सच्चा समाजसेवक

0
13

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्‌‍ हा गीतोपदेश आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अंगिकारून निरंतर, निरलस, निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श समाजापुढे उभा करणारे रामकृष्णबाब नायक काल आपल्यातून निघून गेले. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील एक सतत तेवता नंदादीप निमाला. समाजसेवक ही उपाधी सवंगपणे वापरली जाण्याच्या आजच्या जमान्यात खराखुरा समाजसेवक कसा असायला हवा ह्याचा मूर्तिमंत दाखला म्हणजे रामकृष्णबाब. त्यांचे वडील केशव अनंत नायक यांना गोव्याचे धोंडो केशव कर्वे म्हटले जावे एवढी त्यांची योग्यता होती. गोव्यातील पहिलीवहिली कन्याशाळा त्यांनी संपूर्णतः पदरमोड करून उभी केली होती. ज्या काळात स्त्रीशिक्षणाचा उच्चारही करायला लोक धजावत नसत अशा काळात त्यांनी मुलींना शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला होता. व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेसाठी त्यांना ते स्वतः कारवारला घेऊन जात असत. अशा समाजसेवक पित्याच्या हाताखाली तयार झालेल्या रामकृष्णबाबनी तो वसा त्याच समर्पित भावनेने आणि त्याच निष्ठेने पुढे चालवला. केशव अनंत नायक यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लक्ष्मणराव सरदेसायांनी त्यांच्यावर स्त्री मासिकात लेख लिहिला, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर लेख छापला जाता कामा नये अशी सक्त ताकीद केशवबाबनी मुलाला दिली आणि संस्थात्मक कार्य कसे असावे त्यावर एक विस्तृत पत्रही त्यांना लिहिले. वडिलांनी लिहिलेल्या ह्या पत्राला आपल्या जीवनाचे संविधान मानून रामकृष्णबाब तहहयात त्या वाटेवरून चालले. आपल्याजवळून ते पत्र पुढे हरवले, परंतु वडिलांनी केलेल्या त्या मार्गदर्शनाचे आपल्याला कधीच विस्मरण झाले नाही असे एकदा त्यांनीच आम्हाला ओलावल्या डोळ्यांनी सांगितले होते. आपल्याला जमला तसा आपण आपल्या वृत्तीत बदल करीत गेलो म्हणून थोडेफार सामाजिक काम करू शकलो असे ते सांगत असत. सामाजिक कार्य करणाऱ्याने कधीही यशाचे श्रेय स्वतःकडे घेऊ नये. तसे ते घेतले तर इतर सहकाऱ्यांच्या मनात नकळत अढी निर्माण होते हे वडिलांच्या पत्रातले एक महत्त्वाचे सूत्र होते. रामकृष्णबाबनी ते तंतोतंत पाळले म्हणूनच धि गोवा हिंदू असोसिएशन आणि तिच्या कलाविभागाचा मोगऱ्याचा वेल विस्तारत गेला. त्याचा सुगंध सर्वत्र सतत दरवळत राहिला. मराठी रंगभूमीला ह्या कलाविभागाने दिलेली देणगी मौलिक स्वरूपाची आहे आणि त्यातले रामकृष्णबाब यांचे योगदान तर निव्वळ अमूल्य आहे. वसंतराव कानेटकरांच्या 666 प्रयोग झालेल्या रायगडाला जेव्हा जाग येते पासून वि. वा. शिरवाडकरांच्या 760 प्रयोग झालेल्या नटसम्राटपर्यंत आणि मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या संगीत मत्स्यगंधापासून जयवंत दळवींच्या बॅरिस्टरपर्यंत ह्या कलाविभागाच्या एकेका निर्मितीला भव्य दिव्य यशाप्रत नेण्यासाठी त्या जरतारी पडद्यामागे कुठे तरी अंधारात रामकृष्ण नायक उभे होते. ते व्यवसायाने चार्टर्ड अकौन्टंट. त्यांना ह्या लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची खरे तर काय गरज होती? इतर सीएंप्रमाणे त्यांनाही भक्कम आर्थिक स्थैर्य सहज उपभोगता आले असते. परंतु समाजाला आपली गरज आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ह्या प्रामाणिक भावनेतून ते सतत समाजाचे ऋण फेडत राहिले. संस्थेचे सद्भाग्य म्हणून त्यांना त्यांच्यासारखेच कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व असलेले सामाजिक बांधिलकी मानणारे सच्छील सहकारी लाभत गेले. चौफेर सामाजिक कार्याचा आदर्श ह्या संस्थेने उभा केला. बांदोड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहमंदिर उभे राहिले, कुसुमाग्रजांपासून पुलंपर्यंत साऱ्यांच्या कौतुकास पात्र झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात संस्थेच्या जबाबदारीतून मुक्त होऊन रामकृष्णबाब ह्याच स्नेहमंदिरमध्ये वास्तव्यास आले. आपला आशीर्वाद संस्थेला देत राहिले. आपण केलेल्या कार्याचा कुठेही बडेजाव नाही, कुठेही श्रेयासाठी धडपड नाही. पदाचा, प्रसिद्धीचा सोस नाही. एकेकाळी ह्याच माणसाने नॅशनल काँग्रेस, गोवाच्या झेंड्याखाली जुलमी पोर्तुगिजांना पिटाळून लावण्यासाठी पेट्रोल बॉम्ब बनवले होते हे कोणाला खरे वाटणार नाही. आपले निर्व्याज हास्य घेऊन रामकृष्णबाब नायक नावाचा हा स्नेहार्द नंदादीप शांतपणे त्या स्नेहमंदिराच्या उतरणीवर तेवत राहिला. डॉ. घनश्याम बोरकर यांनी आपल्या एका कवितेत रामकृष्णबाबविषयी लिहिले होते की जीवनाच्या गंगेत त्यांनी आयुष्यभर दीपदान केले. खरोखरच त्यांनी गंगार्पण केलेले हे दिवे आज भोवतालच्या अंधारात सतत आशेची ज्योत जागवत टिमटिमत राहिले आहेत आणि त्यांच्या स्मृतींच्या रूपाने यापुढेही दीर्घकाळ राहतील.