- प्रा. रमेश सप्रे
जीवनाचे सर्व रंगढंग आणि नात्यातील मधुर भावबंध व्यक्त करण्याची सुवर्णसंधी म्हणजे दिवाळी. निसर्ग, उपयुक्त पशुधन, धन-लक्ष्मी यांचं जीवनातील स्थान, कृषिप्रधान भारतातील कृषिवलांचं योगदान, घरातील पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा नात्यांचं महत्त्व, अशा जीवनाच्या विविध अंगांचं दर्शन दिवाळीच्या माध्यमातून घडतं. या सहा दिवसांत उपभोग घेतलेल्या वस्तू, प्रत्यक्ष साजरा करताना येणारा आनंदाचा अनुभव, यातली प्रतीकात्मता आणि आध्यात्मिक महत्त्व या दृष्टिकोनातून दीपावलीवर सहचिंतन करूया. शुभचिंतन करूया.
सणांचा राजा- दीपावली. हे कानाला कसंतरीच वाटतं. ‘सणांची राणी- दीपावली’ हेही फार प्रभावी वाटत नाही… म्हणून म्हटलं- सणांची सम्राज्ञी- दीपावली!
दीपावली हा एकच सण नाही, तर निरनिराळ्या पैलूंचे सहा सण ओळीने साजरे केले जातात. ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ तसेच ‘सहा सणांचे सहा सोहळे’ हे दीपावलीचे योग्य वर्णन ठरेल. हे सहा सण म्हणजे वसुबारस (गोवत्सद्वादशी), धनतेरस (धनत्रयोदशी), नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (दिवाळीतला पाडवा) आणि भाऊबीज.
जीवनाचे सर्व रंगढंग आणि नात्यातील मधुर भावबंध व्यक्त करण्याची सुवर्णसंधी म्हणजे दिवाळी. निसर्ग, उपयुक्त पशुधन, धन-लक्ष्मी यांचं जीवनातील स्थान, कृषिप्रधान भारतातील कृषिवलांचं (शेतकऱ्यांचं) योगदान, घरातील पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा नात्यांचं महत्त्व, अशा जीवनाच्या विविध अंगांचं दर्शन दिवाळीच्या माध्यमातून घडतं. दीपावली साजरी करण्यामागची सांस्कृतिक पार्श्वभूमी अनेकांना माहीत नसते. पण या सहा दिवसांत उपभोग घेतलेल्या वस्तू, प्रत्यक्ष साजरा करताना येणारा आनंदाचा अनुभव, यातली प्रतीकात्मता आणि आध्यात्मिक महत्त्व या दृष्टिकोनातून दीपावलीवर सहचिंतन करूया. शुभचिंतन करूया.
आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या सहा दिवसांचा समुच्चय म्हणजे दिवाळी.
- वसुबारस ः याला ‘गोवत्सद्वादशी’ असंही म्हणतात. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या भारतात गोवंश म्हणजे गाय-वासरू-बैल हा जीवनाचा प्राण आहे. यांची हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे सवत्सधेतूची म्हणजे वासरासह गायीची पूजा. सायंकाळच्या संधिप्रकाशात सुवासिनी घरातील वत्सांसह (मुलांसह) पूजेचं तबक सजवून गाय-वासराची पूजा करतात. हल्ली शहरातल्या रस्त्यांवर मोकाट गुरं शेकडोंनी असली तरी सवत्सधेनू मिळणे नि त्यांची शांतभावाने पूजा करणे, त्यांना पक्वान्न भरवणे हे रस्त्यावर शक्य होत नाही. म्हणून काही चौकांत जागा असेल तिथे आपापली सवत्सधेनू घेऊन शेतकरी किंवा गवळी आलेले असतात. गवळी म्हटलं की गोकुळातला गोपाळकृष्ण आठवतो आणि गायवासरू म्हटलं की गीता नि अर्जुन डोळ्यासमोर उभे राहतात. ज्ञानोबा माउली म्हणूनच म्हणते-
‘वत्साचेनि मिषे। दुभते जाले घरोद्देशे॥’ म्हणजे अर्जुन वासरासाठी भगवान गोपालकृष्णानं वेदउपनिषदांच्या गायीचं गीता नावाचं अमृतमधुर दूध काढलं. त्याचा उपयोग गोमातेच्या वासरांना जसा झाला तसाच घरातील लहानथोर मंडळींनाही झाला. खरोखर, घरादारातील पाळीव प्राण्यांविषयी एवढी हृद्य कृतज्ञता व्यक्त करणारी दुसरी कोणतीही संस्कृती पृथ्वीच्या पाठीवर नाही. आणखी एक विशेष चिंतन करण्यासारखा आहे. आपल्या संस्कृतीचं नि जीवनशैलीचं प्रतिबिंब आपल्या सण-सोहळे-समारंभात छान रीतीनं प्रकट होतं. कृषिप्रधान जीवनपद्धती ही प्राचीन काळापासून गोकेंद्री- गोमाताकेंद्री होती. गोपालकृष्णानं तर गायी-वासरांचं नि गायीच्या दुधाचं नि त्यापासून तयार झालेल्या ताक, दही, लोणी, तूप यांसारख्या पदार्थांचं महत्त्व खूप वाढवलं.
