सक्ती म्हणून नव्हे, स्वेच्छेने हेल्मेट वापरा

0
158

– डॉ. अवधूत मणेरकर, फोंडा
गेल्या काही दिवसांत हेल्मेटच्या वापरासंबंधी वर्तमानपत्रांतून उलट सुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या लेखाद्वारे हेल्मेटच्या वापरासंबंधीच्या वैद्यकीय, सामाजिक आणि कायदेशीर बाबींची चर्चा करण्याचा विचार आहे. या विषयावर लिहिण्याएवढा मी मोठा नाही, तरीसुद्धा माझ्या अल्पमतीनुसार या विषयावर प्रकाश पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. –
प्रथम कायदेशीर बाबींकडे वळूः
आपल्या सरकारने, आपल्या भल्यासाठी केलेले कायदे आपणच पाळायलाच हवेत, असे मला वाटते. अन्य अनेक कारणांमुळे अपघात होतात, जसे रस्त्यावर पडलेले खड्डे, जनावरे इ. पण म्हणून ‘मी हेल्मेट वापरणार नाही’ असे म्हणणे चुकीचे आहे. हा लेख दुचाकीस्वारांच्या हितासाठी आणि इतर सर्व लोकांसाठी ज्यांना स्वतःचा अन्याय नसताना सुद्धा अपघाताचे परिणाम भोगावे लागतात, त्यांच्यासाठी आहे.दुसरी बाब सामाजिक नुकसानाची. हेल्मेट न घातल्याने अपघात होऊन जे मृत्यूमुखी पडतात किंवा जायबंदी होतात त्यांच्या नातेवाईकांना सोसाव्या लागणार्‍या हाल अपेष्टांसंबंधी चर्चा करण्याची ही जागा नव्हे. प्रचंड आर्थिक बोजा सुद्धा अशा अपघातामुळे पडतो तो अलाहिदा.
आता मुख्य म्हणजे वैद्यकीय बाबीकडे वळूयाः
हेल्मेटचे काम समजण्यासाठी आपल्याला प्रथम मेंदूसंबंधी थोडी माहिती घ्यावी लागेल. आपला मेंदू हा अतिशय नाजूक असल्यामुळे निसर्गाने तो अत्यंत कठीण अशा कवटीच्या आत सुरक्षित ठेवलेला आहे. डोक्यावर असलेले बारीक-सारीक आघात ही कवटी शोषून घेते आणि मेंदूला धक्का पोहोचू देत नाही. जसे थप्पड, ठोसा इ. पण जर डोक्यावर जोराचा आघात झाला – जसे लाठी बसणे, भिंतीवर आपटणे, दुचाकी चालवताना अपघात होऊन डोके जोरात आपटणे इ. तर मग मेंदूला दुखापत होऊ शकते. ही दुखापत मेंदूच्या आत रक्तस्त्राव, मेंदूला गंभीर इजा इ. प्रकारे होऊ शकते. क्रिकेटच्या चेंडूमुळे सुद्धा दुखापत होते. हेल्मेट हे डोक्यावर होणार्‍या जोराच्या आघातापासून आपले संरक्षण करते. आपले प्राण वाचवते.
हेल्मेटसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टीः
हेल्मेट नेहमी उत्तम प्रतीचे आय. एस. आय मार्क असलेलेच घ्यावे. त्याला आतून नायलॉनच्या सहा पट्‌ट्या असाव्यात आणि घट्ट बसण्यासाठी चीन स्टे असावा. हलक्या दर्जाचे हेल्मेट अपघातात फुटून जावू शकते आणि ते वापरण्यामागचा मूळ हेतूच निष्फळ होऊन जातो. चीन स्टे लावला नाही तर अपघातात ते उडून पडते व हेल्मेट घालण्याला काही अर्थच उरत नाही.
आता हेल्मेटसंबंधी जनसामान्यांमध्ये असलेल्या काही चुकीच्या कल्पना पाहू
१) हेल्मेटमुळे केस गळून जातात ही चुकीची समजूत आहे. केस गळण्याचा आणि हेल्मेटचा अर्थाअर्थी कसलाही संबंध नाही.
२) हेल्मेटमुळे डोक्यात कोंडा होतो, त्वचारोग होतात असा समज असतो, पण तसे अजिबात नाही.
