सत्ताधारीच वरचढ

0
26

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने संसदेत आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेमध्ये विरोधकांपेक्षा सत्ताधारी केवळ संख्येच्याच नव्हे, तर वक्तृत्वाच्या दृष्टीनेही वरचढ ठरल्याचे गेल्या दोन दिवसांत दिसून आले. खरे तर मणिपूरच्या विषयावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गाजावाजा करून हा अविश्वास ठराव आणला गेला होता, परंतु त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. मात्र, उत्तम वक्त्यांचा अभाव, मुद्देसूदपणाची वानवा आणि संख्याबळच कमी असल्याने मिळणारा कमी वेळ यामुळे विरोधकांची भाषणे अपेक्षित उंची गाठूच शकली नाहीत, हे गेल्या दोन दिवसांत स्पष्ट दिसले. खरे तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या चर्चेच्या निमित्ताने आपले अनेक नवे चेहरे संसदेत पुढे आणले होते. श्रीकांत शिंदे आणि डॉ. निशिकांत दुबेंपासून नंदूरबारच्या खासदार डॉ. हीना गावित आणि मित्रपक्ष अपना दलाच्या अनुप्रिया पटेलांपर्यंत अनेक उत्तम वक्त्यांचा परिचय देशाला भाजपने या चर्चेदरम्यान घडवला हे उल्लेखनीय आहे. भाजपपाशी मुलुखमैदान नेत्यांची वानवा नाही. स्मृती इराणींपासून अमित शहांपर्यंत सर्व ज्येष्ठ नेते विरोधकांचा समाचार घ्यायला पुरेसे होते, परंतु जे नवे नेते मैदानात उतरवले गेले, त्यांनीही अत्यंत प्रभावीपणे किल्ला लढवल्याचे पहायला मिळाले. विरोधकांच्या वतीने बोलणाऱ्यांत मंगळवारी सुप्रिया सुळे मुद्देसूदपणे बोलल्या होत्या. काल द्रमुकच्या कनिमोळीही सूत्रबद्धरीत्या बोलल्या. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांचेही भाषण दमदार होते. परंतु तरीही विरोधी ‘इंडिया’ आघाडीतील इतर नेत्यांचे सरासरी वय आणि वक्तृत्व त्यांना साथ देत नसल्याचे जाणवत होते. ‘इंडिया’ची मदार ज्या राहुल गांधींवर होती त्यांनी तर कमाल केली. राहुल गांधींचे सुरवातीचे संपूर्ण भाषण अत्यंत अघळपघळ होते. शेवटी ते मणिपूरवर आले तेव्हा आक्रमक झाले, परंतु नाट्यमय बोलण्याच्या नादात ‘भारतमातेचा मणिपूरमध्ये खून पडल्या’च्या वक्तव्याने त्यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे. तेवढे पुरेसे नाही म्हणून की काय भाषणानंतर संसदेबाहेर निघून जाण्यापूर्वी त्यांनी जो तथाकथित ‘फ्लाईंग किस’ दिला, त्यावरून त्यांना स्त्रियांशी दुर्व्यवहार करणारा ठरविण्याची संधी भाजपच्या महिला खासदारांनी घेतली. स्मृती इराणी यांनी तर राहुल यांना आपल्या भाषणात धू धू धुतले. त्यामुळे काँग्रेसचे सर्वांत मोठे अस्रच फुसके निघाल्यासारखे झाले. राहुल यांनी भाषणात भाजप सरकारवर संपूर्ण देशभरात केरोसीन फेकत दंगे भडकावीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आपण देशभक्त नव्हे, तर देशद्रोही आहात, राखणदार नव्हे, तर हत्यारे आहात वगैरे फैरी त्यांनी झाडल्या खऱ्या, परंतु त्यांच्या त्या भाषणाचे गांभीर्यच नंतरच्या कथित ‘फ्लाईंग किस’ प्रकरणाने नाहीसे केले. नुकतेच निलंबनातून परत आलेल्या राहुल गांधींनी आपल्या विधानांतून आणि कृतींतून भलते वाद तर ओढवून घेत नाही ना याचे भान राखणे आवश्यक आहे. किमान आपल्याला एखादा मुद्दा जेव्हा जोरकसपणे मांडायचा असतो, तेव्हा त्यापासून भरकटवण्याचा जो प्रयत्न पलीकडून होईल त्याला बळी न पडता आपल्या मुद्द्याला जखडून राहणे गरजेचे असते. राहुल यांच्या कथित ‘फ्लाईंग किस’ने त्यांच्या आधीच्या भाषणाने पुढे आणलेल्या सगळ्या मुद्द्यांवर स्वतःच पाणी फेरले. यापूर्वी मोदी सरकारवर जेव्हा तेलगू देसमने अविश्वास ठराव आणला होता तेव्हाही राहुल यांनी भाषण घणाघाती केले होते, परंतु नंतर मोदींना मिठी मारण्याचा आणि सहकाऱ्यांना डोळा मारण्याचा पोरकटपणा करून स्वतःचे हसे करून घेतले होते. काल त्याचीच पुनरावृत्ती झाली. या चर्चेच्या दरम्यान भाजपचे नेते बोलत असताना त्यांच्यावर कॅमेरा रोखलेला असे, परंतु विरोधकांची भाषणे सुरू असताना मात्र लोकसभा टीव्हीचा कॅमेरा पुन्हा पुन्हा विधानसभा अध्यक्षांवर फिरत होता हेही विरोधकांच्या नजरेतून सुटले नाही. कनिमोळी यांच्या भाषणावेळी त्यावर सभापतींकडे निषेधही नोंदवला गेला, परंतु तरीही हा प्रकार सुरूच होता हेही नमूद करायला हवे. ह्या अविश्वास ठरावावरील चर्चा अशा प्रकारच्या अविश्वास ठरावांवरील यापूर्वीच्या चर्चांच्या तुलनेत अतिशय सपक वाटत होती. अटलबिहारी वाजपेयींवर जेव्हा अविश्वास प्रस्ताव आला होता, तेव्हा संसदेत पहाटे उशिरापर्यंत अखंड चाललेल्या चर्चेतील सत्ताधारी आणि विरोधकांची एकाहून एक वरचढ भाषणे ही पाहणाऱ्यांसाठी बौद्धिक मेजवानी ठरली होती. सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांना कोपरखळ्या, हास्यविनोद यांतून खेळीमेळीचे वातावरणही दिसले होते. यावेळी मात्र परस्परांप्रतीच्या सूडभावनेची छाप चर्चेवर पडल्यावाचून राहिली नाही.