संध्याकाळी आपल्या वासरांच्या ओढीनं गायी ज्यावेळी उधळत येतात त्यावेळी त्यांच्यासाठी खुरांनी (पायांनी) उडालेली धूळ- ‘गोधूली किंवा गोरज’ म्हणून आपण शुभकार्याच्या मुहूर्तासाठी पवित्र मानतो. या वात्सल्याचं दर्शन घडवणाऱ्या प्रसंगाची नाळ जोडून ठेवण्यासाठी ही गोवत्सद्वादशीची सायंकालीन पूजा! वात्सल्यभावना सर्व पशुपक्षात असते याची जाणीव ठेवणे हा संस्कार.
- धनत्रयोदशी ः ‘भीमरूपी’ या समर्थ रामदासरचित हनुमानस्तोत्राची फलश्रुती सुरू होते- ‘धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्रसमग्रही।’ याचा जिवंत प्रत्यय देणारी दीपावली. दुसरा दिवस धनपूजनाचा. धन म्हणजे पैसा नव्हे. धन्य बनवतं, धन्यतेची अनुभूती देतं ते सारं धन. म्हणूनच गोधन, पशुधन, सद्गुणधन, विद्याधन इ. खरं धन आहे. या धनाची प्रतीकात्मक पूजा धनत्रयोदशी. ही पूजाही सायंकालीनच.
या दिवसाचं आणखी महत्त्व म्हणजे देवांचे वैद्य धन्वंतरी यांची जयंती. समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ घेऊन प्रकटलेले धन्वंतरी. आरोग्य हेच अमृत. आरोग्यं धनसंपदा! इंग्रजीत ‘हेल्थ इज वेल्थ’ म्हणतात त्याचा अर्थ हाच. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हेल्थ या शब्दातलं क्रियापद आहे ‘हील्’, तसंच वेल्थमधलं ‘वील्.’ आज सर्वत्र हेल्थ अँड हॅपिनेस म्हणजे आरोग्य नि आनंद यासाठी ‘वेलनेस’ शब्दाचा बोलबाला आहे. वेलनेस औषधालयं (फार्मसी), वेलनेस व्यायामशाळा (जिम), वेलनेस योगसाधना मंडळ. खरं तर हाच संदेश आहे धनत्रयोदशीचा. सोन्याची नाणी, अलंकार यांची पूजा नव्हे तर पूर्ण (तना-मनाच्या) आरोग्यासाठी ‘धन’ ही कल्पना मनात ठेवली तर धनत्रयोदशीच्या पूजेत धणे (सुकी कोथिंबीर), गूळ इ. आरोग्यवर्धक पदार्थ का वापरतात हे कळेल. आजारी पडू नये म्हणून उत्तम आरोग्य राखण्यासाठी अमृतकुंभ हातात घेतलेला धन्वंतरी, तर आजारी पडल्यावर निसर्गात मिळणाऱ्या पदार्थांचा नि पद्धतींचा उपयोग किंवा प्रयोग करून रुग्णाला रोगमुक्त करणारे आश्विनीकुमार यांचंही स्मरण यानिमित्तानं करायला हरकत नाही. धन्वंतरीचं औषधालय आपल्या स्वयंपाकघरात नि परसबागेत असतं याचं स्मरण ठेवायला हवं. हळद, मिरे, धणे, लवंगा, सुंठ त्याचप्रमाणे कोरफड (ॲलोव्हेरा), आलं, गवती चहा (गंजन) इ. वनस्पतींमुळे रोगप्रतिकारक क्षमता (इम्युनिटी) राखायला, वाढवायला मदत होते हा संस्कार मनाबुद्धीवर करणे म्हणजे धनत्रयोदशी साजरी करणे.