३) हेल्मेटमुळे पाठीच्या मणक्याला जास्त मार लागतो व त्यामुळे पॅरेलिसीस होतो हा चुकीचा समज आहे. हेल्मेट उलट मणक्याचे सुद्धा संरक्षण करते.
४) हेल्मेट फार महाग असते असेही अजिबात नाही. आपल्या जिवाचे आणि वित्ताचे रक्षण करणार्‍या हेल्मेटला साधारण रु. १००० ते १५०० पर्यंत खर्च येतो. एवढ्या छोट्या रकमेत मिळणारे फायदे पाहिले तर ही किंमत नगण्य आहे. आपण आयुर्विम्याचे हप्ते भरतोच की. हे हप्ते आपल्याच आपल्या कुटुंबियांचे चांगल्या प्रकारे हित सांभाळतात. मग आपल्या जीवाचे, जो अमूल्य आहे त्याच्या रक्षणासाठी थोडीशी रक्कम खर्च करायला काय हरकत आहे?
५) हेल्मेट जवळ बाळगणे कठीण असते- नाही, आता चांगल्यापैकी हेल्मेट लॉक्स मिळतात. नाही मिळाली तरी एवढ्या मोठ्या आणि इतक्या फायद्यांसाठी थोडीशी गैरसोय सोसायला काय हरकत आहे?
६) दुचाकीवर मागे बसणार्‍यांसाठी हेल्मेटची गरज नसते हा चुकीचा समज आहे. अपघातात मागे बसणार्‍याला कोणताही आधार नसल्याने जास्त धोका असतो. तो धाड्‌कन रस्त्यावर पडतो व गंभीररित्या जखमी होतो. त्याने हेल्मेट घातलेच पाहिजे.
७) लहान रस्त्यांवर हेल्मेटची गरज नसते ही सुद्धा चुकीची समजूत आहे. अपघात फक्त हायवेवरच होत नाहीत. गावातील किंवा शहरांतील लहान रस्त्यांवर दुचाकी चालवताना कुत्रा किंवा अन्य जनावर, रस्त्यावर सांडलेले तेल, वाळू इ. मुळे दुचाकीला अपघात होऊ शकतो. अशावेळी हेल्मेटमुळे जीव वाचू शकतो.
एक साधे उदाहरण देतो. साधारण दहा बारा दिवसांपूर्वी एक वकील दुचाकीवरून पडले. (कारण कुत्रा) त्यांना बरेच लागले. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत दिली. डोक्याला छोटी जखम असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आणि वैद्यकीय चाचण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. सुदैवाने त्यांना गंभीर इजा नव्हती. मी त्यांना हेल्मेट-संबंधी विचारले नव्हते. ते म्हणाले, हेल्मेट सक्ती अंतर्गत रस्त्यावर असते ना? मी हो म्हणालो. तसा कायदा आहे खरा आणि तो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत असेल. आता सुदैवाने तुमच्या डोक्याला फक्त बाहेरून इजा झाली. पण जर तुमच्या मेंदूला इजा झाली असती तर? कायदा तुमच्या मेंदूचे रक्षण करू शकच नाही. हेल्मेट करते, तेव्हा नेहमीच हेल्मेट वापरा.
८) पोलिसांना फसविण्यासाठी हेल्मेट पुढ्यात ठेवू नका. ते डोक्यावर व्यवस्थित ठेवा. त्यामुळे कायद्याचे पण पालन होईल आणि आपला प्राणसुद्धा वाचेल. कायदा मोडण्यासाठीच असतो, अशी समजूत करून घेऊ नका. आणि कायदा मोडण्यात धन्यता किंवा पुरुषार्थ मानू नका. हेल्मेट आपल्या डोक्याचे, जिवाचे, संपत्तीचे आणि सर्वांत महत्त्वाचे आपल्या प्रियजनांचे अपघातापासून होणार्‍या प्रचंड नुकसानीपासून संरक्षण करते. म्हणून दुचाकीवर स्वार होताना हेल्मेट जरूर वापरा. आपल्याला माहीत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांच्या भल्यासाठी त्यांना समजावून सांगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते ऐकणे-न ऐकणे, त्याप्रमाणे वागणे, न वागणे आपल्या हातात आहे.
लक्षात ठेवा. कायदा आपल्या डोक्याचे रक्षण करू शकत नाही. आपण करू शकता. कायदा पाळून हेल्मेट वापरून!