सत्तरीतील भव्य मराठी सांस्कृतिक महोत्सव

0
222
  • आनंद मयेकर

गोवा मराठी अकादमीचे नाव आणि कार्य सृजनसंगम, शिवगोमंत गाथा, मराठी महामेळावे, तालुका सांस्कृतिक मेळावे इत्यादी विविध कार्यक्रमांद्वारे गोमंतकाच्या कानाकोपर्‍यात पोहोचत आहे. पण मोर्ले- सत्तरी येथील सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने २९ डिसें.२०१९ रोजी श्री केळबाई देवस्थानातील पं. महादेवशास्त्री जोशी सभागृहात संपन्न झालेला मराठी सांस्कृतिक मेळावा सर्वांवर कळस चढविणारा म्हणावा लागेल.

गोमंतकातील सत्तरी तालुका हा निव्वळ सत्तर गावांनीच बनलेला नसून हिरव्यागार वनश्रीने आणि दर्‍याखोर्‍यांनी नटलेला तसेच साध्या भोळ्या- भाबड्या कष्टकर्‍यांनी भरलेला आहे. आपली संस्कृती आणि मराठी परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा जणू मराठीचा बालेकिल्ला म्हणूनच मानला जातो.

गोवा मराठी अकादमीचे नाव आणि कार्य सृजनसंगम, शिवगोमंत गाथा, मराठी महामेळावे, तालुका सास्कृतिक मेळावे इत्यादी विविध कार्यक्रमांद्वारे गोमंतकाच्या कानाकोपर्‍यात पोहोचत आहेत. या विविधांगी कार्यक्रमांना सर्वत्र मिळणारा उदंड प्रतिसाद निश्चितच आश्‍वासक वाटतो. सत्तरी तालुक्यातील मराठी प्रेमींचा आणि विशेषतः तरुणाईचा उदंड प्रतिसाद आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मिळत आल्याने सत्तरीतील ठाणे आणि नगरगाव येथील मराठी सांस्कृतिक आणि साहित्यिक मेळावे अत्यंत दिमाखात संपन्न झाले. परंतु मोर्ले सत्तरी येथील सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने २९ डिसेंबर २०१९ रोजी मोर्ले देऊळवाडा येथील श्री केळबाई देवस्थानातील पं. महादेवशास्त्री जोशी सभागृहात सुमारे ८०० हून अधिक मराठी प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झालेला मराठी सांस्कृतिक मेळावा सर्वांवर कळस चढविणारा म्हणावा लागेल. याचे संपूर्ण श्रेय कार्याध्यक्ष कृष्णा गावकर व इतर पदाधिकारी, तसेच देवस्थानचे पदाधिकारी, गावातील युवक-युवती, महिला वर्गाने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादालाच द्यावे लागेल. एवढा भव्य-दिव्य महोत्सव एवढ्या भरगच्च उपस्थितीत गेल्या ४०-५० वर्षांत कधीही झाला नाही… असे बरेच ग्रामस्थ अभिमानाने सांगताना दिसले.

भव्य ग्रंथ दिंडी

या महोत्सवाचा शुभारंभ श्री सातेरी देवीला श्रीफळ अर्पण करून तसेच तिचे आशीर्वाद घेऊन सकाळी ठीक ८ वा. ग्रंथ-दिंडी सुरू करून करण्यात आली. संपूर्ण भारतीय वेशभूषेत नटून-थटून मोठ्या संख्येने सुहासिनी तसेच वारकरी टाळ-मृदंग, भगव्या पताका, अब्दारणी इ. साज घेऊन ग्रंथ दिंडीत मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोबाची पालखी खांद्यावर अभिमानाने मिरवीत येणार्‍या ग्रंथ दिंडीचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी रस्त्यावर सडा-सारवण करून दिंडीदर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती.

उद्घाटन सोहळा

विनोद च्यारी आणि साथी कलाकारांनी गायिलेल्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच अध्यक्ष- डॉ. अशोक आमशेकर आणि प्रमुख वक्ते प्रा. रमेश सप्रे, त्याचबरोबर सचिव संजित गावकर, सरपंचा सौ. विद्या सावंत, देवस्थान अध्यक्ष वामन गावकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गाडगीळ व सदानंद काणेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सौ. गौतमी गावस हिने मान्यवरांचा प्ररिचय करून देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विधिवत् समई प्रज्वलीत करून व ज्ञानोबा माऊलींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मराठी सांस्कृतिक महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.

