क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर व बॉलीवूड अभिनेत्री रेखा या राज्यसभेत अनुक्रम तीन व सात दिवस उपस्थित राहिल्यावरून राज्यसभेत सदस्यांनी हरकत घेत टीका केली. दोघांनाही दोन वर्षांपूर्वी राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पी. राजीव यांनी हा मुद्दा उपस्थित करताना अनुपस्थित राहण्यासाठी दोघांनीही परवानगी घेतली आहे का असे विचारले. त्याला उत्तर देताना उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन म्हणाले की, अजून नियमाचे उल्लंघन झालेले नाही. घटनेच्या कलम १०४ नुसार सदस्य सलग ६० दिवस सभागृहातून अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा रिकामी समजली जाते. सचिन आतापर्यंत ४० दिवस अनुपस्थित राहिला असून रेखाची अनुपस्थिती थोडे दिवस कमी आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी सभागृहाबाहेर बोलताना म्हटले होते की, आपणास सचिन क्रिकेटर म्हणून व रेखा अभिनेत्री म्हणून आवडते, मात्र अशा अनुपस्थित राहण्याने त्यांनी सभागृहाचा अवमान केला आहे.
घरगुती कारणामुळे दिल्लीपासून दूर : सचिन
भाऊ अजित यांचे बायपास ऑपरेशन होते व त्याच्यासोबत राहायचे होते त्यामुळे राज्यसभेत उपस्थित राहू शकलो नाही, मला कुठल्या संस्थेचा अवमान करायचा नाही, असे सचिन तेंडुलकर याने काल दिल्लीत संसदेपासून काही अंतरावर विज्ञान भवन येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. सगळ्यांनाच तुम्ही आवडता असे नाही मात्र आपण कुणाच्या टीकेमुळे विचलित व्हायचे नसते, असे सचिन म्हणाला.