सचिवालयातील 2 अधिकारी रडारवर

0
13

>> नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली

>> पूजा नाईकच्या जबानीतून ‘त्या’ दोघांची नावे आली समोर

>> पूजाच्या स्मार्टफोनमध्येही आढळले त्यांचे मोबाईल क्रमांक

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कडक कारवाईचा इशारा

सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईकच्या टोळीमध्ये मोठे अधिकारी देखील सामील असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले असून, सचिवालयातील दोन सरकारी अधिकाऱ्यांवरही संशय असल्याचे काल दक्षता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पूजा नाईक हिच्या स्मार्टफोनमध्ये सचिवालयातील दोघा अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आढळून आले असून, त्या दोघांच्या मदतीनेच यापूर्वी आपण दोघा व्यक्तींना सरकारी नोकरी दिली असल्याचे पूजाने पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले आहे. त्यामुळे सचिवालयातील ‘ते’ दोघे अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकरणी अटक केलेल्या नऊ जणांपैकी दोघे जण हे सरकारी कर्मचारी आहेत, असे सांगून सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत उघडकीस आलेले प्रकार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुठलाही अधिकारी, राजकीय नेता तसेच इतर कोणीही भ्रष्टाचार करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

पूजा नाईककडे आलिशान गाड्यांचा ताफा
सरकारी नोकरी देण्यासाठी लोकांकडून लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या पूजा नाईक या महिलेकडे आलिशान गाड्यांचा ताफाही मोठा आहे. त्यात ‘ऑडी’ कार आणि फॉर्च्युनर एसयूव्हीचाही समावेश आहे. तिच्याकडे एकूण पाच महागड्या गाड्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

4 सदनिका अन्‌‍ 8-10 विदेश दौरे
लुटलेल्या पैशांतून पूजा नाईकने एखाद्या कोट्याधीशाप्रमाणे आठ ते दहा विदेश दौरेही केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. तसेच तिच्याकडे अफाट संपत्ती असल्याचे आढळून आले असून, तिच्या चार सदनिका आहेत.

कडक कारवाई करणार
दोन सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपण काही जणांना नोकरी दिल्याचे पूजा नाईकने मान्य केले आहे. त्यामुळे गुन्ह्यात सहभागी असलेल्या ‘त्या’ दोन सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जनता दरबारात भेटायला आली; अन्‌‍…
चार महिन्यांपूर्वी आपणाला पूजा नाईक हिच्या कारनाम्यांविषयी कुणकुण लागली होती. ती साखळी येथील जनता दरबारच्या वेळी आपणाला भेटायला आली होती, तेव्हा तिने काहीतरी खासगी बोलायचे आहे असे आपणाला सांगितले होते. त्याचवेळी आपणाला तिच्याविषयी संशय आला होता आणि आपण महिला पोलिसांना बोलवून तिला डिचोली पोलिसांकडे सोपवले होते. त्यावेळी तिने तिघांकडून सरकारी नोकरी देते, असे सांगून पैसे घेतले होते असे समोर आले होते. यानंतर तिने त्या तिघांना पैसे परत केले; पण नंतर तिने पुन्हा कित्येक लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.