स्वागताध्यक्ष श्री. आनंद मयेकर
स्वागताध्यक्षांनी मान्यवरांचे स्वागत करून गोवा मराठी अकादमीच्या ध्येय-धोरणांचे विस्तृत विवेचन केले. सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कारांचे जतन करणार्‍या कार्यक्रमांना प्राधान्य देताना एकही मराठी शाळा बंद होऊ नये म्हणून पालक प्रबोधनावर विशेष भर देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.

गोमंतकाचे सांस्कृतिक संचित मराठीतच ः डॉ. अशोक आमशेकर
महोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करताना, उद्घाटक मा. डॉ. आमशेकर यांनी, गोमंतकाचे वैभवशाली सांस्कृतिक संचित मराठी भाषेनेच जतन केल्याचे सांगितले व ती सांभाळण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असल्याचे सांगितले. आपण दहावीपर्यंत मराठीत शिकूनही डॉक्टर होताना आपल्याला खोणतीच अडचण आली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यासाठी मराठी शाळांचे योगदानही तेवढेच मोलाचे असते असे ते म्हणाले व ग्रंथ दिंडी हा डीजे-संस्कृतीला उत्तम पर्याय असल्याचे सांगितले.

संस्कृती जतन ग्रामीण परिसरानेच सांभाळले ः प्रा. रमेश सप्रे
महोत्सवाचे प्रमुख वक्ते प्रा. रमेश सप्रे यांनी- आपल्या भाषणात, एवढा सुसूत्र सुनियोजित आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने नटलेला पहिलाच कार्यक्रम पाहिल्याचे सांगून, संपूर्ण भारतीय वेषात देहभान विसरून तालावर नाचत विठ्ठलाचा जयघोष करणार्‍या दिंडीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मराठी भाषेबरोबरच पारंपरिक संस्कृती टिकविण्याचे बहुमोल कार्य ग्रामीण परिसरातील बहुजन समाजाने प्राणपणाने केले असून ती संस्कृती पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचे दायित्वही समर्थपणे सांभाळले आहे, हे ग्रंथदिंडीत नाचणार्‍या मुलांकडे पाहिल्यावर लक्षात येते, असे सांगितले.

नारीशक्ती व वीर जवानांचा गौरव

‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हा महामंत्र हृदयावर कोरून मातृभूमीच्या रक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सीमेवर उभे ठाकलेले वीर जवान आमच्यासाठी राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारगिल युद्धात विशेष मर्दुमकी गाजवलेले सत्तरी परिसरातील सर्वश्री रामनाथ गावडे, प्रेमनाथ गावकर, ज्ञानदेव साळसकर आणि चंद्रकांत पावशे या वीर जवानांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच विविध क्षेत्रातआपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या सत्तरी तालुक्यातील डॉ. शाहीन आम्रोसकर, कु. पंक्ती जोग आणि उज्ज्वला केरकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मराठी अकादमीतर्फे गौरव करण्यात आला.
डॉ. शाहीन आम्रोसकर यांनी सुवर्ण पदकासह आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून त्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निष्णात शल्यविशारद म्हणून कार्यरत आहेत. कु. पंक्ती जोग या माहिती हक्क कायदा, जमिनीची धूप, मीठ उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या यावर गुजरातमध्ये विशेष कार्य करीत आहेत. गुजरात आणि राजस्थानमधील शाळकरी मुलांना आदर्श नागरिक बनण्याचे विशेष शिक्षण देण्यात येत असून देशाची अस्मिता आणि अखंडता आबाधित राखण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून गोवा सरकारनेही त्या दृष्टीने त्वरित पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सौ. उज्ज्वला केरकर या संगीत विशारद असून त्या वाळपई येथील बाल भवनात गायन व पेटीवादनाचे धडे देत आहेत. या तिन्ही गौरव मूर्तींचे सुरुवातीचे शिक्षण मराठीत झालेले असून विशेष योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघी श्री. आनंद मयेकर यांच्या विद्यार्थिनीच आहेत.
परिसंवाद

‘भाषा व संस्कृति संवर्धनात मराठी शाळांचे महत्त्व’ या ज्वलंत विषयावर वकील श्री. भालचंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्ण परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये श्री. कृष्णा नारायण गावस आणि श्री. आनंद ज. मयेकर यांनी भाग घेतला.

पालक-शिक्षक समन्वयातून मुलांचा विकास ः कृष्णा गावस
श्री. कृष्णा गावस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात मुलांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असण्याची गरज असल्याचे स्वानुभवावरून सांगितले. मराठी भाषेच्या विकासासाठी मुलांना त्या भाषेतूनच व्यक्त होण्याची तसेच वाचन करण्याची गोडी लावण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.

