गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सर्वसामान्यांच्या दारी शिक्षणाची गंगा देण्याचे ऐतिहासिक कार्य केले, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पर्वरीतील सचिवालय संकुलातील स्व. बांदोडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी काढले. स्व. बांदोडकर यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे श्री. पर्रीकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
भाऊसाहेब हे गोव्याचे भाग्यविधाते होते व त्यांनी गोव्याच्या सामाजिक, आर्थिक विकासाचा पाया रचला असे श्री. पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात गोव्याने केलेल्या प्रगतीचा पाया बांदोडकरांच्या काळी रचला गेला होता असे ते म्हणाले.
सभापती राजेंद्र आर्लेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, जलसंसाधनमंत्री दयानंद मांद्रेकर, सहकारमंत्री दीपक ढवळीकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, वनमंत्री एलिना साल्ढाणा, मत्स्याद्योगमंत्री आवेर्तान फुर्तादो, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, एनआरआय आयुक्त विल्फ्रेड मिस्किता आणि विविध आमदारांची यावेळी उपस्थिती होती. स्व. बांदोडकर यांच्या कन्या व गोव्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले. डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले.