योगसाधना- 677, अंतरंगयोग- 263
- डॉ. सीताकांत घाणेकर
आपला अधिकार फक्त कर्मावर आहे; फळावर नाही. फळ केव्हा द्यावे, किती द्यावे हे नियती ठरवते. कर्माचे परिणाम निरखून त्याप्रमाणे कर्म करावे. नियती कुणावरही, केव्हाही अन्याय करत नाही.
आध्यात्मिक तत्त्वज्ञानाप्रमाणे मानवी जन्म दुर्मीळ व अमूल्य आहे. शास्त्रकार सांगतात की शेवटी आपण आत्मा आहोत. आपल्या कर्माप्रमाणे व प्रारब्धानुसार एक विशिष्ट जन्म प्रत्येकाला मिळतो. कर्म व प्रारब्ध प्रत्येकाचे वेगवेगळे, त्यामुळे जन्मदेखील तसेच.
चौफेर नजर फिरवली व थोडा अभ्यास व चिंतन केले तर लक्षात येईल की प्रत्येकाच्या आयुष्यात तसेच प्रसंग येतील असे नाही. अनेकवेळा आपण बघतो की काहीजण थोडाच प्रयत्न करतात पण त्यांचे जीवन फार यशस्वी असते, तर इतर काहीजण पुष्कळ कष्ट घेतात, जीवनात त्रास भोगतात, पण त्यांना यश मिळत नाही. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे या अशा तफावतीला त्यांचे अनेक जन्मातील कर्म कारणीभूत. त्यामुळे प्रत्येकाने कर्मसिद्धांत व्यवस्थित समजून घ्यायला हवा.
आपली कर्मे विविध असतात- सत्कर्म व दुष्कर्म. प्रत्येक कर्माचे फळ हे ठरलेले. श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात त्याप्रमाणे आपला अधिकार फक्त कर्मावर आहे; फळावर नाही. फळ केव्हा द्यावे, किती द्यावे हे नियती ठरवते. म्हणून वयस्क व्यक्ती म्हणत असत- कर्म करण्यापूर्वी विचार करावा. कर्माचे परिणाम निरखून त्याप्रमाणे कर्म करावे. नियती कुणावरही, केव्हाही अन्याय करत नाही.
सत्कर्माचे फळ चांगलेच असणार. फक्त कुठल्या जन्मात मिळेल ते कुणालाही माहीत नसते. तत्त्ववेत्ते असेदेखील म्हणतात की, काही कर्मे या जन्मातच फळ देतात, तर थोडी कर्मे नंतरच्या जन्मात. उदाहरण घेतले तर हा मुद्दा चांगला समजेल. आपल्या गोव्याचे नारळ लगेच मिळत नाहीत. काही वर्षांनंतर मिळतात. ती झाडेदेखील उंच असतात. याउलट केरळातील नारळ लगेच म्हणजे थोड्याच वर्षांनी मिळतात. ती झाडेदेखील बुटकी असतात. जमिनीवर उभं राहून आपण नारळ काढू शकतो. गोव्यातील नारळाच्या झाडावर वर चढून जावे लागते. सारांश एवढाच की प्रत्येकाने होईल तेवढे सत्कर्म करावे. भारतीय तत्त्वज्ञान अशा कर्माला निस्वार्थ सेवा म्हणते. तसेच ते निरपेक्ष व निराकांक्ष असावे. भगवंतावर संपूर्ण श्रद्धा व नियतीवर विश्वास ठेवून समर्पित होऊन कर्म करीत राहावे.
अनेक सज्जन माणसे विविध तऱ्हेची सुख-दुःखे या जन्मात भोगतात. आपण सुखात असतो त्यावेळी आनंदात राहतो. पण दुःख आले की काहीजण लगेच निराश होतात. थोड्या व्यक्ती इतरांना दोष देतात. त्यामुळेच शास्त्रकार सांगतात की कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवून सत्कर्मे करीतच राहावे. इतरांकडे तुलना करू नये. कारण प्रत्येकाचे कर्म व प्रारब्ध वेगळे असते.
तत्त्ववेत्ते असेही सांगतात की केव्हा केव्हा भगवंत आपली परीक्षा बघतो. बहुतेकवेळा कुठलीही कठीण समस्या आली की आम्हाला प्रथम आठवतो तो परमेश्वर. बरोबरच आहे- ‘कर्ता करविता’ तोच आहे.
कलियुगात म्हणे सज्जनांना जास्त त्रास होईल. शास्त्रकारांनी यासाठी सोपा उपाय सांगितला आहे- तो म्हणजे नामजप. त्याचे एक साधे शास्त्र आहे. सुरुवातीला वाचेने अखंड नाम घ्यावे. मग ते मनाने अंतर्मनात येऊ लागते. सुरुवातीलाच मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे.