देशाचे भवितव्य वर्गातच आकार घेते ः आनंद मयेकर
मातृभाषेतून शिकणार्‍या मुलांची आकलन तसेच स्मरणशक्तीचा विकास सहज होत जाऊन तो आनंदाने अभ्यासात रस घेतो. हे जगन्मान्य सत्य आपण जाणून बुजून दुर्लक्षित करीत असून इंग्रजीच्या फाजील हव्यासापोटी आपल्याच मुलांचे भावविश्‍व आणि भविष्य आम्हीच उध्वस्त करीत आहोत. निदान संस्कारक्षम वयाततरी मुलांना मराठीतून शिकून त्यांची नाळ माता आणि मातृभूमीशी जोडण्याचे काम ग्रहमंदिर, देवतामंदिर आणि विशेषतः विद्यामंदिर यांनी ठेवले तरच ते जबाबदार पालक आणि आचार्य होऊ शकतात, असे मयेकर म्हणाले. देशाचे भविष्य आपण वर्गात घडवत आहोत याचे भान ठेवून गुरुजींनी आपले आचार, विचार आणि उच्चार यांची काळजी घ्यावी, असेही ते पुढे म्हणाले.

सरकारने मातृभाषेतूनच संपूर्ण शिक्षण द्यावे ः भालचंद्र मयेकर
मातृभाषेतूनच शिक्षण या जागतिक सिद्धांतानुसार याच भाषेतून शिकता येणे हा मुलांचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे त्यांच्या डोक्यावर परकीय भाषा थोपण्याचा पालक वा सरकारलाही कोणताच अधिकार नाही. इंग्रजीपेक्षा समृद्ध अशा कितीतरी देशी भाषा असताना इंग्रजी भाषेची गुलामगिरी या देशाने का करावी, असे परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले.
दुपारच्या सहभोजनानंतर श्री. शाबलो गावकर यांनी मत्स्यगंधा या नाटकातील ‘चंडोल’ आणि श्री. विष्णु गावस यांनी ‘विपर्यास’ या नाटकातील भूमिका समर्थपणे सादर केल्या.

कविसंमेलन

आत्मस्वराचे प्रगटीकरण म्हणजे काव्य ः आनंद मयेकर
सवेष सादरीकरणानंतर सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवडीचा असा कविसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कविसंमेलनाचा शुभारंभ श्री. आनंद मयेकर यांनी आपल्या ‘भूल’ या रसिकप्रिय निसर्ग कवितेने केला. त्यानंतर सर्वश्री संदीप केळकर, शिवाजी देसाई, प्रकाश क्षण, भालचंद्र मयेकर, सौ. पौर्णिमा केरकर, सौ. सरोजिनी गावकर, सौ. गौतमी गावस, सौ. सविता शिरोडकर यांनी सादर केलेल्या सरस कवितांनी सभागृहातील भरगच्च रसिकवर्ग फार तृप्त झाला.
सांस्कृतिक कार्यक्रम

श्री. आनंद मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्री. रामकृष्ण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डे येथील महिला सहशक्तिकरण स्वयंसहाय्य गटाने सादर केलेल्या अतिशय सुंदर अशा घुमट आरतीने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर केरी-सत्तरी येथीलश्री साईबाबा कलामंचच्या महिलांनी ‘शिर्डी’चे साईबाबा या सं. नाटकातील नाट्यप्रवेश समर्थपणे सादर केला. यानंतर वांते-सत्तरी येथील श्री दुर्गा महिला मंडळातर्फे रामकृष्ण गावस दिग्दर्शित समई नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

श्री. विष्णु गावस आणि साथी कलाकारांनी कानेटकर लिखित ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील एक प्रवेश समर्थपणे सादर करून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. शेवटी ह.भ.प. विनोद च्यारीबुवा यांच्या ‘हरिपाल’ आख्यानावर सादर केलेल्या सुश्राव्य कीर्तनाचा रसिकांनी लाभ घेतला.

आनंद मयेकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर पसायदानाने महोत्सवाची सांगता झाली. सतत आठ दिवस-रात्री १२-१२.३० पर्यंत आनंद मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री रामकृष्ण गावस, कृष्णा गावकर, श्रीकांत गावकर, शशिकांत उसपकर, शिवनाथ गावस, विष्णु गावस, शाबलो गावकर, संजित गावकर, गौतमी गावस, शीला केसरकर, सुमिक्षा गावकर, सुवर्णा गावकर, सेजल ठाकूर, विनोद च्यारी, मंगेश गावकर, दशरथ गावस यांनी जिवापाड मेहनत केल्यानेच हा दिमाखदार महोत्सव संपन्न होऊ शकला. असा भरगच्च कार्यक्रम गेल्या ४०-५० वर्षांत या परिसरात झाला नाही, असे मत ग्रामस्थ अभिमानाने व्यक्त करताना दिसले.