>> नव्या ६७ रुग्णांची नोंद; ४२ जण कोरोनामुक्त
राज्यात चोवीस तासात नवीन ६७ कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या चारशेच्या वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ४०१ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. तसेच राज्यातील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ६.७९ टक्के एवढे आहे.
राज्यात जून महिन्यात वाढणार्या नवीन कोरोनाबाधितामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील २४ तासांत राज्यात नवीन ९८६ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, चोवीस तासात एकाही बाधिताना इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही. तसेच, राज्यात आणखी कोरोना बळींची नोंद नाही. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२८ टक्के एवढे आहे.
सरकारचे परिस्थितीवर
लक्ष : मुख्यमंत्री
राज्य सरकारकडून राज्यातील वाढत्या नवीन कोरोना बाधिताच्या संख्येवर देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांनी कोविड तज्ज्ञ समितीने केलेल्या सूचनांचे पालन करावे, मास्कचा वापर आणि कोविड नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.