‘भगवंता, मी तुझा आहे. सर्वकाही तू करतोस. तू ठेवशील तसा मी राहीन’ असे मनाने समजून वाचेने नाम घ्यावे. त्यामुळे नाम घेता घेता देहाचा विसर पडेल, आणि मग मी कोण व देव कोण हे आपोआप कळेल.
एकाग्रतेकडे लक्ष न देता नामस्मरण करावे. अनन्यता येण्याचा उत्तम मार्ग नामच आहे. उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय. सत्कर्मावर विचार करता करता एक कथा आठवली-
एका गावात एक सावकार होता. त्याच्याकडे एक बोट होती. रंगारीला बोलावून त्याने त्या बोटीला रंग द्यायला सांगितले. रंग दिला की त्या पत्र्याला गंज चढत नाही. त्याप्रमाणे रंगारीने आपले काम केले. दुसऱ्या दिवशी तो आपले पैसे घेऊन गेला.
त्यानंतर सावकाराने तिसऱ्या दिवशी त्याला बोलावून एक भल्या मोठ्या रकमेचा चेक त्या रंगारीला दिला. त्याने म्हटले, ‘माझ्या कामाचे पैसे तुम्ही मला काल दिले आहेत.’
सावकार म्हणाला, ‘ते तुझ्या मजुरीचे पैसे होते. ही मोठी रक्कम वेगळ्या कामासाठी मी तुला देत आहे. ते काम तू न सांगता केले आहेस. त्या बोटीला एक मोठे छिद्र होते ते बुजवण्याचे.’
रंगारी अगदी सहज म्हणाला, ‘ते छिद्र दिसले म्हणून मी ते बुजवले. ते माझे कर्तव्यच होते.’
सावकार म्हणाला, ‘खरे म्हणजे मी तुला त्याबद्दल सांगायला विसरलो. नंतर मला कळले की माझी मुले बोट घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेली आहेत. मला त्यांच्यावर येणाऱ्या संकटाची जाणीव झाली. पण संध्याकाळी जेव्हा ती सुखरूप परत आली तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. मी जाऊन बघतो तर ते छिद्र बुजवलेले होते. ते काम तूच केले असशील हे मला जाणवले. खरे म्हणजे तू एवढे पुण्याचे काम केले आहेस की एक मोठी दुर्घटना टळली. तुझे कर्म अमूल्य आहे. पैशांनी त्याचे मोजमाप मी तरी करू शकत नाही. मी सांगितले असते व ते छिद्र तू बुजवले असते तर मी तुला विचारून योग्य मोबदला दिला असता. पण आता त्या कामाचे स्वरूपच बदलले. माझ्या कुटुंबावर तुझे उपकार सदा राहतील.’
ही गोष्ट साधी वाटते पण कर्माच्या संदर्भात आपण विचार करतो तेव्हा कळत-नकळत केलेले हे सत्कर्म आहे हे जाणवते.
या कथेत दिसणाऱ्या दोन्ही व्यक्ती मोठ्या वाटतात, कारण दोघांनी आपली कर्तव्ये केली- रंगाऱ्याने छिद्र बुजवून मुलांचे प्राण वाचवले व सावकाराने नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करून. अशा छोट्याशा कथांमधून पुष्कळ शिकायला मिळते.
- आपल्यातील प्रत्येकाला सत्कर्म करायला अशा विविध संधी वेळोवेळी मिळतात. त्या-त्या वेळी आपण ती सत्कर्मे करू शकतो. अशा काही सत्कर्मांचे मूल्यमापन धनाने होऊ शकत नाही, कारण मानवी जीवन अमूल्य आहे.
- कुठल्याही दुःखद घटना बघितल्या की त्या व्यक्तीला भेटून त्याचे अश्रू पुसावे, त्याला धीर द्यावा. आपल्या आसपास असे प्रसंग वेळोवेळी येतात- अपघात, नैसर्गिक आपत्ती, अकाली मृत्यू, असाध्य रोग वगैरे…
- सत्कर्म म्हणजे दान देऊनच केले पाहिजे असे नाही. शक्यतो अन्नदान करावे. विविध संस्था आहेत.
- सत्कर्म म्हणजे दुःखात असलेली व्यक्ती माणूसच असली पाहिजे असे नाही. इतर कृमीकिटक, प्राणी, पशू, पक्षी… कुणीही असू शकतात. अन्न देण्यास आपण समर्थ नसलो तर निदान त्यांच्यासाठी भांड्यात पाणी ठेवावे. उन्हाळ्यात पक्षी असे ठेवलेले पाणी पितात त्यावेळी एक आत्मिक समाधान मिळते. त्यांचे म्हणजे त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आम्हाला मिळतीलच.
- प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात अशा संधी मिळतच असतात. जास्तकरून सरकारी क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात… फक्त त्यामागे स्वार्थ असता कामा नये.
- पुढे जाऊन एक विचार येतो- झाडांना पाणी व खत देणे हेदेखील सत्कर्मच आहे.
आपण सर्व सत्कर्मे करू व प्रारब्ध घडवू.