- नरकचतुर्दशी ः नरकचतुर्दशी म्हणजे आपली (गोवा, कोकण भागातली) खरी दिवाळी. ‘या दिवसाचा नायक कोण?’ हा प्रश्न मुलांना विचारल्यावर कोरस उत्तर आलं, ‘नरकासुर!’ मग पुढचा प्रश्न, ‘मग या नरकासुर नायकाला जाळायचं कशाला?’ मग उत्तर येतं, ‘कारण तो खलनायक आहे.’ ‘मग दिवाळीचा नायक कोण?’ सगळी मुलं शांत. कारण दिवाळी हा कृष्णाचा सण आहे हे माहीतच नाही कोणाला. महाकाय नरकासुरांच्या स्पर्धेत कृष्ण नसून असल्यासारखा असतो. एक चांगली (?) गोष्ट म्हणजे नरकासुराला जाळल्यावर उरलेले अवशेष, राख स्पर्धेच्या ठिकाणीच टाकून नवीन नरक निर्माण करणाऱ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं दिली जात नाहीत.
भूमिपुत्र भौमासुर आपल्या कृतीमुळे नरकासुर बनला. ‘मृत्यू आला तर तो स्त्रीकडून येऊ दे’ अशा अर्थाचा वर मागून घेतलेल्या नरकासुरानं अत्याचारांचं थैमान घालताना सोळा हजार एकशे तरुणींना कारावासात डांबून ठेवलं होतं. द्वारकेहून सत्यभामेला बरोबर घेऊन कृष्ण रथातून निघाला. तो सारा हिंदुस्थान पश्चिम-पूर्व असा पार करून नरकासुराच्या राज्यात पोचला. सत्यभामेच्या साह्यानं त्यानं नरकासुरवध केला त्या दिवसाची पहाट म्हणजे दिवाळी- नरकचतुर्दशी!
नरकासुराच्या राजधानीचं नाव होतं प्राग्ज्योतिषपूर. इथं भारतभूमीला नव्या दिवसाच्या सूर्यकिरणांचा प्रथम स्पर्श होतो. म्हणून या दिवशी पहाटे उठून अंधारावर (पापावर) प्रकाशाचा (पुण्याचा) विजय मिळाल्याचा आनंद आपण साजरा करतो अभ्यंगस्नानानं! आजच्या युवापिढीला सुगंधी तेल-उटणं अंगाला लावून मर्दन (मसाज) करत कडाक्याच्या थंडीत कडकडीत गरम पाण्यानं आरामात स्नान करणं आवडत नाही. हा कन्सेप्टच (संकल्पना) त्यांना पटत नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या उत्सवांचं महत्त्वही कमी होऊ लागलंय.
तसं पाहिलं तर ब्यूटी-पार्लर (शृंगारगृह) मधील हर्बल पदार्थांतलेच पदार्थ हे सुगंधी उटणं, खसखस, हळद, दूध (साय) या पदार्थांतही असतात. पण हे पदार्थ स्वस्त असतात नि ब्रँडेड नसतात ही खरी अडचण आहे. असो. काळाचा महिमा, दुसरं काय?
खरी दिवाळी फुलते दारातच. रांगोळ्या, पणत्या, आकाशदिवे ही सारी आनंदाची प्रतीकं. फराळाचे पदार्थ हे केवळ रूचिपालट नसून एकत्र बसून गंमतगप्पा करत खाण्याचा आनंदानुभव घेण्यासाठी असतात. नवे कपडे, अत्तरं, अलंकार-आभूषणं हे सारे आनंद व्यक्त करण्याचं माध्यम. मोठ्यांना दिवाळी अंक, लहानांना फटाके (जे आता खूपच कमी झालेयत) हाही आनंददायी अनुभव. एकूण काय तर दिवाळी साजरी करणं म्हणजे ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे॥’ याची रम्य अनुभूती.
