सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा शिंदेंच्या बाजूने

0
16

>> एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना; शिंदेंचे सगळे आमदारही पात्र, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निकाल

शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी अखेर जवळपास दीड वर्षानंतर काल अंतिम निकाल जाहीर झाला. राहुल नार्वेकर यांनी जवळपास दीड तास निकालाचे वाचन केले. त्यानुसार, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवले; मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला. शिवसेना पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देतो, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचन करताना नमूद केले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे आमदार भरत गोगावले यांचा व्हीपही नार्वेकर यांनी वैध ठरवला. शिवसेनेच्या 1999 च्या घटनेत पक्षप्रमुख नाही, तर राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे. फक्त पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करत, पक्षप्रमुखच अंतिम निर्णय घेऊ शकतात, हा ठाकरे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील यापूर्वीचा महाराष्ट्र सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनीही शिंदेंच्या गटाला राजकीय पक्षाची मान्यता दिल्याने एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय मानला जात आहे.

वधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी संपली. एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली होती.
खरी शिवसेना कुणाची हे ठरवताना शिवसेना पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षातील बहुमत हे महत्त्वाचे आहे, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केले. तसेच गेल्या तीन महिन्यात दोन्ही गटाच्या वतीने झालेल्या युक्तिवादाची माहिती देखील नार्वेकर यांनी दिली.

एकही आमदार अपात्र नाही
16 पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही, असे काल राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकाल वाचनादरम्यान म्हटले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, लता सोनावणे, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेतून केली होती. याबाबत निर्णय देत असताना एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंनी दिलेली घटना वैध नाही
दोन्ही गटांकडून शिवसेनेची घटना मागवून घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नव्हती, म्हणून त्यांनी दिलेली घटना वैध नाही. 1999 साली निवडणूक आयोगात दाखल केलेली घटना वैध आहे. 2018 साली घटनेत केलेले बदल निवडणूक आयोगाला न कळवल्याने ते बदल देखील वैध नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत ही शिवसेनेची खरी घटना आम्ही ग्राह्य धरली आहे. पर्यायाने ठाकरेंनी दिलेली घटना वैध नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

बहुमताच्या आधारे निकाल
कोणता गट हा खरा पक्ष आहे, हे ठरवण्यासाठी 2018 ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही. त्यामुळेच विधीमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे, याचा निर्णय घेत आहे. बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे, असे नार्वेकर म्हणाले.

गोगावलेंनाच प्रतोद म्हणून मान्यता
शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांनाच प्रतोद म्हणून मान्यता आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा व्हीप अमान्य आहे. याशिवाय राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2018 ची घटनादुरुस्ती अमान्य करत, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीच अवैध ठरवली. त्याशिवाय उद्धव ठाकरे हे केवळ पक्षप्रमुख म्हणून कोणालाही मनमर्जीने हटवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. त्यासाठी कार्यकारिणीची मंजुरी आवश्यक होती, असे राहुल नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्रतेबाबत दोन्ही गटांनी केलेल्या याचिका नार्वेकरांनी फेटाळल्या.

उद्धव ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर जहरी टीका
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसून राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशी प्रतिक्रिया काल उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच शिवसेना कुणाची या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील एखादे लहान मूलही देऊ शकते; पण निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे; कारण निवडणूक आयोगाच्या निकालाचा त्यांनी आधार घेतला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांना शिवसेना संपवायची होती; पण शिवसेना काही संपणार नाही. मिंधे किंवा गद्दारांची शिवसेना महाराष्ट्रातली आणि देशाची जनता मान्य करणार नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राहुल नार्वेकर यांनी मांडलेले पाच मुद्दे

शिंदे गट खरी शिवसेना आहे.
भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचे सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.

सुप्रीम कोर्टाकडून जे जे अवैध, ते ते नार्वेकरांकडून वैध!
कालच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी अवैध ठरवल्या, त्याला नार्वेकर यांनी वैध ठरवले. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश दिले होते. गुवाहाटीमध्ये शिंदे गटाने प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आपल्या निकालात ही नियुक्ती अवैध ठरवली. त्याशिवाय, सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात शिंदे गटाने आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्तीदेखील सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात रद्द केली होती.