झालेला असू शकतो. मोदी नक्कीच मोठे आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा देश मोठा आहे हा ह्या निवडणुकीचा सर्व आंधळ्या भक्तांना संदेश आहे.
हा निकाल देशासाठी किती हितकारक ठरेल हे सांगणे मात्र ह्याक्षणी अवघड आहे. स्वबळाच्या भक्कम सरकारपेक्षा आघाडीचे सरकार हे नेहमीच कमकुवत आणि कामावर मर्यादा आणणारे असते हे सांगण्याची गरज नसावी. ह्या मर्यादा दूर सारण्यासाठी भाजप आता काय काय करतो हे पाहावे लागेल. एकेकाळी आघाडी सरकारने अटलबिहारी वाजपेयींचे कसकसे पाय ओढले होते हे देशाने पाहिले आहे. परंतु ह्यावेळी नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता समोर आहे आणि तो सत्तेसाठी मित्रपक्षांचे भलते लाड खपवून घेणार नाही हेही स्पष्ट आहे. परंतु समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक वगैरे मुद्द्यांचे आता काय होणार हे पाहावे लागणार आहे. किमान आपले विकसित भारताचे स्वप्न, त्यासंबंधीचे संकल्प यांच्या आड मोदी कोणाला येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा आहे. अमृतपालसारख्या खलिस्तानवादी, राशीद इंजिनिअरसारख्या राष्ट्रद्रोही प्रवृत्ती तुरुंगातून निवडणूक लढवून संसदेत पोहोचल्या आहेत, त्यांना वेळीच रोखणे जरूरी असेल. राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्राची जागतिक प्रतिमा, विकासात्मक वाटचाल यामध्ये कोणताही अडसर येणे देशहिताचे नसेल.
ह्या निवडणुकीने भाजपचा अहंकार मात्र निश्चित उतरवला आहे. जनतेसमोर जाताना नतमस्तक होऊन जायचे असते हे भान ह्या निवडणुकीने दिले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा क्षणिक फायदा होतो, परंतु दीर्घकाळाचा विचार करता ते हानीकारक असते हे महाराष्ट्राच्या निकालांनी दाखवून दिले. तेथे सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली गेली होती, परंतु खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती हे निवडणुकीचा निकाल सांगतो आहे. इंडिया आघाडीला हिंदी पट्ट्यात मिळालेले यश हे अत्यंत अनपेक्षित आहे. त्यात त्यांची कर्तबगारी किती आणि मोदी सरकारच्या काळात घडलेल्या अतिरेकी गोष्टींचा मतदारांना आलेला उबग किती हेही तपासावे लागेल. ह्या निवडणुकीतून काँग्रेस पक्षाने पुन्हा उभारी जरूर घेतली. अमेठी आणि रायबरेलीचे गडही जिंकले. ऐन निवडणुकीच्या काळात बँक खाती गोठवली गेली असताना, बहुतांश प्रसारमाध्यमे जणू सरकारी प्रचारयंत्रणा बनलेली असताना, केंद्रीय यंत्रणा प्रत्येक विरोधी नेत्याचा आवाज दाबण्यासाठी हात धुवून मागे लागलेल्या स्थितीत असताना, विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एकापाठोपाठ एक तुरुंगात पाठवले जात असताना, हे यश ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांना मिळाले आहे, त्यामुळे ते मोठे जरूर आहे, परंतु ह्या वाढीव संख्याबळाचा वापर देशहिताच्या विषयांवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आणि सतराव्या विधानसभेत झाले त्याप्रमाणे सभागृहाच्या कामकाजात उठता बसता खो घालण्यासाठी होणार नाही अशी अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांची तुल्यबळ संख्या देशाला आणि देशाच्या लोकशाहीला ह्या घडीस आवश्यक असलेला सत्तेचा समतोल मिळवून देईल, सत्तेला पाशवी स्वरूप देणार नाही, पराकोटीच्या एकाधिकारशाहीचे रूप देणार नाही अशी जशी अपेक्षा आहे, तसेच हे विरोधी बळ सकारात्मक कार्य करील अशीही आशा करूया!