स्वर्ग आणि नरक खरं तर मनातच आहेत. आपण ठरवलं तर स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवू शकतो. सारं काही आपल्या हातात आहे. आपल्या आतच आहे.
- लक्ष्मीपूजन ः आश्विनी पौर्णिमा म्हणजे पूर्णप्रकाशित कोजागरी पौर्णिमा, तर आश्विनी अमावस्या म्हणजे लक्ष्मी पूजन. आपल्याला विधी माहीत असतो पण संस्कार माहीत नसतो. यामुळे प्रत्येक सणाचा-उत्सवाचा प्राणच आपण गमावून बसलो आहोत. आणि त्याचं कलेवर (प्रेत) मात्र सजवत बसलो आहोत. उत्सवाचा इव्हेंट ही खरंतर मोठी शोकांतिका आहे. हे आजच घडतंय असं नाही. काही दशकांपूर्वी रचलेल्या दिवाळीविषयीच्या आपल्या दीर्घ कवितेत कवी केशवसुत लक्ष्मीपूजनासंबंधी म्हणतात-
लक्ष्मीपूजन ते द्वितीय दिवशी रात्रौ जधी (जेव्हा) होतसे।
सोने आणि वह्या धनीजन तधी (तेव्हा) मांडून अर्चीतसे।
साध्याला विसरून लोक करिती भक्ती कसे साधनी।
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्रांत ते पाहुनी॥
यातला महत्त्वाचा विचार आता तर अधिकच महत्त्वाचा झालाय. मनुष्य जीवनाचं साध्य काय आहे? -आनंद, शांती, समाधान यांची प्राप्ती. सर्व काळातील, सर्व देशांतील माणसाला हेच हवं. त्यासाठी सगळी उठाठेव, सगळी धडपड जीवनभर सुरू असते. सर्व संस्कृतीमध्ये सण-उत्सव यांची योजना केलेली असते. यात ‘साध्य’ कोणतं हे निश्चित न समजल्यामुळे अयोग्य ‘साधनं’ वापरली जातात. केशवसुत म्हणतात- ‘साध्याला विसरून लोक करिती भक्ती कसे साधनी?’- धनत्रयोदशीचं साध्य आहे आरोग्यप्राप्ती. तसेच लक्ष्मीपूजनाचे साध्य आहे आनंदनिर्मिती. हे विसरून आपण सारे पूजा करतो ती सोनं-नाणं-पैसे यांचीच. आपल्याला किती पैसेवाले लोक कायम खऱ्या आनंदात असलेले दिसतात?
लक्ष्मीपूजनाविषयी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया. वैभवलक्ष्मीचं शुक्रवारचं साप्ताहिक व्रत सायंकाळी करतात. मार्गशीर्ष मासात हेच पूजन गुरुवारी पण सायंकाळी करतात. दिवाळीतलंही तसंच करतात. तेही अमावस्येला. इतकंच काय पण देवी लक्ष्मीचं वाहन आहे रात्रपक्षी (दिवाभीत) घुबड! यावर चिंतन करायला नको का? एरव्ही लक्ष्मी उभी किंवा बसलेली असते कमळात जे अलिप्ततेचं प्रतीक आहे. दोन्ही बाजूला सोंडेत पुष्पमाला धरून उभं असलेली गजांतलक्ष्मी आपलं धन फक्त आपलंच कधीही मानत नाही. देवांचा कोषाध्यक्ष कुबेरही साऱ्या संपत्तीचा विश्वस्त (ट्रस्टी) आहे. उपभोक्ता नाहीये.
आपणही लक्ष्मीपूजन करताना मिळणाऱ्या लक्ष्मीचा काहीतरी भाग समाजासाठी दिला पाहिजे. हल्लीच निधन झालेल्या रतन टाटांचं नि एकूणच ‘टाटासंस्कृतीचं’ हेच वैशिष्ट्य आहे. फायद्यातील जवळजवळ दोन तृतीयांश (सु. पासष्ट टक्के) भाग सर्व टाटा लोकोपयोगी संस्थांसाठी देतात. एवढं जरी नाही तरी सहजशक्य होईल तेवढा भाग तरी उदात्त कार्यासाठी दिला पाहिजे तरच लक्ष्मी प्रसन्न होईल. स्वार्थासाठी, स्वतःच्या उपभोगांसाठी वापरलेला पैसा मौजमजेसाठी ठीक असला तरी त्यातून टिकाऊ आनंद, मनःशांती मिळणार नाही. असो.
