देशात उच्चांकी नव्या 11 हजार रुग्णांची भर; दिवसभरात 20 जणांचा मृत्यू
कोरोना प्रतिबंधक उपाय आणि लसीकरण यामुळे भारताने कोरोना संसर्गावर आळा घातला होता; मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच, गेल्या 24 तासांत देशभरात नव्या 11 हजार 109 कोरोना रुग्णांची वाढ झाली. परिणामी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या जवळ पोहोचली असून, ती सध्या 49 हजार 622 वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात देशात 20 मृतांची नोंद करण्यात आली.
नव्या रुग्णांचा आलेख चढाच राहिला आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास संसर्ग टाळता येईल, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. केंद्र सरकारकडून नव्याने उपाययोजना आखल्या जात आहेत.
देशात 7 महिने आणि 24 दिवसांनंतर कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी 11 हजार 539 रुग्णसंख्या आढळून आली होती. तसेच सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 49 हजार 622 झाली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी 49 हजारांहून अधिक सक्रिय रुग्णसंख्या होती. याशिवाय, दैनंदिन संक्रमण दर 4.42 टक्के आणि साप्ताहिक दर 4.02 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.70 टक्के आहे. त्याच वेळी, मृत्यू दर 1.19 टक्के एवढा नोंदवला गेला आहे.
5 राज्यांमध्ये 64 टक्के नवीन रुग्ण
देशात आढळलेल्या नव्या 11,109 रुग्णांपैकी 7,115 रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये आढळून आले आहेत. हे प्रमाण एकूण आकडेवारीच्या 64 टक्के एवढे आहे.
कुठे किती मृत्यू?
छत्तीसगडमध्ये दोन, दिल्लीत तीन, राजस्थानमध्ये तीन, पंजाबमध्ये दोन, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिसा, पाँडेचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.