सज्ज हो! सिद्ध कर!!

0
193
  •  गिरिजा मुरगोडी

समाजावर पिढ्यान् पिढ्यांचा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा इतका दृढ आहे की अगदी साध्या गोष्टींपासून मोठ्या समस्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत पुरुषाला झुकतं माप अगदी नकळत मिळत असतं आणि स्त्रीच्या वाट्याला येत असतं अपेक्षांचं ओझं आणि उपेक्षांचे सल!

 

भारताच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारी २०२० ला संचलनात कॅप्टन तानिया शेरगिल यांनी पुरुष सैनिक तुकडीचे नेतृत्व केले. त्यांचा आत्मविश्‍वास आणि एकंदरीतच ते संचलन पाहता देशातील प्रत्येक युवती, प्रत्येक महिला आनंदाभिमानाने भारावून जावी असाच तो क्षण होता!

त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सशस्त्र दलातील लिंगाधारित भेदभाव संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले आणि तळप्रमुख पदासारख्या नेतृत्वासाठीचा स्त्रियांचा मार्ग मोकळा केला. ‘सामाजिक आणि मानसिक कारण देऊन सैन्यातील महिला अधिकार्‍यांना संधीपासून वंचित करणे हे फक्त भेदभावपूर्णच नव्हे तर अस्वीकाराहार्य आहे. केंद्र सरकारने आपला दृष्टिकोन आणि मानसिकता यात बदल केला पाहिजे.’ न्यायमूर्तींनी दिलेला हा निकाल म्हणजे स्त्रीच्या असीम क्षमतेला, कर्तृत्वाला दिलेली दाद आहे, दिलेला न्याय आहे. त्यामुळे आता सैन्यदलातील महिलाही कमांडिंग ऑफिसर होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

काही वर्षांपूर्वीच अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंग यांना पहिल्या महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळाला. सुपरसॉनिक फायटर जेट विमान उडवण्यास त्या सज्ज झाल्या. या सगळ्या अत्यंत बुद्धिमान, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आणि निडर अशा मुलींनी स्वतःची क्षमता आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर ही भरारी घेतली. या आणि इतर अनेक अत्युच्च पदांवर महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. ही तर गौरवाची गोष्ट आहेच, पण त्या प्रत्येक ठिकाणी तिला योग्य ते स्थान आणि योग्य तो मान मिळवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे झगडत राहावे लागते, स्वतःला सिद्ध करत राहावे लागते… घरातही, बाहेरही!

अत्यंत कठीण, खडतर असे प्रशिक्षण पुरुषांच्या बरोबरीने; कधीकधी अधिक सक्षमतेनेही पूर्ण करूनसुद्धा महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवताना तिला अग्रक्रम नसतोच. तिथे संघर्ष करावा लागतो. कमांडर होण्यासाठी पूर्ण पात्र असताना त्यांना हक्कासाठी न्यायालयात जावं लागतं. हवाई दलातील महिला वैमानिकांना आव्हानात्मक कामगिरीवर पाठवलं जाण्याची संधी मिळण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागते.

भारतातल्या पहिल्या ‘महिला एम.बी.ए. सरपंच’ तडफदारपणामुळे पस्तिशीतच देशातील तरुणाईच्या आयकॉन बनलेल्या छवी राणावत म्हणतात, ‘‘रस्त्यात खाचखळगे असल्याशिवाय त्यातून मार्ग काढण्यासाठीची प्रगल्भता कुठून येणार? तावून-सुलाखून निघालं नाही तर ते सोनं निखरेल कसं?’’ सोपं नसलेलं आयुष्य हेच आव्हान मानून वाटचाल करणार्‍या त्या व अशा अनेक तावून-सुलाखून निखरलेल्या सुवर्णकन्यका आपल्या देशात अनेक क्षेत्रांत कर्तृत्व गाजवताहेत. पण पावलोपावली स्वतःला सिद्ध करत राहाण्याचे आव्हान सतत त्यांच्यासमोर असते.

