सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ४ हजारांच्या खाली

0
25

>> नव्या कोरोना रुग्णांसह बळींच्या संख्येत चढ-उतार कायम

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ४६९ कोरोनाबाधित आढळून आले असून, आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली आली असून, ती ३ हजार ९३० एवढी झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत केवळ ३१६२ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील ४६९ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. मागील दोन दिवसात नव्या कोरोनाबाधितांची संख्या थोडी कमी होती. त्यानंतर काल पुन्हा कोरोना रुग्ण वाढले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १४.८३ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने ३७५० चा टप्पा ओलांडला असून, कोरोना बळींची एकूण संख्या ३७५४ एवढी झाली आहे.

१६ जण इस्पितळांत
राज्यात गेल्या चोवीस तासांत १६ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे, तर इस्पितळातून बर्‍या झालेल्या ११ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

९१० जण कोरोनामुक्त
राज्यात नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ९१० जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के एवढे आहे.

४२ हजार मुलांना दुसरा डोस
राज्यातील १५ ते १८ या वयोगटातील सुमारे ४१ हजार ९०६ शालेय मुलांना कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच सुमारे ६३ हजार ७७२ शालेय मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. सुमारे ७४ हजार शालेय मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे.