सज्जनाचे चार पैलू ः स्नेह, सन्मान, सहयोग आणि समज

0
19

योगसाधना- 601, अंतरंगयोग- 186

  • डॉ. सीताकांत घाणेकर

गाडीलादेखील चार टायर आहेत. त्यात सर्वात व्यवस्थित हवा भरलेली हवी, नाहीतर ती गाडी नीट चालणार नाही. टेबल व गाडी यांच्या संदर्भात आपण कटाक्षाने लक्ष ठेवतो, ज्यामुळे आपले काम सोपे होईल व प्रवास चांगला होईल. हीच अपेक्षा जीवनाच्या बाबतीतदेखील आहे.

विश्वात करोडो व्यक्ती आहेत. त्यात पुष्कळ विविधता आहे- राष्ट्र, वंश, रंग, वर्ण, धर्म, शिक्षण, आर्थिक स्थिती, संस्कार, विचार, व्यवहार वगैरे. पण यामध्ये एक विधिलिखित सत्य आहे जे नाकारता येत नाही किंवा टाळता येणे शक्य नाही- ते म्हणजे- ‘जो जन्मला आहे तो एक दिवस मृत्यू पावेल!’
जन्म ते मृत्यू यांच्या मध्ये मानवी जीवन आहे- किती वेळ, काळ, वर्षे… कुणालाही माहीत नाही. या सर्वात एक गोष्ट, एक विचार निश्चित आहे, त्याबद्दल दुमत नाही- प्रत्येकाला आपले सारे जीवन सुखी, आनंदी, समाधानी असावे असेच वाटते. यात वावगे काही नाही. ही तर प्रत्येक जीवाची साधारण अपेक्षा आहे. मानवच काय पण प्रत्येक जीवजंतू, कृमी-किटक, प्राणी, पशू, पक्षी याच इच्छेने जगतो, कार्य करतो, श्रम घेतो.
शास्त्रकार सांगतात की असे जीवन असण्यासाठी चार मुख्य पाय आहेत- ‘स्नेह’, ‘सन्मान’, ‘सहयोग’ आणि ‘समज.’ जसे खुर्ची-टेबलाला चार पाय आहेत. ते सर्व समान असायला हवेत तरच ते टेबल व्यवस्थित उभे राहील. आम्हाला उपयोगी पडेल. तसेच गाडीलादेखील चार टायर आहेत. त्यात सर्वात व्यवस्थित हवा भरलेली हवी, नाहीतर ती गाडी नीट चालणार नाही. टेबल व गाडी यांच्या संदर्भात आपण कटाक्षाने लक्ष ठेवतो, ज्यामुळे आपले काम सोपे होईल व प्रवास चांगला होईल. हीच अपेक्षा जीवनाच्या बाबतीतदेखील आहे.
मानवी जीवनाला विविध पैलू आहेत- व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक… हेदेखील हवेतच. मुख्य म्हणजे आरोग्य ठीक हवे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चार पाय महत्त्वाचे आहेत.

  1. स्नेह ः आधी स्वतःकडे स्नेह म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक, बौद्धिक… आणि मुख्य म्हणजे आत्मिक पाहिजे. योगशास्त्रामधील हे चार महत्त्वाचे कोश आहेत (पंचकोशातील). बहुतेक वेळा आपण शरीराकडेच जास्त लक्ष देतो. त्यामुळे मानवी जीवनात पंगुता, अपूर्णता येण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर मानव कुटुंबात राहतो. त्यात अनेक सदस्य असतात. जवळचे तसेच दूरचे… काका, मामा, काकी, मामी, मावसा, मावशी… वगैरे. तद्नंतर आप्तेष्ट. असा हा फार मोठा परिवार आहे. मुख्य मुद्दा म्हणजे, या सर्वांमध्ये अपेक्षित स्नेह आहे का? स्नेह म्हणजे परस्पर मैत्री. बहुतेक वेळा अनेक कारणांमुळे हा स्नेह व्यवस्थित नसतो. विविध गैरसमज असतात. संबंध बिघडतात.
  2. सन्मान ः प्रत्येक क्षणी विविध व्यक्तींचा संबंध आपल्याकडे येतो. त्यातील प्रत्येकाचा आपण सन्मान करतो का? उत्तर- ‘नाही’ असेच येणार. आम्ही दुसऱ्या व्यक्तीचे शिक्षण, पद, प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती याकडे जास्त लक्ष देतो. पूर्वीच्या काळी वय, अनुभव… बघत असत. आताच्या जगात या गोष्टी दुय्यम झालेल्या आहेत. खरे म्हणजे अध्यात्मशास्त्र शिकवते की प्रत्येक व्यक्तीत एकच दैवीशक्ती आत्म्याच्या रूपात वास करते. त्यात कसलाही भेदभाव नाही.

हे लक्षात हरक्षणी राहावे म्हणून भारतीय संस्कृतीत काही पद्धती होत्या. आता थोड्या-थोड्या कमी होताहेत. नष्ट होताहेत. अपवाद अवश्य आहेत. उदा. प्रथम भेट झाली की ‘नमस्ते’ म्हणावे, मग ती व्यक्ती कुणीही असो. घरी येतो त्याला अतिथी मानायचे- ‘अतिथी देवो भव!’ काही ठिकाणी ‘राम राम’, ‘जय रामजी की’ म्हणतात. हल्ली ‘गूड मॉर्निंग’ म्हणतात. यात वाईट काही नाही. कुठेतरी आदरभाव आहे. पण मूळ आध्यात्मिक भाव नष्ट होतोय.

  1. सहयोग ः कुठलेही छोटे-मोठे कार्य करण्यासाठी प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता भासतेच. मग तो स्वतःचा संसार असो, पेशा असो, धंदा असो, प्रवास असो… जीवनाच्या प्रत्येक क्षणी ही गरज भासते. कार्य व्यवस्थित होण्यासाठी प्रत्येक घटकाचा योग्य सहयोग गरजेचा आहे. सहकार्य असले की मग कसलेही, कितीही कठीण कार्य अगदी सहज होते. तसेच अशी वृत्ती ठेवली की कसलेही छोटे-मोठे काम करायला प्रत्येकाला मजा येते, आनंद होतो. त्यामुळे प्रत्येकाने ही सहयोगाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
    भारतात कुठलेही सत्कार्य, कार्यक्रम, समारंभ सुरू होण्याच्या आधी नमस्कार मुद्रा करून भगवंताकडे लक्ष ठेवून एक प्रार्थना म्हणायची पद्धत आहे.
    ॐ सहनावतु। सहनौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै
    तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै॥
    ॐ शांन्तिः शांन्तिः शान्तिः
    ही प्रार्थना सामवेदातली आहे. म्हणजे ही परंपरा हजारो वर्षे चालू आहे.
    येथे एक मुख्य गोष्ट नमूद करावीशी वाटते. आपण प्रार्थना अनेकवेळा कर्मकांड म्हणून करतो. अनेकांना प्रार्थनेचा साधा शब्दार्थदेखील माहीत नसतो; मग गभितार्थ, भावार्थ, आध्यात्मिक अर्थ सोडाच!
    या अर्थपूर्ण प्रार्थनेचा शब्दार्थ बघू-
    ब्रह्म (देव), आमचे दोघांचे रक्षण करा. आम्हा दोघांचे बरोबर भरण-पोषण करा. आम्हा दोघांना एकसाथ शक्ती प्राप्त होऊ दे. आम्ही परस्पर द्वेषभाव न राखणारे होवो. विविध तापांची शांती होवो.
    ही प्रार्थना बालपणात ऋषींच्या आश्रमात शिकवली जात होती. येथे दोघे म्हणजे दोन व्यक्ती नाही तर दोन गट- गुरू व शिष्य. हा भावार्थ समजायला हवा. या प्रार्थनेला विविध पैलू आहेत. अ) भगवंताकडे मागणी ः रक्षण, भरण-पोषण… कारण शेवटी यासंदर्भात मानव तेवढा समर्थ नाही. आश्रमात विविध शत्रूंपासून रक्षणाची आवश्यकता असते- बाह्य तसेच आंतरिक. ब) कसल्याही कार्यासाठी आवश्यक असलेल्या मुख्य गोष्टी म्हणजे शक्ती व विद्या. भारतीय संस्कृतीमध्ये ही मागणी दुर्गा व सरस्वती या देवींकडे केली जाते. क) मानवामध्ये नकारात्मक विचार येण्याची शक्यता फार असते. मुख्य म्हणजे थोडा सहवास घडला की विविध षड्रिपू वाढण्याची शक्यता असते. त्यातील एक भाव म्हणजे द्वेष. ही प्रार्थनादेखील आपण देवाकडेच करतो. कारण त्यामुळे प्रत्येकाला त्याची जाणीव होते की हा भाव वाळू देऊ नये. त्यामुळे व्यक्ती, संस्था, समाज यांचा नाश होऊ शकतो. ड) विश्वात मानवी जीवनात विविध तऱ्हेचे ताप आहेत. त्यांपासूनदेखील शांती हवी.
    या प्रार्थनेत भगवंताबद्दल कृतज्ञता व परस्पर सहयोग अपेक्षित आहे.
  2. समज ः मानवाला जीवनाच्या प्रत्येक घटनेबद्दल समज हवी. त्यासाठी उच्च विचार आवश्यक आहेत. कुटुंबात, समाजात वावरताना समज नसली तर दुसऱ्या व्यक्तीबद्दल गैरसमज वाढण्याची शक्यता फार आहे. त्यामुळे दुरी येते. विविध समस्या उद्भवतात.
    आजच्या कलियुगात प्रत्येक ठिकाणी- कुटुंब- समाज- अनेकांचा स्वार्थ वाढला आहे. त्यामुळे मानव आत्मकेंद्री झाला आहे. सहनशक्ती कमी झाली आहे. संघर्ष वाढताहेत. या सर्वांमुळे संतुष्टतेचा अभाव दिसतो. मग समाधान-सुखशांती कशी असणार?
    यासाठी एक उत्तम सोपा उपाय म्हणजे भौतिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञान मिळवणे. आपल्या भारतात तर या ज्ञानाचा साठा भरपूर आहे. अनेक शास्त्रे, ग्रंथ आहेत. विविध संस्था या विषयावर उत्कृष्ट कार्य करतात.
    सारांश एकच- प्रत्येक सज्जनाने या चार पैलूंचा- स्नेह, सन्मान, सहयोग, समज- सखोल अभ्यास केला तर स्वार्थ, संताप कमी होईल. सहनशक्ती वाढेल. संघर्ष टळतील. सुख- समाधान- संतुष्टता वाढेल.
    प्रत्येक प्राण्याचे हेच तर जीवनाचे ध्येय आहे. सर्वजण विशेषतः प्रामाणिक, अभ्यासू, योगसाधक शास्त्रशुद्ध साधना करून या ध्येयाकडे अवश्य वाटचाल करतील.