महाराष्ट्राच्या आयपीएस अधिकारी मीरा चढ्ढा बोरवणकर यांना त्यांच्या प्रशिक्षण काळात आलेला एक अनुभव पुरेसा बोलका आहे. त्यांनी रिव्हॉल्वर शूटिंगमध्ये चांगले गुण मिळवले तेव्हा एका सहकार्‍याने आक्षेप घेतला. ‘तिला चुकून गुण मिळाले असणार! मीराला पुन्हा एकदा बंदुकीतून गोळ्या झाडायला सांगा.’ १९८१ च्या तुकडीमध्ये त्या एकट्याच महिला होत्या. शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी बघणार्‍या, अत्यंत थकवणार्‍या त्या काळात अशा आक्षेपानं त्या खूप चिडल्या होत्या. मात्र त्यांचे प्रशिक्षकच स्पष्ट शब्दात म्हणाले, ‘‘साहेब, गेली नऊ वर्षं आम्ही बघतोय, महिला अधिकार्‍यांचे हात अधिक स्थिर असतात. त्या नेहमीच चांगली नेमबाजी करतात. शंका घ्यायचं काहीच कारण नाही.’’ तेव्हा सहकारी निमूट शांत बसला. आत्मविश्‍वास, परिश्रम, क्षमता यांची अशी सरशी होते तेव्हा अर्थातच अधिक हुरूप येतो. पण शंका घेण्याचे वा दुय्यम समजण्याचे अनुभव प्रत्येक क्षेत्रात महिलांना घ्यावे लागतात. म्हणजे आधी नवनवीन क्षितिजं काबीज करण्यासाठी सज्ज व्हायचं आणि नंतरही सतत स्वतःला सिद्ध करत राहायचं. याला पर्याय नसतो.

वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकदार कर्तृत्व गाजवणारी स्त्री असो वा सर्वसाधारण अर्थार्जनाची गरज म्हणून बाहेर पडणारी स्त्री असो, ग्रामीण कष्टकरी स्त्री असो वा आधुनिक नोकरदार स्त्री असो- सर्वच सामाजिक स्तरातील स्त्रीसमोर अनेक आव्हाने असतात. ती सर्व मांडणे तर शक्य नाही, पण मुख्यतः मध्यमवर्गीय आधुनिक स्त्री विचारात घेतली तरी काय चित्र दिसते?
गेल्या ३५-४० वर्षांत स्त्रियांच्या स्थितीत अनेक बदल झाले. शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष कमी झाला. आणि जिथे अर्थार्जन ही कुटुंबाची गरज होती तिथे थोडेफार सहकार्यही मिळू लागले.

त्यानंतरची पिढी म्हणजे आजची, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारी पिढी! या पिढीला स्वतःच्या विकासासाठी खूप दारं खुली झालेली आहेत आणि ही पिढी फार झपाट्यानं प्रगतीही करते आहे. पण म्हणून प्रश्‍न, समस्या, संघर्ष, आव्हानं संपली आहेत का? नाही. त्यांचं स्वरूप बदललंय.

आज स्त्रीच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होताना दिसतात. मुलीही विविध क्षेत्रांत उच्च शिक्षण घेत आहेत. मग या शिक्षित स्त्रीने तिच्या बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक, व्यावसायिक, व्यवस्थापकीय अशा सर्व कौशल्यांचा अन् क्षमतांचा उपयोग करणे हे ओघाने आलेच. तसा जर तो केला गेला नाही तर समाजाच्या ५० टक्के घटकांची ऊर्जा ही विनावापर राहिल्यासारखे होईल; आणि ते समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाच्या दृष्टीने अयोग्य आहे.

ही जरी वस्तुस्थिती असली तरी सामाजिक वातावरण तितकेसे निकोप नाही. त्यामुळेच आजही तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एक मोठी समस्या आहे ती सुरक्षिततेची. अनेक ठिकाणी, विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्या, कॉल सेंटर्स, मीडियामध्ये काम करणार्‍या मुलींना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. काही कंपन्यांमधून त्यांना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था असते. जिथे ती नसते तिथे या समस्येला सामोरे जावे लागते. अनुचित घटनाही घडतात.

तसेच सेमिनार्स, मिटिंग्ज, प्रोजेक्टसाठी ऑनसाईट जाणे अशा कारणांसाठी प्रवास करावा लागतो. हॉटेलमध्ये राहावे लागते. अशा वेळी आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्था सगळीकडे उपलब्ध असतील असे नाही.

याशिवाय नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहावे लागणार्‍या युवतींची संख्याही वाढत आहे. त्यांना राहण्याच्या जागेबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लेडिज हॉस्टेल्सची कमतरता आहे. इतरत्र सोयी अपुर्‍या असतात. या समस्यांवर तोडगे ती काढतच असते. पण एकूण तिच्या कर्तृत्वाकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन, समाजाची मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न हेही तिच्यासमोरचे आव्हानच. तिचं नोकरी करणं तर मान्य झालं आहे, मात्र व्यावसायिक आव्हानांना ती जास्त महत्त्व देऊ लागली तर त्याबाबत समाज तितकासा सहिष्णू नसतो.

