>> नवे 65 रुग्ण; 32 जण कोरोनामुक्त
राज्यात मागील चोवीस तासांत कोरोना चाचणीमध्ये घट झाल्याने नव्या रुग्णांचे प्रमाण घटले असून, काल शंभरच्या खाली नवे रुग्ण सापडले. राज्यात चोवीस तासांत नवीन 65 कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी 3 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 713 एवढी झाली असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.3 टक्के एवढे आहे. तयेख 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाचशेपेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी केली जात होती. 1 एप्रिलला 969, तर 2 एप्रिलला 762 नमुने तपासण्यात आले होते; मात्र मागील चोवीस तासात केवळ 397 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे नव्या रुग्णांचा आकडा घटून तो शंभरच्या खाली आला आहे. त्या आधीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यात होत असल्याने सलग चार दिवस 100 हून अधिक कोरोना रुग्ण सापडत होते.
स्वच्छता राखण्याचा सल्ला
आरोग्य सेवा संचालनालयाने राज्यातील कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. श्वसन आणि हाताच्या स्वच्छतेकडे जास्त द्यावे, असे आवाहन केले आहे.
गर्दीची ठिकाणे टाळा
वृद्धांनी आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी जास्त गर्दी आणि मोकळी हवा नसलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. विशेषत: वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्ये तापासारखी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात चाचणी करून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. कोविड पॉझिटिव्ह असल्यास 7 दिवसांसाठी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. तसेच शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल वापरावा, असाही सल्ला दिला आहे.