लक्ष्मीपूजनासाठी भाताच्या (साळीच्या) लाह्या नि चुरमुरे वापरतात, त्याचा संदेशही महत्त्वाचा आहे. भाजल्याशिवाय लाह्या, चिरमुरे तयार होत नाहीत, आणि हे पुन्हा पेरले तर उगवत नाहीत. म्हणजे कर्मभोगाची परंपरा चालू राहत नाही. श्रीरामरक्षेतला श्लोक आठवतो ना-
भर्जनं भवबीजानां, अर्जनं सुखसंपदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥
हाही एक लक्ष्मीपूजनाचा संदेश आहेच. यावेळी हा विचार नि त्यानुसार संकल्प नक्की करूया. - बलिप्रतिपदा (दिवाळीतला पाडवा) ः खरंतर हा दिवस शेतकरी (बळीराजा) आणि त्याचं पशुधन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. बळीराजाच्या उद्धाराची म्हणजेच भगवान विष्णूच्या वामन अवताराची कथा अनेक दृष्टींनी उद्बोधक आहे. सर्व कथाप्रसंग आपल्याला माहीत असतोच. फक्त एका गोष्टीबद्दल चिंतन करायचं. त्रिपाद भूमी म्हणजे तीन पावलांइतकी जमीन बटू वामनानं दान म्हणून मागितली. दान मिळाल्यावर विशालकाय रूप धारण करून पहिल्या दोन पावलांत वामनानं पंचमहाभूतं व्यापली. तिसरं ठेवण्यासाठी बळीनं मस्तक पुढे केलं नि ते स्वीकारून त्याच्यावर पाय ठेवून बळीला खाली दाबून पाताळाचं राज्य दिलं. चिरंजीव होण्याचं वरदान दिलं. बाकीच्या राज्याचं रक्षण करण्याचं काम विष्णू भगवानांनी स्वतःकडे किंवा सुदर्शनचक्राकडे घेतलं, याचा अर्थ आपलं डोकं म्हणजे केस-कवटी नव्हे, मेंदूही नव्हे तर मेंदूच्या शक्ती- बुद्धी, स्मृती, कल्पनाशक्ती, नवनिर्माण क्षमता हे सारं पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे. देह जरी चितेवर जळाला तरी मेंदूच्या शक्तींनी केलेलं कार्य जळणार नाही. यालाच समर्थ म्हणतात- ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे।’
या दिवशी शेतकऱ्यांच्या गायी-म्हशींची, बैलांची पूजा केली जाते. त्यांना स्वच्छ धुवून शिंगं, अंग यांची सजावट केली जाते. या परंपरेविषयी एक पारंपरिक लोकगीत आहे. त्याचा भावार्थ फार हृद्य आहे- ‘दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी। गाई म्हशी कोणाच्या? गाई म्हशी गवळ्याच्या। गाई म्हशी पळाल्या, कुणाला मिळाल्या?। दूध लोणी खाणार कसं? लोण्याचं तूप काढणार कसं? कृष्णानं वाजवली बासरी, गाईम्हशी आल्या घरी॥ दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी॥’
- या लोकगीतात गाई-म्हशी, गवळी, दूध-तूप, कृष्णाची बासरी सारं कसं घट्ट विणलंय! हेच तर आपल्या सणांचं वैशिष्ट्य आहे. अन् सणांची सम्राज्ञी आहे दीपावली!
या दिवसाला दिवाळीतला पाडवा म्हणजे नवीन वर्षाचा आरंभ समजतात. या वर्षाला विक्रमसंवत् म्हणजे राजा विक्रमादित्यानं सुरू केलेलं नूतन संवत्सर, जे या वर्षी विक्रम संवत् 2081 असेल. उत्तर भारतात हे नववर्ष दिवाळीतच साजरं केलं जातं. जसं आपण चैत्र शु. प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा करून नवा शालिवाहन शक सुरू करतो. तो सध्या शके 1946 असा आहे. आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवाळीतला पाडवा अर्धा मुहूर्त आहे. बाकीचे तीन मुहूर्त आहेत- गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा. दिवाळीतला पाडवा हा पतिपत्नीचं नातं दृढ करण्याचाही दिवस असतो. पतीला मंगल स्नान घालून ओवाळल्यावर पतीनं पत्नीला भेटवस्तू देणं, हा आचार या दिवशी पाळला जातो.