अनेक क्षेत्रांत त्या उच्चपदस्थ अधिकारी आहेत. पण त्यांचं उच्चपदी असणं पुरुष अधिकार्‍यांना स्वीकारणं जड जातं. एवढंच नव्हे तर स्त्रियांनाही ते फारसं आवडत नाही. त्याचप्रमाणे तिला जेव्हा व्यावसायिक गरजेनुसार अधिक बाहेर राहावे लागते, तेव्हा काही अपवाद वगळता घरातूनही फारसा पाठिंबा मिळत नाही. अशावेळी तिचा दोन्हीकडून कोंडमारा होतो. आणि या तणावातून कधी व्यवसायातल्या संधीना मुकावे लागते, तर कधी कुटुंबातल्या काही विशेष गोष्टींना, तर कधी नात्यांनासुद्धा!

समाजावर पिढ्यान् पिढ्यांचा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा इतका दृढ आहे की अगदी साध्या गोष्टींपासून मोठ्या समस्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत पुरुषाला झुकतं माप अगदी नकळत मिळत असतं आणि स्त्रीच्या वाट्याला येत असतं अपेक्षांचं ओझं आणि उपेक्षांचे सल!
या सर्वांपेक्षाही अधिक अवघड असं जे सर्वात मोठं आव्हान आजच्या नोकरदार स्त्रीसमोर आहे, ते म्हणजे मातृत्व निभावणे…!
घरातल्या अनेक जबाबदार्‍या मिळून उचलण्याबाबत स्त्री व पुरुष दोघेही आता बर्‍यापैकी सजग झालेले असले तरी मुलांसाठी आईने अधिक वेळ देणे हे अनेक कारणांमुळे आवश्यक ठरते. याबाबत समाजाने तिला अधिक समजून घेणे आवश्यक आहे.
बाळंतपणाची रजा १ वर्षाची करणे, मूल तान्हे असताना ज्या क्षेत्रांमध्ये शक्य असेल तिथे कामाच्या वेळांमध्ये लवचीकता ठेवणे, काही महिने घरून काम करण्याची सोय उपलब्ध करून देणे आणि सोयीच्या ठिकाणी दर्जेदार पाळणाघर उपलब्ध असणे या काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेतच. ही काळाची गरज आहे.

अजूनही आपल्याकडे प्रशिक्षित कर्मचारीवर्ग असलेल्या दर्जेदार पाळणाघरांची कमतरता आहे. सध्या तरी याबाबत स्वतःची सपोर्ट सिस्टिम असणे ही तिची गरज आहे. नातेवाईक, शेजारी, मैत्रिणी यांच्यावर वेळप्रसंग निभावण्यासाठी ती अवलंबून असते. आणि स्वतःच्या धकाधकीच्या जीवनक्रमात वेळेचं योग्य नियोजन आणि विभाजन करून हे सगळं सांभाळण्याचे आव्हान ती पेलत आहे.
आयुष्याची सुरुवातीची वर्षे जशी बाळासाठी महत्त्वाची असतात तशीच ती पालकांच्या करिअरमधली महत्त्वाची वर्षे असतात. खरे तर आजच्या आत्यंतिक स्पर्धेच्या गतिमान जगात मुलांना योग्य प्रकारे वाढवणे, त्यांच्या आयुष्याचे तारू भरकटू न देता योग्य दिशेने वळवणे ही कठीण जबाबदारी स्त्रीला पार पाडायची असते. तिची होणारी शारीरिक आणि मानसिक दमछाक आणि तिचे विविध तणाव यांचा कुटुंबातल्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे, सहकार्य केले पाहिजे.
सध्याचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. अनेक बदल होत आहेत, होत राहणार आहेत. ज्या दिवशी आपला विकसनशील देश, समाज, अनेक व्यक्ती स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून न पाहता माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून पाहू शकेल तो खरा नवा सूर्योदयच असेल. अशा प्रगल्भ आणि निकोप समाजाचं भाग्य आपल्याला लाभेल का?
पण एक मात्र अगदी निश्‍चित आहे की, कितीही अडचणी आल्या, समस्या असल्या, आव्हानं पेलावी लागली तरी आजची स्त्री त्यातून मार्ग काढत पुढे जात राहाणार आहे. कारण तिनं आपला गाभा सतत तेवत ठेवला आहे आणि अनादिकालापासून, एकेका पावलापुरता का होईना प्रकाश ती निर्माण करत राहिली आहे. ती जाणते की एक पाऊल पुढे टाकलं की पाठोपाठ दुसरं उचललं जाणारच आहे. आणि समोरच्या वाटा उजळत जाणार आहेत. पूर्वीपासूनच ती स्वतःला बजावत आली आहे,
आता उजाडेल, आता उजाडेल
म्हणत अंधाराला कवटाळू नकोस
आत उजाडेल, आत उजाडतेच
या विश्‍वासावर विसंबून पाऊल उचल!