सतत वर्तमानात रहा!

0
259
  • वैद्य सुविनय दामले

आंघोळ करताना आपण आंघोळीचा पूर्ण आनंद घेतो का ?
या निमित्ताने जरा वेगळेच चिंतन मनन.
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी काय मिळवले, काय गमावले, आणि पुढे काय करायचे आहे हे स्वतःशीच ताडून बघणे म्हणजे चिंतन !
हम कितने पानी मे डुबे है, इसका अंदाजा आ जाएगा !
त्यासाठी काय करायला हवे, याचे मनामधे आडाखे बांधणे म्हणजे मनन !
या दोन्ही प्रक्रिया कोणी करत असतील असे वाटत नाही. त्यासाठी सतत वर्तमानात रहायला शिकले पाहिजे.

आम्ही दररोज आहोत, त्या क्षणात न रहाता, भूतकाळात किंवा भविष्य काळात स्वतःला नेतो आणि वर्तमानाचा आनंद हरवून बसतो.
आता हेच बघा ना ..
दात घासत असताना आपले बोट दातावर फिरत असते, पण मन चहाच्या वासात रमलेले असते, दात घासतानाच्या येणार्‌या कुर्रकुर्र आवाजाची लय आम्ही कधी पकडलीच नाही.
चहा पिताना व्वा असं म्हणायलाच विसरतो, कारण तोपर्यंत वॉटसअपचे मेसेज येणे सुरू झालेले असते.

पोरांच्या अभ्यासाच्या चौकशीचं नाटक करताना दाढी उरकून घेतलेली असते. दाढी करताना देखील आपण स्वतःचे स्वतः नसतो.
तोपर्यंत नाश्त्याचा मेन्यू डोक्यात पिंगा घालायला लागलेला असतो. नाश्ता करायला बसलो तरी मन त्यात कुठे रमतंय. ते पळालेलं असतं आज ड्रेस कोणता घालायचा हे विचार करायला. ड्रेस घालत असताना त्या कपड्यांना येत असलेला कडक इस्त्रीचा वास आता कधी घेतलाय हे आठवतंच नसेल !
अगदी आंघोळ करताना सुध्दा, किती दिवसापूर्वी बाथरूम मधे गाणं गुणगुणले होते, हे जरा मनाला विचारून पहा.

आंघोळ करताना पाण्याच्या स्पर्शाचा, उटण्याच्या रंगाचा, त्याच्या गंधाचा, बालदीमधे तांब्या बुडवल्यानंतर येणार्‌या बुडबुड आवाजाचा आनंद गेल्या वर्षी किती वेळा घेतलाय ?
सतत पुढे पुढे जाणार्‌या या मनाला जरा आवर घालून वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.

हे खरं सुख आहे. यातच खरा आनंद आहे. बायकोला गजरा आणून किती दिवस होऊन गेलेत हो,
काही आठवतेय का ?
पण तिच्या मनात मात्र तिने मागील गजर्‌याच्या स्मृती अजूनही ताज्या ठेवलेल्या आहेत. जरी तिचं मन भूतकाळात गेलेलं असलं तरी.