गुजराती किंवा व्यापारी मंडळी या दिवाळीतल्या पाडव्याला वर्षाची सुरुवात मानून हिशेबाच्या नव्या वह्या, आजकाल कॉम्प्युटरवर नव्या फाइल्स सुरू करतात. त्यांची पूजा करतात. त्या नव्या वहीत पहिली नोंद (एंट्री) खर्चाच्या बाजूला दानधर्म किंवा धर्मादाय अशी करतात. यात किती अर्थ भरलाय! अशी आहे आपली दिव्य संस्कृती.
शेतकरी, गवळी अशा भूमिपुत्रांचा स्वामी असलेल्या गोपालकृष्णानं याच दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली होती. पुढे गोकुळवासीयांच्या रक्षणासाठी हाच पर्वत सर्वांच्या साह्यानं उचलला होता. या दिवशी अनेक मंदिरांत भक्तांनी आणलेल्या विविध अन्नपदार्थांचं एकत्रीकरण केलं जातं. याला ‘अन्नकूट’ म्हणजेच अन्नाचा पर्वत म्हणजेच गोवर्धन म्हणतात. त्याची पूजा करून ते अन्न गरजूंना, भक्तांना दिले जाते. गोपाळकाल्यापेक्षा हा प्रकार वेगळा असला तरी अन्न एकत्र करून वाटून उपभोगायचं हा संदेश नि संस्कार एकच आहे.
- भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया) ः भाऊ-बहिणीतल्या पवित्र नि घट्ट विणीच्या नात्याचा हा सण. अलिकडच्या काळात फॅशनेबल झालेला रक्षाबंधन हा सर्व समाजाचा सण आहे. पण भाऊबीजेचं मूळ यमराजापर्यंत जातं. एकदा आपली बहीण यमुना हिला भेटायला म्हणून बंधू यम गेला. हा कौटुंबिक यम आपलासा वाटतो. भयंकर मृत्युदेवता यमासारखा नाही. बऱ्याच दिवसांनी अकस्मात आलेला भाऊ पाहून यमुनेनं यमाचं खूप प्रेमानं स्वागत केलं. गोडधोड खाऊ घातलं नि त्याला ओवाळलं. यमानं यमुनेला आशीर्वाद दिला. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा. तेव्हापासून सुरू झाली प्रेमळ परंपरा भाऊबीजेची. भावानं बहिणीकडे जायचं. बहिणीनं त्याचं स्वागत करून, स्नान-भोजन घालून ओवाळायचं नि भावानं बहिणीला ओवाळणी घालायची.
ज्या मुलीला भाऊ नसेल तिनं भावपूर्ण मनानं चंद्राला ओवाळायचं. म्हणून चंद्राला ‘मामा’ म्हणतात. दर महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला (बीजेला) चंद्रदर्शन म्हणून पंचांगात लिहिलेलं असतं.
…तर अशी ही सहा दिवसांची आनंदमयी, आनंददायी दीपावली! सर्व पैलूंच्या नात्यांना, ऋणानुबंधांना आनंदाच्या, चैतन्याच्या, प्रकाशाच्या कोंदणात बसवून मोठ्या दिमाखात साजरा करायचा सण. नव्हे, सणांची सम्राज्ञीच दीपावली!
प. गोंदवलेकर महाराज सुचवतात- ‘घरातली सर्व परिस्थिती, अडचणी, समस्या तशाच असल्या तरी आपण दिवाळी आनंदात साजरी करतोच ना? मग अशी दिवाळी वर्षभर- कायम- का नाही साजरी करत? परिस्थिती आपल्या हातात, नियंत्रणात कधीही नसते. पण मनःस्थिती मात्र नियंत्रणात असतेच असते. मग का करत नाही साजरी शाश्वत दिवाळी?’ अशा ‘शाश्वत दिवाळी’साठी मनोमन शुभकामना!